शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : सोमवार, 18 एप्रिल 2016 (12:44 IST)

ज्योतिषशास्त्र (Astrology) : पारंपरिक भविष्यवाणी

जातक. यालाच होराशास्त्र म्हणतात. यात वैयक्तिक फलांचा विचार आहे.
 
तिथी व मुहूर्त: 
मद्य जसे विशिष्ट वेळी, विशिष्ट ठिकाणी मुरविण्याठी ठेवलेले असते, त्यात ते गुणधर्म असतात, त्याचप्रमाणे एका विशिष्ट वेळी, विशिष्ट ठिकाणी माणूस जन्माला येतो. त्यात ते गुणधर्म असतात. ज्योतिषशास्त्र याहून जास्त कसलीही हमी देत नाही.-- कार्ल गुस्ताव युंग.
 
माणसाच्या जन्मकाळी ग्रहनक्षत्रांची स्थिती पाहून त्यावरुन त्याच्या पुढील आयुष्यात घडणार्‍या घटनांचे भविष्य वर्तविणे म्हणजे जातक. 

पंचांग
दिवस, महिना, वर्ष यांचा नक्की कालावधी ठरविणे, कोणत्या दिवशी कोणते ग्रह, नक्षत्र आकाशात कोठे असतील हे सांगण्यासाठी गणित विभाग सिद्धांत मांडतो. सिद्धांतानुसार दर दिवशी त्या वर्षात येणार्‍या स्पष्ट स्थितीची नोंद दाखविणारे पुस्तक म्हणजे पंचांग. तिथी, वार, नक्षत्र, योग व करण ही पंचांगाची पाच अंगे होत. 

तिथी
चंद्राची गती सूर्याहून जास्त असते त्यामुळे चंद्र पुढे जातो. त्या दोघांमध्ये 12 अंश अंतर पडण्यास जो काळ लागतो, त्यास तिथी म्हणतात. एका चांद्रमासात 30 तिथी होतात. 

करण
मग चंद्रसूर्य पुन्हा एकत्र येतात. अर्धीतिथी म्हणजे करण. (6 अंश अंतर). 

वार
सूर्योदयापासून दुसर्‍या सूर्योदयापर्यंत एक वार. 

 नक्षत्र 
संपूर्ण नभाचे, 800 कलांचा एक असे 27 भाग केले, त्या प्रत्येक भागास, आणि तो क्रमिण्यास चंद्रास लागणारा काळ त्यास नक्षत्र म्हणतात. 

योग 
चंद्रसूर्यांच्या भोगांची(क्रमिलेल्या अंतरांची) बेरीज करून त्यावरून 800 कला बेरीज होण्यास लागणारा काल म्हणजे योग होय.
भारतात पंचांग फार प्राचीन काळापासून होते. वैदिक काळात, सर्व पाच अंगे कदाचित नसावीत. तसेच फार पूर्वी म्हणजे लिपीज्ञान होण्यापूर्वी ते तोंडी असावे. वार आपल्याकडे येण्यापूर्वी सावन दिवस होते. अमुक दिवस नक्षत्रे व ऋतू यावर अमुक कृत्ये करावीत असे वेदांत सांगितले आहे. वेदांगज्योतिषकाली म्हणजे इ.स. पूर्व 1400 च्या सुमारास नक्षत्रे व सावन दिवस होते. पुढे तिथी आली. तिथी म्हणजे अहोरात्र निदर्शक. करण म्हणजे अर्धी तिथी. रात्र किंवा दिवस. तिथी व त्यामागोमाग करण प्रचारात आले. अथर्वज्योतिषात करण व वार आहेत.
 
इ.स.पूर्व 400 च्या सुमारास मेषादी राशी आपल्याकडे प्रचारात आल्या असा अंदाज आहे. जन्मकाली जी रास क्षितिजात असेल, म्हणजे उदय पावत असेल, तिला जन्मलग्न  म्हणतात. एक चौकोनी 12 घरांची आकृती काढतात. त्याला जन्मलग्नकुंडली म्हणतात. त्यात पहिल्या घरात जन्मलग्नाची राशी असते. व पारंपरिक रीतीने ठरविलेल्या क्रमाने या व इतर ग्रहांची नोंद होते. या बारा स्थानास तनु, धन, सहज, सुहृत्, सुत, रिपु, जाया, मृत्यू, धर्म, कर्म, आय व्यय अशा संज्ञा आहेत. याखेरीज याच घरांना इतरही बर्‍याच संज्ञा दिल्या जातात.
 
