शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

Pregnancy : गरोदरपणाचे शेवटचे तीन महिने

गर्भारपणाचे शेवटचे काही आठवडे बहुतेक गरोदर स्त्रियांना अवघडलेपणामुळे खूपच जड जातात. मधल्या काही काळामध्ये कमी झालेले निरनिराळे त्रास पुन्हा सुरू व्हायला लागतात.

पाठ दुखणे : पाठीच्या कण्याच्या वक्रतेमध्ये बदल झाल्यामुळे विशेषत: पाठीच्या खालच्या भागात दुखते. बसायला योग्य पद्धतीची खुर्ची वापरणे, तसेच खूप जास्त मऊ/कडक गादीवर न झोपणे, वजन प्रमाणापेक्षा जास्त न वाढू देणे; तसेच दैनंदिन शारीरिक हालचाली केल्याने फायदा होतो.

श्वास घेण्यास त्रास वाटणे : या तीन महिन्यांत पोटाचा आकार बराच वाढतो व त्यामुळे श्वासपटलावर दबाव येतो. तसेच फुफ्फुसांचा खालचा भागही दबला जातो. यामुळे बहुतेक स्त्रियांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो. विशेषत: आडवे झोपल्यावर त्रास वाढतो. एखाद्या आरामखुर्चीचा वापर जास्त केल्यास हा त्रास कमी होतो.

झोप न लागणे : या काळात झोप न लागण्याची बरीच कारणे असतात. पोटाचा वाढता आकार, श्वास घ्यायला होणारा त्रास, बाळाची सतत होणारी हालचाल, वारंवार बाथरूमला जावे लाणे, गर्भाशयाचे होणारे वाढते आकुंचन यामुळे रात्री नीट झोप लागू शकत नाही. यासाठी पुढील उपाययोजना केल्यास फायदा होतो : चहा, कॉफीसारखी उत्तेजक पेये संध्याकाळनंतर न पिणे. झोपण्यापूर्वी ग्लासभर दूध पिणे, कोणता तरी गोड पदार्थ रात्रीच्या जेवणात खाणे.

कुशीवर झोपणे : गरोदर स्त्रियांनी शक्यतो कुशीवर झोपणे महत्त्वाचे आहे. पाठीवर झोपल्यास रक्तवाहिन्यांवर गर्भाशयाचा दबाव पडतो व गर्भाशयाकडे जाणारा रक्तपुरवठा तात्पुरता कमी होतो. योग्य त्या उशा वापरून झोपतानाची स्थिती आरामदायक करणे हे चांगले.

पायांच्या नसा फुलणे, मूळव्याधीचा त्रास जाणवणे : वर सांगितल्याप्रमाणे गर्भाशयामुळे रक्ताभिसरणास अडथळा निर्माण होतो व हे त्रास संभवू शकतात. पाय शक्यतो शरीराच्या वरच्या पातळीवर ठेऊन बसल्यास/झोपल्यास हा रक्तप्रवाह सुरळीत व्हायला मदत होते. जर मलावरोध होत असेल तर आहारात तंतूमय पदार्थांचे म्हणजेच भाज्या, फळे इ. चे सेवन जास्त प्रमाणात करणे आवश्यक आहे.

ओटीपोटात, कमरेच्या हाडात दुखणे : काही स्त्रियांना गर्भावस्थेच्या शेवटच्या काही आठवड्यांत अशा प्रकारे दुखते. बाळाचे डोके जर माकडहाडामध्ये घट्ट बसत असेल तर दुखू शकते. यावर थोडी सहनशीलता वाढवण्याव्यतिरिक्त कोणताही उपाय नाही.

वारंवार मूत्रविसर्जनाची भावना होणे : बाळाचे डोके खालच्या बाजूला सरकायला लागल्यावर मूत्राशयावर त्याचा दबाव पडायला सुरुवात होते. यामुळेच जास्त वेळा बाथरूमला जावे लागते. कोणत्याही प्रकारच्या जंतुसंसर्गामुळे हे होत नाही ना, हे तपास करून बघणे आवश्यक आहे. असे असल्यास योग्य ती जंतुनाशक औषधे घेतल्याने बरे वाटते.

