शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: सोमवार, 14 जुलै 2014 (17:36 IST)

प्राण्यांचा पावसाळा

बालमित्रांनो, पावसाळ्यातील पावसाची रिपरिप..... वातावरणातील गारठा अन् दमटपणा यामुळे एक वेगळेच वातावरण असते. या वातावरणाचा मानवाबरोबरच पशुपक्ष्यांवरदेखील काय परिणाम होतो हे जाणून घेऊ....
 

भू भू कुत्रा

माणसाच्या सगळ्यात जवळता प्राणी म्हणजे कुत्रा. सध्या पावसाळ्यात आपल्या कुत्र्यांचं वेळापत्रक म्हणजे खायचं, प्यायचं आणि झोपायचं. कुत्र्यांना पावसाळ्यात भिजायला खूप आवडतं. पण शक्यतो पावसाळ्या ते जास्त बाहेर पडत नाहीत. कारण वारा आणि विजांचा कडकडाट याला ते खूप घाबरतात. रस्त्यावर राहणारे कुत्रेही आसर्‍यासाठी आडोसा शोधतात. इतर वेळी घरी शाकाहार आणि मांसाहार करणारे कुत्रे इतर वेळी घरी मात्र फक्त दूधभात किंवा डॉग फूड खाणंच पसंत करतात. पावसाळ्याच्या थंडीत ते माणसाच्या कुशीत शिरून झोपतात.
 

काऊदादा

कावळा हा तसा काही आपला फारसा आवडता पक्षी नाही. पण पावसाळ्यात मात्र त्यांची दया येते. एक छानसं झाड शोधून तो आपल्या निवार्‍याची सोय करून ठेवतो. पण अन्नासाठी मात्र काही कावळ्यांनी एक युक्ती शोधली आहे. काही घरांमध्ये ते न चुकता बरोबर जातात. कावकाव करतात. पोळी देईपर्यंत तिथेच बसतात आणि मग पोळी देणार्‍याच्या चक्क हातातून पोळी घेतात. आहे की नाही गंमत.

 
गुटूर गू कबुतर

राखाडी रंगाची कबुतरं पावसाळ्यात अधिकच खुलून दिसतात. पावसात भिजल्यानंतर कबुतरांच्या मानेवरचा निळसर-हिरवा पट्टा खूप आकर्षक दिसू लागतो. झाडांवर किंवा इमारतींच्या आडोशाला दिसणारी कबुतरं पावसात अनेकदा मनसोक्त भिजताना दिसतात.
 

चिवचिव चिऊताई

चिऊताई म्हणजे इवलासा पक्षी. पावसाळा सुरू व्हायच्या आधी ती आपल्या घरट्याची सोय करून ठेवते. काट्याकुट्या, वाळलेली पानं, गवत यांचा वापर करून पावसाळा सुरू होण्याच्या आधी चिमणीच घरटं बांधून तयार असते. एखादं मोठ्ठं झाड पाहून त्यावर भक्कम घरटं बांधून ठेवते. आपल्या पिलांना जपण्याचा पूर्ण प्रयत्न असतो तिचा.
 

कूकूच कू

सकाळी बांग देऊन आपल्याला सगळ्यांना उठवणारा कोंबडा पावसाळा असो व हिवाळा, आपलं काम चोख बजावतो. पण एरवी दिवसभर उत्साहाचा झरा असलेला कोंबडा पावसाळ्यात दिवसा मात्र आळसावतो. हवेतील गारवा आणि आकाशातलं मळभ यामुळे तो बाहेर हुंदण्यापेक्षा घरीच बसणं पसंत करत असतो.