शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

‘औषध’ म्हणून काजू खायलाच हवे !

WD
दुधाच्या खिरीमध्ये घालण्यासाठी, गोड शिर्‍यामध्ये आणि बिर्याणीत वापरण्यासाठी म्हणून स्वयंपाकघरात काजू शिल्लक ठेवलेला असतो.

काजूच्या फळाला बाहेरून येणारी ‘बी’ भाजून, फोडून त्यातून काजूचे दोन तुकडे निघतात. काजू सर्वांना सुपरिचित असा सुकामेवा आहे. चवीनं तुरट, गोड असलेला काजू गुणानं उष्ण, लघू आणि धातुवर्धक आहे. वात, कफ, पोटातला गोळा, ताप येणं, कृमी, व्रण या तक्रारीत उपयुक्त आहे.

अग्निमांद्य, त्वचारोग, पांढरे कोड, पोटदुखी, मूळव्याध, पोटफुगी इत्यादि विकारांचा काजू नाश करतो.
पायाला चिखल्या झाल्या असतील तर त्या ठिकाणी काजूच्या बियांचा चिक लावावा म्हणजे चिखल्या बर्‍या होतात.
जनावरांच्या पायांना विशेषत गायी, म्हशींना एक प्रकारचा उपद्रव होतो. त्याला ‘लाळ्या’ म्हणतात. यामुळे पाय सुजून गुरांना चालता येत नाही. या तक्रारींवर काजूच्या बियांचा चिक लावला असता त्रास कमी होतो.
मण्यार नावाच्या सर्पविषावर उपयुक्त असा एक काजूचा पाठ ग्रंथामधून सांगितलेला आहे. त्वचेवर एखादी गाठ तयार होऊन सूज चढते, लाली येते आणि खूप त्रास होतो. अशा वेळी काजूचा कच्चा गर त्या गाठीवर गरम करून बांधावा त्यामुळे गाठ फुटून निचरा होतो आणि जखम लवकर बरी होते.
पोट फुगून पोटात दुखत असेल तर काजूचं पिकलेलं फळ घेऊन देठाकडील बाजू कापावी. त्यात जिरेपूड आणि मीठ घालून ते फळ खायला द्यावं. हा उपाय सलग चार-पाच दिवस करावा. यामुळे भूक वाढून पचन सुधारतं आणि तोंडाला चव येते.
खारवलेला किंवा तिखट काजू खाण्यास रुचकर असतात. काजू किमतीनं महाग असल्यानं सर्वसामान्यांना परवडत नाही. तथापि कृश व्यक्तींना काजूमध्ये असणारे स्निग्ध घटक उपयुक्त ठरतात आणि त्याचे दौर्बल्य कमी करून शक्ती वाढवतात.

- डॉ. सुनील बी. पाटील