शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: गुरूवार, 30 ऑक्टोबर 2014 (12:49 IST)

कोमातही सचेतन असतो मेंदू

मेंदूच्या गंभीर दुखापतीमुळे कोमात गेलेला रुग्ण भलेही डोळे उघडे ठेवून पाहत असल्यासारखे दिसत असला तरी आसपासच्या परिस्थितीबाबत तो अनभिज्ञ असतो, असेच आतापर्यंत डॉक्टर मानत आले आहेत. मात्र कोमात गेलेल्या लोकांच्या मेंदूमध्येसुद्धा चेतना असू शकते, असा दावा केंब्रिज विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केला आहे. या संशोधनामुळे ज्या रुग्णांमध्ये वास्तवात चेतना आहे, पण संवाद साधण्यास ते असर्मथ आहे, त्यांची ओळख करण्यास मोठी मदत होऊ शकेल, अशी शास्त्रज्ञांना आशा आहे. शास्त्रज्ञांनी निष्क्रिय अवस्थेमध्ये पडलेल्या १३ रुग्णांवर संशोधन करतेवेळी त्यांच्या मेंदूच्या नसांच्या विद्युतीय हालचालींचे आकलन करण्यासाठी एक इलेक्ट्रोडचा वापर केला.

ज्यावेळी या रुग्णांच्या मेंदूच्या नसांतील विद्युतीय पॅटर्नची तुलना निरोगी लोकांसोबत केल्यावर १३पैकी चार रुग्णांच्या मेंदूच्या नसांतील विद्युतीय पॅटर्नमध्ये बरीच समानता होता. या प्रयोगाच्या दुसर्‍या टप्प्यामध्ये शास्त्रज्ञांनी या चार रुग्णांना टेनिस खेळण्याच्या कल्पनेची सूचना करत त्यांच्या मेंदूला एमआरआय मशीनद्वारे स्कॅन केले. त्यात असे दिसून आले की, त्यातील तीन रुग्ण एवढे सचेत होते की, ते सूचना समजू शकत होते आणि त्यांचे पालन करण्याचा निर्णय घेऊ शकत होते. कार अपघात वा घातक ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतरही काही लोक जागृत असल्यासारखे दिसतात, पण ते बेशुद्धावस्थेत असतात आणि बोलण्यासही असर्मथ असतात. अशा रुग्णांच्या मेंदूच्या अवस्थेस डॉक्टर निष्क्रिय घोषित करतात. मात्र हल्लीच रुग्णांच्या या लक्षणांवर प्रश्न उपस्थित करत असे रुग्णही जागरूक असू शकतात, पण ते बोलू शकत नाहीत, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. या प्रयोगांमुळे रुग्णाची समस्या व त्यावर उपचार करण्यास मोठी मदत होऊ शकेल.