पायावर सूज येणे, पोट-या दुखणे, हातापायाला मुंग्या येणे : अशा अनेक प्रकारच्या संवेदना जवळजवळ प्रत्येक स्त्रीला शेवटच्या काही दिवसांत होत असतात. यावर ठोस उपाय फारसा नाही. व्हिटॅमिन्स व क्षार भरपूर प्रमाणात मिळतील असा सकस आहार घेणे, आवश्यकता भासल्यास डॉक्टरांनी सुचवलेल्या गोळ्या घेणे यामुळे त्रास कमी होऊ शकतो. हे सर्व तात्पुरते आहे व प्रसूतीनंतर नीट होणार आहे हे लक्षात घेणे जरुरीचे आहे.

बाळाची हालचाल व स्थिती : सुरुवातीला बाळाचा आकार व आजूबाजूचे गर्भजल याचे प्रमाण व्यस्त असते. शेवटच्या तीन महिन्यांत बाळ जवळजवळ दुप्पट प्रमाणात वाढते व त्याला आता फारशी हालचाल करायला जागा उरत नाही. सर्वसाधारण ३२व्या आठवड्यामध्ये बाळाची स्थिती निश्चित होते. या वेळी जर डोके/पाय खाली असेल त्याच स्थितीत बाळ प्रसूतिपर्यंत बहुतेक वेळा राहते. ३२ आठवड्यांनंतर बाळाच्या फक्त हातापायांची व शरीराची हालचाल तिथल्या तिथेच होते. यामुळे गरोदर स्त्रीला हालचाली कमी झाल्याचे लक्षात येऊन, बाळाला तर काही त्रास नाही ना, अशी चिंता स्वाभाविकपणे वाटते. साधारण २४ तासांत बाळाची हालचाल १२-१४ वेळा जाणवली तर काळजी करण्याचे काही कारण नाही. बाळही पोटात असताना काही काळ झोपते. त्यामुळे ही हालचाल १-२ तास अजिबात होत नाही व अचानक खूप वेळा झाल्यासारखी वाटते. असे झाल्यास अजिबात चिंता करण्याची गरज नाही. हालचाल १२-१४ वेळा पेक्षा खूपच कमी वेळा जाणवल्यास ताबडतोब प्रसूतितज्ञांना नजरेस आणून द्या.

सोनोग्राफी : साधारण ३६व्या ते ३८व्या आठवड्यात सोनोग्राफीचा तपास करणे आवश्यक आहे. बाळाची स्थिती, साधारण वजन, गर्भजलाचे प्रमाण व वारेची तपासणी हे बघितल्यावर प्रसूती केव्हा व कशी होईल याचा अंदाज बांधता येतो.

आता हा वाट बघण्याचा कालावधी संपत आलाय. काय होणार? किती त्रास होणार? आॅपरेशन तर करावे लागणार नाही ना? मी बाळंतपणाच्या कळा सहन करू शकेन ना? अशा असंख्य प्रश्नांचे मोहोळ तिच्या मनात उठत असते. विशेषत: पहिल्या प्रसूतीच्या वेळी ही हुरहूर, काळजी खूपच वाढते. डॉक्टर व वडीलधा-या व्यक्तींच्या आश्वासनाने मन काहीसे शांत होते.

आपले कपडे, लागणा-या वस्तू, औषधे, कागदपत्रे, बाळाचे कपडे इ. भरून बॅग तयार ठेवणे शेवटच्या २-३ आठवड्यांत आवश्यक आहे.

हॉस्पिटलमध्ये कधी जायचे?

ब-याच जणींना हा प्रश्न पडतो. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हॉस्पिटलमध्ये भरती होणे महत्त्वाचे आहे; परंतु प्रसूतीची सुरुवात झाल्याची पुढील लक्षणे आहेत :

रक्तमिश्रित स्राव अंगावरून जाणे.
पोटात/ पाठीत थोड्या थोड्या वेळाने दुखायला लागणे.
अचानक पाण्यासारखा खूप स्राव होणे.
वारंवार मल/मूत्र विसर्जनाची भावना होणे.

अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांना कळवणे अत्यावश्यक आहे. त्यानंतर त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागणे हितकारक.

एक गोष्ट लक्षात ठेवणे फायद्याचे ठरते, हॉस्पिटलमध्ये दाखल होताना मुद्दाम काही खाऊन/ दूध पिऊन जाऊ नका. (पाहिजे तर बरोबर घेऊन जा.) प्रसूतीच्या काळात शक्यतो पोट रिकामे असल्यास चांगले. डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रसूतीसाठी अजून वेळ असल्यास हलका आहार घेता येतो.