शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

'अक्रोड'चे गुणधर्म!

‘जग्लन्स रेजिया’ या शास्त्रीय नावाची अक्रोडाची झाडं हिमालयीन परिसरात अनेक वर्षांपासून आढळलेली आहेत. अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात असलेलं ओमेगा ३ मेदाम्ल हे अँन्टिऑक्सिडंट असल्याने त्याचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. र्जनल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ न्यूट्रिशनमधील संदर्भानुसार अक्रोड आणि अक्रोडाचं तेल या दोन्हीचा उपयोग ताण कमी करण्यासाठी होतो.

अक्रोड आहारात असतील, तर ज्यांचं वजन जास्त आहे अशांना फायदा होतो. रक्तवाहिन्या चांगल्या स्थितीत राहतात.

अक्रोडातील 90 टे फेनॉल्स त्याच्यावरील पातळ तपकिरी सालीत असतात. फ्लेवनॉइडस्मुळे अँन्टिऑक्सिडंट गुणधर्म वाढतात. त्यामुळे अक्रोड खाताना या सालीसकट खावा. शक्यतो पाण्यात भिजत ठेवून पूर्ण भिजला की खावा. पाण्यात भिजवल्यावर त्यातील प्रथिनांचे रेणू पाणी शोषून घेतात आणि काही प्रमाणात त्यांचं डीनेचरेशन होतं ज्यामुळे अक्रोड पचायला सोपा होतो.

अक्रोडातील भरपूर प्रमाणात असलेलं इ-जीवनसत्त्व एका वेगळ्या स्वरूपात म्हणजे गॅमा टोकोफेरॉल या रसायनाच्या स्वरूपात असतं. संशोधनानुसार या रसायनामुळे खास करून पुरुषांच्या हृदयाच्या आरोग्यास हातभार लागतो. हृदयविकारापासून संरक्षण मिळतं, असं आढळलं आहे.

अक्रोड आहारात असल्याने तंतू, पोटॅशियम, कॅल्शियम्, मॅग्नेशियम्, तांबे यांचाही लाभ झाल्याने संधिवातालाही प्रतिबंध होण्यास मदत होते. अक्रोडामध्ये आणखी असे गुणधर्म आहेत ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधील लवचिकता टिकून राहते. रक्तात गाठी होण्याचं प्रमाण कमी होतं. अक्रोड मेंदूसाठीही उत्तम समजला जातो.

अक्रोडाच्या तेल:
अक्रोड पूर्णपणे वाळवून त्याची पेस्ट करून ती भाजून मग त्यापासून तेल काढलं जातं. ते सुंदर तपकिरी रंगाचं असतं. या तेलात एलॅजिक आम्ल हा अँन्टिऑक्सिडंटस्चा स्त्रोत असतो. यामुळे कर्करोगाला प्रतिबंध होतो.

रक्ताभिसरण उत्तम राहण्यास, रक्तवाहिन्या लवचिक राहण्यास, हृदयविकारास प्रतिबंध होण्यास, संधिवातास प्रतिबंध होण्यास या तेलाचा चांगला उपयोग होतो, असं आढळलं आहे.

अक्रोडाच्या तेलातील मेलटोनिन, सेलेनियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह, जस्त, कॅल्शियम यासारख्या खनिजांमुळे शरीरातील हॉर्मोन्सची पातळी स्थिर राहण्यास मदत होते, असंही आढळलं आहे. या तेलातील ब जीवनसत्त्वाचे प्रकार आणि इ जीवनसत्त्व यामुळे त्वचेचा पोत सुधारतो. त्वचेवरील सुरकुत्या, अकाली वार्धक्य, एक्झिमा, सोरियासिस यावर अक्रोडाच्या तेलाचा चांगला उपयोग होतो.

अक्रोड आणि त्याचं तेल दोन्ही हवाबंद डब्यात, सूर्यप्रकाश, उष्णता यापासून दूर ठेवले, तर जास्त दिवस टिकतात. नाही तर लवकर खवट वास येऊ लागतो. अक्रोडाचा वृक्ष सुंदर दिसतो. त्याच्या लाकडापासून सुंदर वस्तू बनतात. अक्रोड म्हणजे अत्यंत उपयोगी आणि नितांत सुंदर अशी निसर्गाची निर्मिती आहे, असंच म्हणावं लागेल.
- डॉ. वर्षा जोशी