शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

डॉक्टर्स डे विशेष

डॉक्टर आणि देव या एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत असे समजण्याचा एक काळ होता. मात्र आता व्यवसायिक जगात डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातही व्यवहारिक नाते निर्माण होऊ लागले आहे. फॅमिली डॉक्टर ही संकल्पनाही संपुष्टात येऊ लागली आहे. यात समाजव्यवस्थाच दोषी दिसत आहे. वैद्यकीय व्यवसाय केवळ डॉक्टरांच्या हातात न राहता औषध उत्पादक कंपन्या, विविध तपासण्या करणार्‍या लॅब आणि विमा कंपन्यांच्या हातात गेल्याने वैद्यकीय व्यवसाय एका दुष्टचक्रात अडकू पाहात आहे.

एका बाजूला ग्राहक संरक्षण कायदा आणि दुसर्‍या बाजूला रुग्णहित. या संवेदनशील कात्रीत डॉक्टर अडकले आहेत. याचा बर्‍याचवेळा विचार होत नाही. रुग्णांना कमीत कमी आर्थिक मोबदल्यात उत्तम सुविधा पुरविण्याच्या धावपळीत डॉक्टरांची दमछाक होते आणि त्यांचा ताण वाढतो. ही बाबही ‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने लक्षात घ्यायला हवी.

1995 सालापासून डॉक्टर व रुग्ण यांच्या नातत ग्राहक संरक्षण कायद्याने रितसर प्रवेश केला व रुग्ण हा डॉक्टरांचा झाला तर डॉक्टर हा वैद्यकीय सेवा देणारा विक्रेता बनला. त्यामुळे साहजिकच रुग्णांच्या कुटुंबातील एक घटक बनलेला देण्या-घेण्यापलीकडचा असलेला फॅमिली डॉक्टर व्यावसायिक बनला. त्यामुळे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवादच हरवला आहे. सुपर स्पेशलायझेशन, कट प्रॅक्टिस यासारख्या गोष्टींमुळे डॉक्टर-रुग्ण यांच्यात दुरावा वाढत चालत आहे. अशाही परिस्थितीत आपल्या सहृदयतेने पेशंटस्ना आपलेसे करणारे डॉक्टर आपल्या आसपास आहेत, पण त्यासाठी तथाकथित ‘बडय़ा’ (महागडय़ा) हॉस्पिटलची क्रेझ विसरायला हवी.

आजच्या ‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने रुग्ण व डॉक्टरांचे परस्पर संबंध अधिकाधिक निकोप होऊन घट्ट व्हावेत आणि हे आमचे डॉक्टर व हा माझा पेशंट ही सुहृद्य भावना अधिक रुजावी-फुलावी यासाठी डॉक्टर, रुग्ण, नातेवाईकांनी प्रयत्न करायला हवेत.

डॉक्टरांच्या प्रतिक्रिया

रुग्णांशी एकरुप व्हायला हवं
‘त्या पेशंटच्या जागी मी असतो तर’ हा विचार डॉक्टरांच्या मनात यायला हवा. त्यासाठी संस्काराचा पाय मजबूत असला पाहिजे. असे झाले तर आपोआप रुग्णांशी एकरुपता साधता येते. त्यामुळे रुग्णांची पिळवणूक करण्याचा स्पर्शही त्या डॉक्टरांच्या मनाला स्पर्श करणार नाही. रुग्णांची आत्मीयतेने चौकशी करायला हवी. त्यामुळे आपोआप त्याच्या परिस्थितीचा अंदाज येतो. सामान्य, गरीब, शेतकरी कुटुंबातील रुग्णाला कमी खर्चात सेवा देऊन सामाजिक दायित्वही निभावता येऊ शकते. मात्र यासाठी रुग्णांशी एकरुप व्हाला पाहिजे.
* डॉ. शिवरत्न शेटे

विश्वासार्हता हवी  
अलीकडे वैद्यकी क्षेत्राला व्यावसायिक स्वरुप आल्याने फॅमिली डॉक्टर ही संकल्पना कालबाह्य झाली आहे. मात्र रुग्णांशी कौटुंबिक, जिव्हाळचे नाजूक आणि हळुवार संबंध जपणारी फॅमिली डॉक्टर ही संकल्पना जपली पाहिजे. त्यासाठी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये विश्वासार्ह संबंध असले पाहिजेत. बाजारीकरणाच्या युगात डॉक्टर-रुग्ण हे संबंध जपले पाहिजेत. त्यासाठी डॉक्टरांनी नैतिकता अन् रुग्णाने नीतीमत्ता जपायला हवी तरच विश्वासार्ह संबंध निर्माण होतील.
* डॉ. किरण पाठक