त्या त्या स्थानांच्या संज्ञा व तेथील ग्रह यावरून भविष्य वर्तविले जाते. तसेच इतर स्थानातील ग्रहांची दृष्टी विचारात घेतली जाते. जातकावर अनेक ग्रंथ आहेत. तसेच अनेक ज्योतिषी आपल्या अनुभवातून होरा अथवा अडाखे बांधतात. त्यावरून भविष्य सांगतात. काही ज्योतिषी राशिकुंडलीवरुनही भविष्य सांगतात. ग्रहांचे परस्परांशी मित्रत्व अथवा शत्रुत्व, परंपरेने कल्पिलेले आहे. तसेच ग्रह स्वगृही व उच्ची असता उत्तम फले देतात व नीची अथवा शत्रुगृही असताना निराळे फल व तसेच वक्री असता वेगळेच फळ कल्पिलेले आहे. 
तसेच सायन व निरयन हे भेदही आहेत. भारतात निरयन पद्धत प्रचलित आहे. विदेशात सायन पद्धतीचा वापर होतो. अयनचलन (Precession of Equinosex) विचारात घेऊन केलेले जातक हे सायन होय. जातकशास्त्रात गौरीजातक, कालचक्रजातक, हे दैवी ग्रंथ मानलेले आहेत. तसेच पाराशरी, जैमिनी, भृगुसंहिता इत्यादी अपौरुष अथवा आर्ष ग्रंथ मानलेले आहेत. पौरुषग्रंथात प्राचीनतम म्हणजे वराहमिहिराचा बृहत्जातक हा ग्रंथ होय. त्याखेरीज वेळोवेळी लिहिलेल्या ग्रंथांची व टीका यांची संख्या मोठी आहे. गार्गी, बादरायण, याज्ञवल्क्य, मांडव्य इत्यादींचा उल्लेख अनेक टीकाकार करतात.
 
शं. बा. दीक्षित : पटवर्धन व गोविंद शेट्टी शंकर बाळकृष्ण दीक्षित  हे एकोणिसाव्या शतकातील विद्वान, लेखक, संशोधक. ज्योतिषशास्त्रावर (म्हणजे गोल व सिद्धांतस्कंद)(Stronomy) त्यांची अनेक पुस्तके गाजली. 1896 मध्ये त्यानी भारतीय ज्योतिषशास्त्र नावाचा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला. लेखकाचा ज्योतिषसिद्धांताचा गाढा अभ्यास. पण फलज्योतिषावर विश्वास नव्हता. त्यांच्या या पुस्तकात दोन विशेष व्यक्तींचा उल्लेख आहे. कुंडलीवरून भविष्य सांगणारे अनेक ज्योतिषी आहेत. पण, बाबाजी काशीनाथ पटवर्धन ऊर्फ महाडकर यांच्याजवळ एक विलक्षण विद्या होती. एखाद्या व्यक्तीची मुखचर्या, जीभ व तळहात पाहून त्याची कुंडली मांडीत व अचूक भविष्य सांगत. लेखकाने याचा बर्‍याच वेळा अनुभव घेतला. त्यांच्या मतानुसार 70 ते 80 टक्के हे भविष्य तंतोतंत खरे असे. दुसरे कुंभकोणचे गोविंद चेट्टी हे गृहस्थ तर त्याहून विलक्षण! ते चेहरा पाहून जन्मकाल तर सांगायचेच, पण त्या मनुष्याच्या मनातले कोणत्याही भाषेतल्या प्रश्नाची उत्तरे सांगायचे. या चमत्कारिक विद्या पाहून, लेखकांचा असा विश्वास बसला की, जन्मकाली असलेल्या ग्रह नक्षत्र तार्‍यांचा परिणाम शरीरावयवावर नक्की पडतो, त्याअर्थी, ग्रह नक्षत्रांचा मनुष्यावर प्रभाव असला पाहिजे. 
श्रीनिवास येमूल