गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

ऑटीझम

MHNEWS
संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांची 'ऑटीझम' या विषयावर मुलाखत प्रसारीत करण्यात आली.

प्रश्न : ऑटीझमची लक्षणे कोणती आहेत?
उत्तर : एक ते दीड वर्षाचे ऑटीझम लहान मुल कडेवर घेतल्यानंतर ते आपल्याला जिवंत वाटत नाही. इतर मुले ज्याप्रमाणे बिलगतात तसा स्पर्श या मुलांचा जाणवत नाही. ही मुले उशीरा बोलतात. या मुलांना भाषा येत नाही. ते बोटाने वस्तू दाखवतात. सुरुवातीला आपल्याला असे वाटते की थोड्या दिवसांनी बोलायला लागेल. मात्र तसे होत नाही. अशा मुलांना ताबडतोब डॉक्टरकडे (न्युरो फिजिशियन्स) घेऊन जा. त्याला ऑटीझम झाल्याची खात्री करुन घ्या. त्याच्या थेरपीवर लक्ष केंद्रीत करा. या मुलांना सामाजिक जाणीवा नसतात. ही मुले उतावळीपणाने हालचाली करीत असतात.

ऑटीझम मुले भिरभिरत्या नजरेने पाहतात. ही मुले नजरेला नजर देत नाहीत. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ही मुले हिंसक बनतात तेव्हा त्यांच्या वर्तवणुकीत फरक पडण्यासाठी सर्वप्रथम त्यांना शांत करावे लागते. त्यांच्यासाठी खास शिक्षक ठेवण्याची गरज आहे. प्रत्येक मुलासाठी एक खास शिक्षक असावा. ऑटीझम झाला म्हणजे सगळे काही संपले असेही नव्हे. ही मुले आपल्या विश्वात दंग असतात. स्वत:च्या हाताला चावतात. इथून तिथे पळतात. हात उंचावतात.

प्रश्न : ऑटीझमवर आपण तातडीने कोणते उपाय केले पाहिजेत?
उत्तर : ऑटीझमचे तातडीने निदान होणे गरजेचे आहे. बरेचसे आईवडिल मुलाकडे दुर्लक्ष करतात. त्याची लक्षणे समजून घेत नाहीत. त्यामुळे मुलाची लक्षणे समजण्यास फार उशीर होतो व यात १०-१२ वर्षे निघून जातात. तसेच त्या रुग्णास थेरपी मिळणेही गरजेचे आहे. ऑटीझम किती तीव्र अथवा किती सौम्य स्वरुपाचा आहे हे पहाणे गरजेचे आहे. तसेच तो रोग नाकारु नका व खूप अपेक्षा ठेवू नका. अशा मुलांना शिवणकला, चित्रकला किंवा भाज्या कापणे या गोष्टी शिकवाव्यात. या गोष्टींबद्दल त्यांच्या मनात आवड निर्माण करावी. या मुलांना पुढे समाजात ताठ मानेने जगता आले पाहिजे.

प्रश्न : एका घटनेत आईवडील आपल्या ऑटीझम मुलीबरोबर विमान प्रवास करणार होते. तेव्हा त्या मुलीला प्रवास नाकारण्यात आला याचे कारण काय?
उत्तर : ही ऑटीझम मुले काही वेळा किंचाळतात. इकडेतिकडे धावतात. त्यामुळे समाजात त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण झाला आहे. या मुलांना आजुबाजुचे भान नसते. विमान प्रवासात धोका निर्माण होऊ नये या दृष्टीकोनातून त्या ऑटीझम मुलीला विमान प्रवास नाकारण्यात आला.

प्रश्न : अमेरिकन प्रेसिडेन्ट ओबामा यांनी प्रचाराच्या भाषणात ऑटीझमचा उल्लेख केला होता ...
उत्तर : होय. अमेरिकेत ऑटीझम हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रेसिडेन्ट ओबामा यांनी आपल्या भाषणात ऑटीझमसाठी किती निधीचा वापर करु हे सांगितले होते. कारण या प्रश्नाला तसे गांभीर्य आहे.

प्रश्न : आपल्याकडे ऑटीझमच्या शाळा किती आहेत? काही खाजगी शाळा उघडण्यात येत आहेत का?
उत्तर : आपल्याकडे ऑटीझमचे प्रमाण पूर्वीपेक्षा खूप वाढले आहे. भारताच्या लोकसंख्येपैकी मुंबईची लोकसंख्या १ कोटी ८० लाख असून त्यापैकी ८० हजार ऑटीझम व्यक्ती असू शकतात. आपल्याकडे ऑटीझमच्या शाळा अत्यल्प आहेत. त्या वाढल्या पाहिजेत.