शपथेचे पालन कसोशीने व्हावे 
प्रत्येक डॉक्टरला नोंदणी करताना शपथ दिली जाते. या शपथमध्ये डॉक्टरांची कर्तव्ये, त्यांचे आचरण, त्यांची रुग्णाप्रती असणारी भावना या गोष्टी असतात. जर शपथेचे पालन झाल्यास सर्व वैद्यकीय सेवा चांगल्या दर्जाची होईल. अलीकडे सर्वच क्षेत्रात पैशासाठी पळापळ सुरू झाली आहे. नीतिमत्ता घसरत चालली आहे. जागतिकीकरणाचा हा परिणाम असून त्याचे लोण वैद्यकीय क्षेत्रातही पसरत आहे. हे टाळण्यासाठी डॉक्टरांचे काम आता सन्मानजनक झाले पाहिजे. रुग्ण सेवा हेच आपले कर्तव्य मानले पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच मंडळी या पद्धतीची आहेत असे नसून याला अपवादही आहेतच. त्यांच्याकडे अद्यापही फॅमिली डॉक्टर ही संकल्पना राबविली जात आहे. मात्र आज पैशासाठी ‘रॅट रेस’ (उंदरासारखी पळापळ) सुरू आहे. त्याला आळा बसला पाहिजे.
* डॉ. एच. आर. राठोड

रोग होण्यापूर्वी काळजी घ्या  
मनुष्याला कोणताही रोग अचानक येत नाही. त्याची सुरुवात पूर्वी कुठेतरी झालेली असते. यासाठी रोग होण्यापूर्वी प्रतिबंधक उपाय योजले पाहिजेत. त्यासाठी प्रत्येकाने व्यायाम, आहार व वजन याकडे लक्ष देणे आवश्क आहे. अलीकडे प्रत्येकजण संगणकाशी जोडला आहे. त्यामुळे खेळ, व्यायाम बंद झाले आहे. याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. विशेष म्हणजे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार हे सगळे आहार व्यायाम याच्या विनियोजनाने वाढत आहे. यासाठी नागरिकांनीच प्रतिबंधात्मक उपाय योजणे आवश्यक आहे. यासाठी डॉक्टरांची जेवढी जबाबदारी आहे तेवढी नागरिकांचीही आहे. नागरिकांनी यात आपला सक्रिय सहभाग दिल्यास आरोग्य उत्तम राहणार आहे.
डॉ. भास्कर पाटील

रुग्णाकडे गिर्‍हाईक म्हणून पाहू नये
अलीकडे आपला फॅमिली डॉक्टर ही संकल्पना मोडीत निघाली असून काही वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी रुग्णाकडे गिर्‍हाईक म्हणून पाहात आहेत. डॉक्टरांनी आपल्या ज्ञानाचा उपोग रुग्णाला स्वास्थ्य देण्यासाठी करावा. आपण लुटले जातो की काय अशी भावना त्याच्या मनात निर्माण होत आहे. हे सर्व टाळावाचे असेल तर रुग्णाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्याच्याबरोबर वैद्यकीय क्षेत्र हे सरकारने आपल्या ताब्यात ठेवणे आवश्यक आहे. खाजगी क्षेत्राचा वैद्यकीय क्षेत्रात सहभाग वाढल्याने वैद्यकीय शिक्षणापासून ते सुविधांपर्यंत सर्व गोष्टी महाग होत असून त्याचा फटका गोरगरीब जनतेला बसत आहे.
* डॉ. सुरेश खमितकर

जनतेनेही सतर्क राहावे 
सार्वजनिक आरोग्य सेवेच्या बाबतीत सरकार प्रयत्नशील असतेच. मात्र त्याबरोबरच जनतेनेही सतर्क राहिले पाहिजे. रोग होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय योजणे गरजेचे आहे. आपल्या देशात 80 टक्के जनता गरीब आहे. या गरीब जनतेच्याच आरोग्याची हेळसांड होत आहे. तसेच सार्वजनिक आरोग्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. त्यासाठी आरोगबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. विविध सामाजिक संस्था यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांना जनतेचेही सहकार्य आवश्क आहेच. त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला तर सामाजिक संस्थांच्या कार्यास अधिक व्यापकता येईल आणि विश्वासार्हताही निर्माण होणार आहे.
* डॉ. सरोज बोल्डे

गैरसमज नसावा 
डॉक्टरांनी रुग्णांना अन् नातेवाईकांना त्या आजाराबाबत आणि खर्चाबाबत पूर्ण माहिती द्यायला हवी. रुग्णाने कोणतीही माहिती अपुरी देऊ ने. त्यामुळे डॉक्टर-रुग्ण यांच्यात गैरसमज होणार नाहीत. शक्यतो उपचार पद्धती, खर्च आणि वैद्यकीय बिल याबाबत स्पष्ट कल्पना द्याला हव्यात.
* डॉ. विद्याधर सूर्यवंशी