मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By वेबदुनिया|

नावाचे महत्त्व

फार पूर्वीच्या काळचे गुरुकुल होते. तेथील ऋषिवराकडे दगडू नावाचा एक शिष्य होता. साहजिकच सारेजण त्याला दगडोबा, दगड्या, दगडू अशा नावांनी हाक मारायचे. त्यामुळे दगडूला खूप वाईट वाटायचे. इतर शिष्यांची नांवे खूप छान छान होती.

एक दिवस तो ऋषिवराजवळ गेला आणि म्हणाला, ''गुरुजी, ह्या दगडू नावाची मला लाज वाटते. माझे नावं बदलून दुसरे ठेवा ना!. '' आचार्यांनी क्षणभर दगडूगडे पाहिले. ते विचारात पडले. काही वेळातच त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आले.

'ठीक आहे' गुरुजी म्हणाले. मला तू एक काम कर, आजूबाजूच्या नगरात, गावांमध्ये फिरून तुझ्या आवडीच्या नावाचा तपास कर. मग आपण तुझे हे दगडोबा नाव बदलून तुझ्या आवडीचे नाव ठेवू! ठीक?

'ठीक आहे गुरुजी' असे म्हणून दगडू गुरुजींना वंदन करून आश्रमाबाहेर पडला. हळूहळू तो एका नगरात पोहोचला, रस्त्यावरून त्याला एक प्रेतयात्रा दिसली. मृतकाचे प्रेत तिरडीवर बांधून लोक त्याला स्मशानात घेऊन चालले होते.

'ह्याचे नाव अमर' उत्तर मिळाले.
' काय म्हणता? अमर नांव तरी हा मेला? '
'अरे वेड्या नांव काही असले तरी मरावेच लागते एका ना एक दिवस. नाव केवळ ओळखीपुरतं असतं. '
दगडू विचारात मग्न होवून पुढे निघाला. गावाच्या मध्यभागी पारावर एक स्त्री हुंदके देऊन रडत होती. दगडूला तिची दया आली. 'ताई तुम्ही रडता का? '
त्याने सहज विचारले.
'अरे बाळा, मजपाशी एक फुटकी कवडी नाही. आता खायचे काय? कोण देईल या विचाराने मला रडू आले. ' ती म्हणाली.
तुमचे नांव काय? दगडून विचारले.
धनलक्ष्मी ती स्त्री म्हणाली.
'धनलक्ष्मी नावं आणि बाई निर्धन, अजबच आहे. ' स्वत:शीच पुटपुटत दगडू पुढे निघाला.
पुढे एक मंदिर लागले, त्या मंदिराच्या पायरीशी एक भिकारी भिक्षापात्र पसरून येणाऱ्या जाणाऱ्याकडे भीक मागत होता. सहज दगडूने त्या भिकाऱ्याला नाव विचारले.
माझे नाव भगवान. भिकारी म्हणाला.

अरे, भगवान म्हणजे देव. देवाला का भीक मागावी लागते? अचंभ्याने दगडू म्हणाला.
वेडाच आहेस, नावात काय असतेऊ ते तर फक्त ओळखीपुरते भिकारी हसत म्हणाला.
दगडू पुढे चालत होता. पुढला गाव भूकंपाने उध्वस्त झालेला होता. तेथे एक माणूस दु:खी चेहऱ्याने उदास असला होता. दगडूने त्याची चौकशी केली.
'माझे घरदार, आई वडील, बायको, मुले सर्व भूकंपामुळे नष्ट झाली. आता मी तरी जगून काय करू? ' तो माणूस दु:खाने म्हणाला.
'तुझे नाव काय? ' दगडूने चौकशी केली.
माझे नाव अशोक तो माणूस म्हणाला.
दगडू विचारमग्न झाला, 'अशोकाच्या नशिबात शोक! अजबच आहे! ' तो स्वत:शीच पुटपुटला.
मग सावकाश चालत चालत दगडू पुनश्च आश्रमात परतला. त्याचे तोंड हिरमुसलेले होते.
'काय रे, आवडते नाव शोधलेस का? ' गुरुजींनी चौकशी केली.
गुरुजी, नावात काही अर्थ नसतो, अमर सुद्धा मरतो, धनलक्ष्मी निर्धन असू शकते, भगवान भीक मागतो तर अशोकाच्या वाट्याला शोकच येतो. नाव म्हणजे केवळ ओळख पटवण्याचे साधन, त्यात काही अर्थ नाही. त्यामुळे मला दुसरं नावं नकोच! मी दगडू आहे तोच बरा आहे. मी माझ्या कर्तबगारीने मोठा होईल. फक्त तुमचा आशीर्वाद असावा. ' दगडू म्हणाला.
'तथास्तु! ' गुरुवर मंदस्मित करीत म्हणाले.