शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By वेबदुनिया|

अनेक तक्रारी दूर करणारा ओवा!

आपल्याला अपचन झालंय. पोटात गॅस झालाय, तर ओवा खा. तुम्हाला तात्काळ आराम पडतो. पाचक ओवा अनेक तक्रारी दूर करीत असल्याने औषधांमध्ये त्याला महत्वाचे स्थान आहे.

ओवा चवीला आंबट, कडवट, उष्ण आणि थोडासा तिखट असतो. वात, तसेच कफ दोषाचे शमन करतो, पोटात वायू धरणे, उदररोग, जंत आदींवर रामबाण ठरतो.ओव्याच्या सेवनाने भूक वाढते, त्यामुळे जेवणामध्ये याचा वापर नियमितपणे करावा. ज्या लोकांना भूक लागत नाही, त्यांच्यासाठी ही पद्धत अत्यंत फायदेशीर सिद्ध होऊ शकते. कफ कमी करण्यासाठी ओवा उपयोगी पडतो. पाणी उकळून ओवाचा रस घ्यावा. मात्र तो थंड झाल्यावर सेवन करावे. यामध्ये तुम्ही साखरही मिसळू शकता.

छातीत कफ तयार झाल्यास भाजलेला ओवा मधातून घेतल्याने आराम मिळतो. दात दुखीमध्येही ओवा हितकारक ठरतो. दात दुखी थांबविण्यासाठी लवंग तेलात ओव्याचे तेल मिसळून वेदना होत असलेल्या दातावर एक-दोन थेंब टाकावे. पोटात गॅस तयार झाल्यामुळे होणाऱ्या वेदनांपासून सुटका करून घेण्यासाठी ओव्याला हलक्या आचेवर तव्यावर भाजून घ्यावे. नंतर हा भाजलेला ओवा एखाद्या कापडात किंवा विड्याच्या पानावर टाकून पोटावर ठेवावे किंवा पोटाला बांधावे. यामुळे पोटदुखीचा त्रास कमी होतो.

तुम्हाला डोकेदुखीचा त्रास असेल तर ओवा फायदेशीर ठरतो. डोकेदुखी असल्यास किंवा मायग्रेनचा झटका आल्यावर ओव्यापासून तयार केलेल्या पावडरचा वास घेतल्याने रुग्णाला आराम मिळतो. तर ज्यांना दम्याचा त्रास असेल त्यांनी ओवा गरम करून एका छोट्याशा कापडात बांधावा आणि छातीवर ठेवावा. यामुळे रुग्णाला उष्णता मिळेल आणि थंडीपासूनही बचाव होईल.

पोटाशीच्याबाबतीत काही समस्या असल्यास रुग्णाला चहामध्ये ओवा टाकून पिण्यास द्यावा. यामुळे रुग्णाचा त्रास कमी होतो. ओव्याचे सेवन केल्याने छातीतील जळजळ, डायरिया, मळमळणे, उलटी येणे आणि अॅलसिडीटीपासून सुटका होते. आर्थरायटीसमध्ये गुडघा किंवा शरीराच्या इतर सांध्यात होणा-या वेदनेतून सुटका करून घेण्यासाठी ओव्याचे तेल त्या भागावर लावल्यास उत्तम.