शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

दमा म्हणजे काय?

MHNEWS
दमा सर्वांनाच होऊ शकतो परंतु त्याची सुरुवात लहानपणी होते. पुन्हा पुन्हा श्वास अडकणे किंवा सतत दम लागणे अशा प्रकारच्या लक्षणातून प्रकटणार्‍या या रोगाच्या त्रासाची वारंवारता व तीव्रता व्यक्तीवर अवलंबून असते. श्वसनमार्गाचा दाह झाल्यामुळे श्वसनमार्गातील चेतातंतूचे अधिक ज्वलन होते. म्हणून या प्रकारच्या दमाच्या त्रासादरम्यान श्वसनमार्गाच्या आतील त्वचा सुजल्यामुळे फुप्फुसात जाणार्‍या हवेचा प्रवाह कमी होतो.

कारणे :-
दमा बरा होऊ शकत नाही. परंतु दमा नियंत्रित करता येतो. दमा होण्याची प्रमुख कारणे म्हणजे बालवयामध्ये घरामधील (अतिसूक्ष्म धुलीकणांनी तसेच झुरळ, उंदीर, मांजर, फर्निचर इ.) प्रदुषणांशी येणारा घनिष्ट संबंध, अनुवांशिक दम्याचा त्रास तसेच अंडी, शेंगदाणे व दुग्धजन्य पदार्थांची लहान मुलांना होणारी ऍलर्जी.

आपण लहान मुलांना द्यावयाच्या अन्नपदार्थांची दैनंदिन नोंद केल्यास कुठल्या अन्नपदार्थाने दम्याचा त्रास होतो हे ओळखता येईल. मुलांना होणार्‍या ऍलर्जिक दम्याचे परिक्षण केलेले नसल्यास ते त्वरित करणेही आवश्यक आहे.

तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ व त्याचा धूर तसेच रासायनिक पदार्थांशी आपापल्या कामाच्या ठिकाणी येणारा संपर्क हा अतिरिक्त अपायकारक घटक आहे.

इतर त्रासदायक घटक म्हणजे काही औषधे (ऍस्प्रीन व तत्सम स्टेरोईड नसलेली औषधे), मुलाचे जन्मसमयी कमी असलेले वजन आणि श्वसनमार्गावरील जंतुप्रादुर्भाव, तणाव व शारीरिक कष्टामुळे दमा होऊ शकतो तसेच हवामानातील बदल (थंड हवामान) किंवा दमटपणा यामुळेही दम्याचा विकार बळावतो.

वाढते शहरीकरण हे दम्याचे प्रमुख कारण बनत आहे. अजूनही घरातील ऍलर्जिक घटकांचा पूर्ण अभ्यास न झाल्यामुळे यातील धोक्याची संपूर्ण कल्पना आपल्याला आलेली नाही.

उपाययोजना :-
दमा हा आजार दीर्घकाळ त्रास असल्यामुळे त्याला सातत्यपूर्ण वैद्यकीय देखभालीची आवश्यकता असते. साधा ते तीव्र दमा असलेल्या व्यक्तींनी दीर्घकाळ व दैनंदिन औषधे घेतल्याने दम्याच्या त्रासातून काही प्रमाणात मोकळीक मिळू शकते. दम्याची लक्षणे दिसल्यावर अल्पकालीन औषधांच्या उपाययोजनातूनही त्वरीत आराम पडू शकतो.

दम्याचे नियंत्रण फक्त औषधोपचारांनी करता येत नाही. ह्या व्यक्तींनी दम्याच्या त्रासाला सुरुवात करुन देणार्‍या तसेच श्वसनमार्गावर परिणाम करणार्‍या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांच्या रोगांमुळे बळी पडणार्‍यांसारखे दम्याने मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण नसले तरीही औषधोपचार न करणे तसेच दम्याचे गांभीर्य न समजणे यामुळे दम्याने मृत्यू ओढवू शकतो. बर्‍याचवेळा तो रूग्णालयाच्या बाहेरच होतो.

 
ND
यासाठी घेण्याची काळजी :-

या विषयाबद्दल जनसामान्यांमध्ये जाणीव निर्माण करून रूग्ण व वैद्यक व्यवसायिकांना या प्रश्नाचे गांभीर्य समजावून सांगणे.
ऍलर्जी व त्यातून निर्माण होणार्‍या या रोगाबद्दल व ते न होण्यासाठीच्या उपाययोजनाबद्दल संबंधितात जागृती निर्माण करणे.
विभागवार दम्याच्या विविध प्रकारातील कारणे समजून घेण्याकरीता संकटकालीन मदत केंद्र उभारणे तसेच ती चालवणे.
दम्याच्या व्यवस्थापनात व दमा होऊ नये म्हणून एक उपाययोजना निश्चित करुन ती प्रत्यक्षात राबविणे.
दम्याच्या नियंत्रणामध्ये व उपाययोजनांमध्ये नव्या कल्पनांसाठी संशोधनास प्रवृत्त करणे.
दम्याच्या व्यवस्थापनाकरीता तसेच दमा होऊ नये म्हणून ऍलर्जिक आजारांच्या संदर्भात त्याच्या लक्षणांवर अनुभवांवर आधारीत उपाययोजना बनविणे.
वैधक व्यावसायिकांना ऍलर्जिक आजारांच्या दम्याशी असलेल्या संबंधाबद्दल जागरुक करणे.
सर्वसामान्य नागरिकांना ह्या ऍलर्जी किंवा दम्यामुळे येऊ शकणार्‍या मृत्युच्या शक्यतेबाबत जागरुक करणे.
विशेषत: लहान मुलांना होणार्‍या धोक्याबद्दल माहिती देणे. तसेच त्यांच्या डॉक्टरांना याबाबत जागरुक करणे.
उत्तम शिक्षण व प्रत्यक्ष संवाद याद्वारे आपण जवळ जवळ २५००० बालमृत्यु थांबवु शकतो. दम्याच्या विकारापासून यशस्वीरीत्या दूर राहण्यासाठी खालील तीन गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे.
ऍलर्जीमुळे होणार्‍या रोगांमधील दमा हा अत्यंत सहजपणे होणारा धोकादायक व प्रसंगी मृत्युदायक रोग आहे.
आजपर्यंत दुर्लक्षित असलेल्यांपैकी, ऍलर्जिक रोग हा दम्याच्या रूग्णांसाठी सर्वात मोठा धक्का आहे.
ऍलर्जिक रोगांवर प्रथमपासून उपचार करणे हा दमा टाळण्यावरचा उत्तम उपाय आहे. ऍलर्जिक रोग म्हणजे नाकातील त्वचेचा दाह करणार्‍या ऍलर्जिक गोष्टीमुळे होणारा रोग ऍलर्जिक रोग हा वंशपरंपरागत, ऋतुमानाप्रमाणे किंवा आपल्या व्यवसायाशी संबंधीत रोग आहे.