गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

नैराश्य/ उदासीनता म्हणजे काय?

कुणाला नैराश्य येवू शकते? 
 
नैराश्य कोणालाही येउ शकते श्रीमंत- गरीब, स्त्री-पुरूष, लहान मुले ते वृद्ध. नैराश्य जीवनाच्या सर्व घटकांवर प्रभाव करते. छोट्या छोट्या दैनंदिन गोष्टीपासून ते करिअर वर परिणाम होतो. त्याचा नात्यावर कुटुंबावरही तसेच दररोजच्या कामावर सुध्दा परिणाम होतो  आणि सर्वात मोठा परिणाम म्हणजे आत्महत्या.. 
 
सध्याच्या परिस्थितीत तरूण मुलांतील मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे ते म्हणजे आत्महत्या.
एवढे सगळे परिणाम असताना मात्र त्याकडे सर्वजणच दुर्लक्ष करतात.
नैराश्य हा असा आजार आहे ज्यावर प्रतिबंधात्मक उपाय व उपचार उपलब्ध आहेत. नैराश्य काय आहे हे समजुन घेणे, त्यावर प्रतिबंधात्मक उपाय व उपचाराबाबत माहिती करून घेणे खूप मह्त्त्वाचे आहे. सर्वात मह्त्त्वाचे आहे ते म्हणजे नैराश्याशी निगडित कलंकीत भावना दुर करणे ज्यामुळे जास्तीत जास्त लोक नैराश्यासाठी मदत घेतील.
 
नैराश्य समजून घेताना त्याची कारणे, परिणाम, प्रतिबंधात्मक उपाय व उपचार  याबद्दल समजून घेणे खूप मह्त्त्वाचे आहे. सर्वात मह्त्त्वाचे आहे ते म्हणजे स्वतःला नैराश्य असल्यास कुठून व कशी मदत मिळवायची व समोरच्या व्यक्तीस नैराश्य असल्यास त्यास कशी मदत करायची व डॉक्टर कडे जाण्यास कसे प्रवृत्त करायचे. नैराश्य असणाऱ्या व्यक्तीने स्वतःची काळजी कशी घ्यायची हे समजुन घेणे आवश्यक आहे.
 
नैराश्य/ उदासीनता म्हणजे काय? 
नैराश्य हा एक मानसिक आजार आहे ज्यामध्ये व्यक्तीस नेहमी उदास व निराश वाटते व दैनंदिन कामे तसेच आनंददायी गोष्टीतील इंटरेस्ट कमी होतो. सर्वसाधारणपणे दोन आठवडया पेक्षा जास्त दिवस त्रास झाल्यास त्यास आजार संबोधले जाते.
 
#लक्षणे कुठली-
१. सतत उदास/ निराश वाटते किवा सतत चीडचीड होणे.
२. थकवा येणे, शक्ति नसल्यासारखे वाटते.
३. भूक कमी लागते, जेवणाची इच्छा न होणे किंवा वजन कमी होणे. काही लोकांमध्ये मात्र विरूध्द लक्षणे दिसू शकतात..
४. झोप न लागणे किंवा शांत व पुरेशी झोप न लागणे.  काहीजणाना मात्र खूप झोप लागणे असाही त्रास होऊ शकतो.
५. कामावरती लक्ष न लागणे/ इच्छा कमी होणे, निर्णयक्षमता कमी होणे.
६. आपण काहीच कामाचे नाही, आपले काहीच चांगले होणार नाही, आपल्याला कोणीही मदत करू शकणार नाही असे वाटते
७. आत्महत्येचे विचार मनात येणे किंवा प्रयत्न करणे.
 
जवळपास १०% लोकांना नैराश्य हा आजार आहे.
नैराश्यामूळे डायबेटिस (मधुमेह ) , हृदयाचे आजार होण्याचे प्रमाण (रिस्क) वाढते.
गरोदरपणात किंवा प्रसूतीनंतर नैराश्य असल्यास त्याचा मुलावर व त्याच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो.
 
नैराश्याचा धोका जास्त केव्हा असतो?  गरिबी, बेरोजगार आयुष्यातील मोठ्या घटना/ मानसिक आघात, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, घटस्पोट, ब्रेकअप, शारीरिक आजार तसेच दारू किंवा ड्रग्ज चे व्यसन असल्याच नैराश्य होण्याचा धोका अधिक असतो. परंतु असे काही कारण नसताना सुद्धा जैविक घटकामुळे.( मेंदूतील रासायनिक बदलामुळे (chemical लोचा) नैराश्य येउ शकते.
 
->एक ना अनेक कारणांमुळे ५०% पेक्षा अधिक व्यक्तीना उपचार मिळत नाहीत. 
->नैराश्य किंवा एकंदरीतच  मानसिक आजाराबद्दलचे गैरसमज हे मुख्य कारण आहे. हे कमकुवत मनाचे लक्षण आहे, औषधोपचार न करताही नैराश्य हळूहळू आपोआप कमी होईल, गोळ्याची सवय लागेल असे अनेक गैरसमज आहेत. 
->तसेच यासाठी मनोविकारतज्ञास दाखवल्यास आपल्याला लोक वेडे समजतील ही भीती व कलंकीत भावणेमुळे बरेच लोक उपचार घ्यायचे टाकतात. 
->सौम्य नैराश्य समुपदेशनाने बरे होऊ शकते परंतु मध्यम व तीव्र नैराश्य असल्यास औषधोपचार करण्याची गरज असते. .
 
काय कराल? 
आपल्या जवळच्या व्यक्तीशी (नातेवाईक/मित्र) यांच्याशी बोला. गरज असल्यास मनोविकारतज्ञाची मदत घ्या. आराम करा. तणावाचे नियोजन करा. स्वतःसाठी वेळ द्या. छंद जोपासा.
 
आपल्यासमोर एखादी नैराश्य ग्रस्त व्यक्ती असल्यास त्याच्याशी बोला, त्याला बोलते करा व त्यास मनोविकारतज्ञाची मदत घेण्यास प्रवृत्त करा. 
 
2020 पर्यंत नैराश्य हा सर्वात मोठा आजार असेल व मृत्यूचे सर्वात मोठे वा प्रथम क्रमांकाचे कारण असेल. त्यामुळेच गरज आहे ती आत्ताच जागे होण्याची.