गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. आयपीएल लेख
Written By अभिनय कुलकर्णी|

आयपीएल'वर प्रभाव ऑस्ट्रेलियाचाच

'आयपीएल'मध्ये आतापर्यंत १४ सामने खेळले गेले आहेत. पण त्यातील १२ सामन्यात परदेशी खेळाडूंना 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार मिळाला आहे. भारतातर्फे वीरेंद्र सेहवाग (९४) व युसूफ पठाण (६१) यांनाच हा मान मिळाला.      
'भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सुरू केलेल्या इंडियन प्रिमीयर लीगमध्ये भारतीय खेळाडूंना परदेशी खेळाडूंपेक्षा जास्त बोली मिळाली. पण मिळालेल्या पैशाला हे खेळाडू अजिबात जागलेले नाहीत. उलट बहुतांश परदेशी खेळाडूंनी आपल्या पैशाचा पुरेपूर मोबदला आपल्याला 'विकत' घेणार्‍या संघांना दिला आहे. त्यामुळे ट्वेंटी ट्वेंटीचा विश्वकरंडक जिंकणारा भारतीय संघ आता विविध संघांतून वाटला गेला तरी कामगिरीतून शोधून काढला तरी दिसत नाहीये.

या स्पर्धेत ट्वेंटी ट्वेंटीतील आतापर्यंतचे सगळ्यात वेगवान शतक झळकावण्याचा मान ऑस्ट्रेलियाच्या एडम गिलख्रिस्टने मिळवला. या पठ्ठ्याने ४२ चेंडूत नऊ षटकार व तेवढेच चौकार तडकावून हा पराक्रम केला. त्याच्या या खेळीने मुंबई इंडियन्सला पार चिरडून टाकले आणि त्या संघाचा न खेळणारा सचिन तेंडूलकर पव्हेलियनमध्ये हताश होऊन हे सारे पहात होता.

'आयपीएल'मध्ये आतापर्यंत १४ सामने खेळले गेले आहेत. पण त्यातील १२ सामन्यात परदेशी खेळाडूंना 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार मिळाला आहे. भारतातर्फे वीरेंद्र सेहवाग (९४) व युसूफ पठाण (६१) यांनाच हा मान मिळाला.

या संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत तरी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचेच वर्चस्व राहिले. भलेही ते कोणत्याही संघांकडून खेळत का असेना. हेडनची दणकेबाज खेळी कोणत्याही भारतीय खेळाडूला जमलेली नाही. तिकडे गिलख्रिस्टने राजस्थान रॉयल्सच्या तोंडचे पाणी पळवले होते. पण राजस्थानचा कर्णधार आणि ऑस्ट्रेलियाचाच माजी खेळाडू शेन वॉर्नने तो सामना जिंकून दिला. गिलख्रिस्टचे ताजे उदाहरण तर समोरच आहे. गोलंदाजीतही ब्रेट लीचा ठसा उमटला आहे.

पण भारतीय खेळाडूंचे कुठे नामोनिशाणही दिसत नाही. संस्मरणीय खेळी कुणीही केली नाही. सहा कोटी रूपये मोजलेल्या धोनीचा संघ जिंकत असेल, पण इतर खेळाडूंच्या तुलनेत त्याची खेळी काय आहे?

आतापर्यंत झालेल्या १४ सामन्यातील 'टॉप स्कोअरर'-
न्यूझीलंडचा ब्रॅंडन मॅकुलमने तीन सामन्यात खेळून सर्वाधिक १८७ धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सविरूद्ध त्याने १५८ धावांची खेळी केली होती. त्याच्या नावे १५ षटकार व १५ चौकार आहेत. ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कणा आहे. त्याने १७६ धावा केल्या आहेत. एका सामन्यात 'मॅन ऑफ द मॅच' झालेल्या हेडनने २२ चौकार व ६ षटकार फटकावले आहेत.

  या स्पर्धेचे एक वैशिष्ट्य म्हणजे यातून कळत नकळत प्रांतवादही डोके वर काढतो आहे. वीरेंद्र सेहवागने दक्षिणेत जाऊन दमदार खेळी करूनही त्याचे तिकडे कौतुक होत नाही.      
श्रीलंकेचा स्टार फलंदाज कुमार संगकाराने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना एकूण १७२ धावा तडकावल्या आहेत. तो या क्रमवारीत तिसर्‍या क्रमांकावर आहे. १६२ धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन चौथ्या, याच देशाचा एंड्र्यू सायमंड्स १६१ धावांनिशी पाचव्या, पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचाच गिलख्रिस्ट १५३ धावा बनवून सहाव्या क्रमांकावर आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार युवराजसिंह १३८ धावांनिशी सातव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माईक हसी चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना १२१ धावा जमवून आठव्या, राजस्थान रॉयल्सकडून खेळत असलेला दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ १२० धावंनिशी नवव्या आणि मुंबई इंडियन्सचा रॉबिन उत्थप्पा ११८ धावा बनवून दहाव्या क्रमांकावर आहे.

टॉप टेनमध्ये फक्त दोन भारतीय
या दहा फलंदाजात फक्त युवराज सिंह व रॉबिन उत्थप्पा हे दोनच भारतीय आहेत. बड्या भारतीय खेळाडूंपैकी ट्वेंटी-२० च्या विश्वविजेत्या संघाचे नेतृत्व करणारा महेंद्रसिंह धोनी (कर्णधार चेन्नई सुपर किंग्ज), सौरव गांगुली, राहूल द्रविज, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्याकडून असलेल्या अपेक्षा आतापर्यंत तरी फोल ठरल्या आहेत. दिल्ली डेअर डेव्हिल्सचा कर्णधार वीरेंद्र सेहवाग अवघ्या एका सामन्यात चमकला. धोनीने तीन सामन्यात केवळ ७५, सौरव गांगुलीने ३६, राहूल द्रविडने ३४ आणि लक्ष्मणने चार सामन्यात ५४ धावा केल्या आहेत. बड्या खेळाडूंचा हा स्कोअर त्यांना साजेसा आहे?

या स्पर्धेचे एक वैशिष्ट्य म्हणजे यातून कळत नकळत प्रांतवादही डोके वर काढतो आहे. वीरेंद्र सेहवागने दक्षिणेत जाऊन दमदार खेळी करूनही त्याचे तिकडे कौतुक होत नाही. त्याचवेळी दक्षिणेचा श्रीसंत उत्तरेत जाऊन काही यश मिळवतो तर त्याच भूमीतल्या हरभजनसिंहला ते सहन होत नाही आणि चक्क बुक्का मारण्यापर्यंत त्याची मजल जाते.

हे काय चालले आहे? भलेही आज ते वेगळ्या संघांकडून खेळत आहेत. पण त्यांना आयुष्यभर भारतीय संघासाठी खेळायचे आहे. त्यावेळी ते काय करतील? तिथेही प्रांतवाद दिसून आला तर हा संघ एकजिनसी राहिल काय? या सगळ्या प्रकाराविषयी तुम्हाला काय वाटते?