प्रश्न : ऑटीझम मुलांसाठी वेगळी भाषा वापरावी लागते का?
उत्तर : होय. त्यांना भरपूर शब्द दाखवावे लागतात. हे गाजर आहे, हे फ्रिज आहे अशा अनेक वस्तू बोटाने दाखवाव्या लागतात. त्यांच्या बरोबर ठराविक भाष्य करावे लागते. परंतु याला आपण भाषा म्हणू शकत नाही. कारण संभाषणात एखाद्या व्यक्तीने बोलल्यानंतर दुसरी व्यक्ती त्या संभाषणास अनुसरुन बोलते. समजा आपण या मुलांना असे शिकविले की, निघताना बाय-बाय करायचे. तर ती व्यक्ती तेवढेच करते. याला 'आर्टीफिशल इंटेलिजन्स' म्हणतात. एखाद्या नॉर्मल मुलाला हे माकड आहे किंवा हे गाजर आहे, असे सांगितल्यानंतर त्या मुलाच्या मेंदूत माकडाचा रंग, माकडाचा आकार, गाजराचा रंग व आकार अशा अनेक गोष्टी साठवल्या जातात.

जाणीवा एकत्रित होणे व त्यांचा परस्पर संबंध प्रस्थापित होणे या गोष्टी नॉर्मल मुलाच्या बाबतीत घडतात. परंतु ऑटीझम मुलाला हे सफरचंद आहे हे कळायला काही महिने लागतात. ही मुले स्वत:च्या विश्वात दंग असतात. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतात. नॉर्मल मुलांच्या शाळेत त्यांना घातल्यावर पालक तक्रार करतात की, आमच्या मुलाकडे दुर्लक्ष होते. कारण ऑटीझम मुलावर शिक्षक जास्त लक्ष केंद्रीत करीत असतात. या मुलांसाठी प्रत्येकी एका शिक्षकाची गरज आहे. दिल्ली येथे 'ऍक्शन फॉर ऑटीझम' ही संस्था कार्यरत आहे. ऑटीझम मुलाचे आईवडिल हवालदिल झालेले असतात. त्यांना आपण एकटे नाहीत. आपल्या पाठीमागे कोणीतरी आहे, असे वाटले पाहिजे. पूर्वी दहा हजार मुलांमध्ये ऑटीझमचे प्रमाण चार होते ते आता साठ झाले आहे. पंधरापटीने हे प्रमाण वाढले आहे. प्रदुषण, तणाव यामुळे हे प्रमाण वाढले आहे.

प्रश्न : ऑटीझम मुलांच्या पालकांनी काळजी कशी घ्यावी?
उत्तर : काही वेळेला आईवडील मुलाकडे दुर्लक्ष करतात किंवा ऑटीझम झाला आहे हे कबूल करीत नाहीत. ऑटीझम झाल्यानंतर आईवडिलांचे सर्व आयुष्य बदलून जाते. त्यांना नैराश्य येते. त्यांनी स्वत:ला आनंदी ठेवले पाहिजे. कारण मुले त्यांना न्याहाळत असतात व आईवडिलांची वृत्ती आपल्या अंगात बाणवित असतात. आईवडिलांनी ऑटीझमकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. त्यांनी सिनेमा बघावा, हसावे, वाचन करावे आणि हे करीत असताना आपल्या ऑटीझम मुलाची काळजी घेत रहावी. त्यामुळे चांगला परिणाम दिसून येतो.

ऑटीझम असणार्‍या मुलावर लहानपणीच उपाय केले नाही तर प्रौढ वयात ते रस्त्यावरुन आपल्याच तंद्रीत एकटेच फिरताना दिसतील. श्रीमती चित्रा अय्यर यांचा 'फोरम फॉर ऑटीझम' आहे. रिस्पाइट केअर सेंटरची आपल्याला गरज आहे. ऑटीझमबाबत जाणीव जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.

प्रश्न : श्रीमती सुहास मालदे यांनी ऑटीझम मुलांसाठी बरेच काही केले आहे. याबद्दल आपण काय सांगाल?
उत्तर : श्रीमती सुहास मालदे यांनी ऑटीझम मुलांसाठी निवासी शाळा उघडण्यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. सुरुवातीला जागेचा शोध घेतला. बर्‍याच प्रयत्नानंतर आसनगाव येथे जागा मिळाली. भरपूर बैठका घेतल्या. चर्चा केली. त्यांनतर निवासी शाळा सुरु करण्यात आली. ऑटीझम मुलांसाठी शाळा निघाल्या पाहिजेत. लेख व चर्चा यामधून ऑटीझमचा प्रसार व जागृती होणे तितकेच आवश्यक आहे.