शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. मराठी कलावंत
Written By नई दुनिया|

श्रावणातलं सुरेल गीत

आपल्या आजीकडूनच तिने शास्त्रीय संगीताच्या संथा वयाच्या पाचव्या वर्षापासून घ्यायला सुरवात केली होती. छोट्या चीजा आणि मुखडे यांचा आधार घेत सावनी मोठी कधी झाली ते कळलेच नाही      
शास्त्रीय संगीत तिच्या रोमारोमात भिनलंय. त्याव्यतिरिक्त बाकी सगळ्या गोष्टी तिच्यासाठी गौण आहेत. तिच्या मते शास्त्रीय संगीताच्या या समुद्रात शिकण्यासारखं इतकं आहे, की त्याला आयुष्य पुरायचं नाही. आमची तर ही सुरवात आहे.

NDND
संगीत क्षेत्रात अल्पावधीत नाव मिळविल्यानंतरही पुण्याच्या सावनी शेंडे अतिशय विनम्रतेने बोलत असते. पुण्यात डॉ. संजीव शेडेंचं घर हे म्हणजे सूरांचा आशियाना आहे. जणू सूर तिथं कायमचे वस्तीला आले आहेत. कारण या घराण्यातच संगीत आहे. तेच सावनी व बेला या मुलींमध्ये उतरले आहे. सावनीची आजी कुसुम शेंडे मागच्या पिढीतील गायिका आणि संगीत नाटकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री होत्या. पित्यानेही स्टेथेस्कोप आणि औषधांच्या दुनियेतून स्वतःला बाहेर काढत सुरांच्या दुनियेत स्वतःला रमवलं. ते स्वतः प्रख्यात गायिका शोभा गुर्टू यां्याकडे ठुमरी, दादरा, कजरी हे प्रकार शिकले आहेत.

अशी सूरपरंपरा असताना सावनी व बेलाला त्याची लागण झाली नसती तरच नवल. सावनी हे नावही अर्थपूर्ण आहे. श्रावणात गायलं जाणारं गीत म्हणजे सावनी. सूरांइतकच सावनीचं व्यक्तिमत्वही तितकंच सुंदर आहे. तिच्या सूरांत ऐकणाऱ्यालाही खेचून घेण्याचं सामर्थ्य आहे.

PRPR
आपल्या आजीकडूनच तिने शास्त्रीय संगीताच्या संथा वयाच्या पाचव्या वर्षापासून घ्यायला सुरवात केली होती. छोट्या चीजा आणि मुखडे यांचा आधार घेत सावनी मोठी कधी झाली ते कळलेच नाही. मग तिने ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका शोभा गुर्टू यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरवात केली. तिचं शिक्षण आजही सुरूच आहे. नाव कमावूनही आपल्याला शिकायचं आहे, ही विनम्र भावनाच त्यातून दिसते. गुरूप्रती सावनीची अतिशय भक्ती आहे. सूरांनाच परमेश्वर मानून सावनी त्यांची रोज पाच ते सहा तास रियाझ करून सेवा करत असते.

एकीकडे सावनी शास्त्रीय संगीतात रमत असताना बेला मात्र सुगम संगीतातून स्वतःची ओळख निर्माण करू पाहत होती. टिव्हीएस सारेगामाची मेगा फायनल जिंकलेली बेला लोकप्रियतेच्या एकेक पायऱ्या पुढे जात असताना सावनी मात्र शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहे. तिच्या रियाझातून गायनातून तिची स्वतंत्र विचारसरणी कळून येते. आलाप, ताना, मींड व पलटी सादर करताना तिच्या आवाजातील परिपक्वताही कळून येते. सुगम संगीताऐवजी शास्त्रीय संगीत हेच करीयर म्हणून निवडणाऱ्या सावनीचे विचार अतिशय स्पष्ट आहेत. संगीतात शॉर्टकट नसतो, असे तिचे मत आहे. पैसा ही आज गरज आहे, पण ती एवढीही नाही, की त्यासाठी काहीही केले पाहिजे, असे ती म्हणते. त्यामुळे जास्तीत जास्त चांगलं गायचं हा तिचा उद्देश आहे.