शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By वेबदुनिया|

इंटरव्ह्यू मोलकरणीचा

PR
अग शरयू मी बोलतेय. काय ? आज इंटरव्ह्यू आहे ना ! चल मी निघते. हो अन् तुझ्या मोलकरणीलाही पाठव हं!
अपर्णा घरी येते, दारावरची बेल वाजते.
अपर्णा - थांबा, उघडते.
(समोर रखमा मी कामवाली. अग बाई किती अपटूडेट अन् मेकप पण केवढा ! मनात म्हटलं कोण म्हणेल हिला कामवाली ! हळूच आपल्या साडीकडे बघून घेतलं.)
रखमा - मी रखमा जी ! 24 फ्लॉट मधल्या मेमसाबजीनी तुमचं काम सांगितलंय ना म्हनून आली. अं. कोन त्या बेलसरे?
रखमा - नाही जी. त्या मोठ्ठं नाव हाय त्यांचं
अपर्णा - बरं, असू दे. हे बोल काम काय काय करशील? काय घेशील अन् केव्हा येशील ?
 
PR
रखमा - बघा बाई, मी त्या 24, 25, 28 फ्लॉट मधी काम करतो. एका ठिकाणी हजार, दुसर्या ठिकाणी दीड हजार अन् तिसर्या ठिकाणी पाचशे रुपये नुसता भांडी अन् स्वयंपाक घर पुसतो. दोन घरी झाडू पोछा अन् भांडे अन् पुसण पासणं.
अपर्णा - हे बघ रखमा माझ्याकडे पोछा लावायचा अन् भांडी घासायची सकाळी मी झाडून ठेवते काय घेणार?
रखमा - साहाशे रुपये जी. अन् दोन वाजे पावेता येणार. आठ दिवसांत एक सुट्टी. मग आजारी वगैरे मिळून सहा एक सुट्ट्या होतात, डॉक्टरकडे जाव लागत मला तपासाले.
अपर्णा - हे बघ चारशे देईन. सुट्ट्या कमी करायच्या आणि 12 वाजेपर्यंत काम करून जायचं. 12 नंतर मी शाळेत जाते.
बाई मला कसं जमंल. माझे साहेब कामावर गेल्यावर मी घरून निघतो, तवा अकरा वाजते. मग 24 फ्लॅट मधे 1 वाजतो, 25 मध्ये 2 तर होतातच आनी तिसर्या घरी 3 वाजते. त्या नंतर तुमच्या कडे येनं जमंल.
अपर्णा - हो का गं मग मी दूसरी बघते. रखमा जाते. थोड्या वेळात सखू बाई येतात.
अपर्णा - कोण आलं काम करायला? काय नाव?
सखूबाई - हो जी म्या सखूबाई. त्या पांढरीपांडे बाई आहे ना! त्यांनी पाटवलय. म्हने जा गं बाई त्यांना लई त्रास होतोये काम करायला. खूप मोलकरणी झाल्या, कूनी बी टिकत नाही तर तू कर बाई.
(हो का ग मला वाटलच कि जातांना रखमा काही तरी हिला बोलेल. तेव्हा हिला तिनं पढवल असणार. पण बाई वागायला बरी दिसली.)
अपर्णा - म्हटलं सखूबाई काम काय करणार? काय घेणार अन् केव्हा येणार?
सखूबाई - बाईजी, मी पहिले जी घर है ती करून मग दोन वाजे पावतो येऊ सकतो. घेणार आठशे रुपये बघा धुनं भांडे, झाडू पोछा अन् इतर वरचे काम - बघा जी. माझ काम साफ है. कटकट आवडत नाही मले. आणि आठ दिवसाने दोन सुट्या करतो म्यॉ.
अपर्णा - अगं मला 12 नंतर बालक मंदिराला जायचं असतं. तुझी यायची वेळ कशी जमणार! शिवाय रेट सुद्धा खूप सांगतेस बघ. भांडी धुणं अन् पुसणं सहाशे देईन.
सखूबाई - केल बी असतन बाई पर वेळ जमणार नाही बघा. त्या पांढरीपांडेच्या आधी जातो त्यांच्या शेजारी. तवा एक वाजतोन, मग म्यॉ पांढरीनबाई कडं जातो. गेल्या बरबर आधी टी. व्ही बघतो कारन त्याबी बघत असतात ना! कामगार विश्व. मग आम्ही दोघी त्या व रिडस्कसन करतो. त्या बाई लई छान समजवतेत. समस्यांवर उपाय काय? त्या सोसल वर्कचं काम करतेत ना! आली असती पर वेळ जमनाय नाय. बर बाई येतो म्यॉ!
