शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

क्यूट मिरकॅट

मिरकॅट म्हणजे काय असा प्रश्न तमाम दोस्तांना पडला असेल. मिरकॅट हा जगातल्या चित्रविचित्र प्राण्यांमधला एक प्राणी. त्यांचा आकार मोठ्या आकाराच्या खारीइतका म्हणजे शेकरुसारखा असतो. मिरकॅट मुंगुसाच्या कुटुंबातले  प्राणी आहेत. हा प्राणी गट करून राहतो. एका गटात साधारण 40 मिरकॅट‍ असतात.
 
हे प्राणी गोंडस दिसतात. या गटातला प्रत्येक प्राणी कार्यरत असतो. आपल्यावर असलेली जबाबदारी ते नीट पार पाडतात. अन्न शोधून आणणं, शत्रूवर नजर ठेवणं आणि गटातल्या लहान्म्यांचं रक्षण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी असते. वाळवंटी तसंच दलदलीच्या प्रदेशात ते राहतात. आधी म्हटल्याप्रमाणं ते खूप गोंडस असतात.
हे प्राणी राखाडी रंगाचे असतात. त्यांच्या अंगावर थोडे केसही असतात. त्यांचं तोंड शरीराच्या मानानं बरंच छोटं असतं. त्यांचं छोटंसं नाक आणि मोठाले डोळे यामुळं हे प्राणी पटकन ओळखता येतात. त्यांच्या डोळ्यांभोवती चट्टेपट्टे असतात. मोठ्या डोळ्यांमुळे ते एकमेकांकडे टकमक बघत असतात.
 
अत्यंत उत्साही आणि चपळ असा हा प्राणी आहे. प्रौढ मिरकॅटची लांबी साधारणपणे 20 इंचांपर्यंत असते. हे प्राणी जमिनीत भुयार करून राहतात. त्यांना जमिनीखाली राहायला खूप आवडतं. लांब पंजे आणि टोकदार नखांच्या मदतीनं ते भुयार खोदतात. डिस्कव्हरी तसंच अॅनिमल प्लॅनेटवर हे प्राणी तुम्ही पाहिले असतील. जमिनीखालच्या भुयारात राहिल्यानं हे प्राणी सुरक्षित असतात. शत्रूंचा धोका त्यांना फारसा उरत नाही. तसंच आफ्रिकेतल्या प्रचंड उन्हाळ्यापासूनही त्यांचं संरक्षण होतं.
 
जमिनीखालचं त्यांचं घर अनोखं असतं दोस्तांनो. फक्त भुयार खोदून ते शांत बसत नाहीत. तर या भुयाराला वेगवेगळे मार्ग असतात. त्यांचं भुयार बरंच खोल असतं. बोगदे आणि वेगवेगळ्या खोल्याही असतात. एका वेळी पाच वेगवेगळ्या भुयारांचा वापर हे प्राणी करतात. हे प्राणी सकाळच्या वेळेत बाहेर पडतात. सूर्य उगवला की मिरकॅटचा गट बाहेर पडतो. अन्नाचा शोध हे त्यांचं मुख्य काम.
 
या प्राण्याची हुंगण्याची शक्ती जबरजस्त असते. या क्षमतेचा वापर करून ते अन्न शोधून काढतात. गटातले काही जण छोट्या पिल्लांची काळजी घ्यायला घरी थांबतात. गंमत म्हणजे प्रत्येक दिवशी ही जबाबदारी गटातल्या दुसर्‍या प्राण्यावर टाकली जाते. हे प्राणी 12 ते 14 वर्षांपर्यंत जगतात.