तिसरी - अर्चना - बाई पाहिजल नां तुम्हाला. मला तांबे बाईंनी पाठवलंय.
अपर्णा - हो का -- ये काय नाव तुझं, काय काम करशील, काय घेशील अन् केव्हा येशील?
अर्चना - बाई तुम्ही सांगा कंवा येऊ अन् घ्यायच म्हणाल तर तुम्ही जे द्याल ते आजकालच्या रेट प्रमाणे.
अपर्णा - ठीक आहे झाडू पोछा, धुण भांडी अन् पुसपास करायची. पाचशे देईन.
अर्चना - कितिक जन हायती.
अपर्णा - आम्ही तिघं आहोत.
अर्चना - बरंय येईन जी. लवकरच आठ-साडेआठ ला येऊन मग सर्व करून नंतर जाईन दुसर्या कामांवर.
अपर्णा - ठीक आहे ये मग उद्यापासून.
तेवढ्यात दारात तिला कुणी तरी भेटते
( झालं आता ही तिला भेटून शिकवणार नक्कीच. तेवढ्यात ती आत येते - पण येताना असं काही तिच्याकडे बघते की जणू हिचं काम तिनं हिसकावून घेतलंय.)
आत येऊन सोफ्यावर सरळ बसते.
अपर्णा - काय बाई, कोण तू?
मी शालू जी. मला आता वाटेत दोघी बाया भेटल्या. त्यांनी सांगितलं तुम्हाला कामवाली हवी हाय. तर काय काय काम हाय?
बाई जरा तम्माखू देता का? अन् पाणी बी द्या.
अपर्णा- बरं देते पाणी. तंबाखू आमच्याकडे खात नाहीत. आत जाता जाता लक्षात येत की कामापेक्षा ठसकाच जास्त दिसतोय. गाण म्हणणं काय आरसा बघणं काय अन् पूर्ण पदर पाडून नीट करणं काय? बरं तर घरात कुणी नाहीये म्हणून बरं.
शालू - बोला जी तुमी- मला तुम्ही काय देणार केव्हा यायचं. पण एक सांगू का थोड वाढवा जी. महागाई किती झाली हाय अन् तुम्ही अर्चनाला ठरवली असंन ना. तर तिच्या भरूशावर रहू नका जी. ती तुम्हाला दोन दिवस वाट पाहायला लावेल, अन तिसरे दिवस येईल पहायला, ठेवली का कुनी बाई. महा काम टाळू हाय ती, रस्तेवर बोलत बसल नाही, तर कुना बाई कडे गप्पा करत बसंन. माझं तसं नाय झटपट काम करून गेलं. हा मग बोला काय देणार.
अपर्णा - सहाशे देणार.
शालू- बाई - सहाशे तर सहाशे. पर रोज सकाळी नाश्ता द्याल बाई. म्यॉ खूप लांबून येतू बस पकडून.
अपर्णा - मग नाही गं जमणार सकाळीच आठ ते साडेआठला मला दोन डबे करावे लागतात. रोजच नाश्त्याचं नाही जमणार
(कारण मला एका बाईचा अनुभव होता. ती यायची मग खायला बसायची आर्धा पाऊण तास. मग हळू हळू काम. तीन तास लागायचे. त्यात आणखी काहींची हातचलाखी. काम चुकारपणा वगैरे वगैरे. मी दुसरी बघते अस सांगितलं. तणतणत गेली
खरं तर मी इतकी थकून गेले होते, काम झाली आणि आता या बाया ठरवण शाळेला तर सुट्टीच द्यावी लागली.
दुसर्या दिवशी कुठून कुठून दोघी तिघी आल्या. एकीने तर सुचविलं पण बाई मी येईन आठ वाजता तुम्ही मला चाबी देऊन जात जा. मी मनात म्हटल म्हणजे ही घर भर मनसोक्त वावरणार आणि बाहेर अशा घर संभाळणार्या बायकांबद्दल बरंच काही ऐकलं होतं.
तर ७-८ जणींचे इंटरव्हयू झाले आणि शेवटी मुलगा व यजमान यांच्या पुढे दोन प्रस्ताव मांडण्याचे ठरवले. 1. नोकरी सोडणार 2. रोजाने बाई ठेवायची. आली नसेल त्या दिवशी हॉटेलचा डबा किंवा बाहेर जेवायचं. नाहीतर थोडक्या कामासाठी ठेवायची बाई अन सर्व काम तिघांनी मिळून करायचे. हे ठरवल्यानंतर जरा मनाला शांती मिळाली. अन् जरा विश्रांती घ्यावी म्हणून वळले तोच बेल वाजली.
परत नवी मोलकरीण का? नको ग बाई ते ठरवणं अन् आशा लावून घेणं.