गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालकथा
Written By वेबदुनिया|

अकबर-बिरबल कथा : आपण गासडी चोरली नाही

WD
एकदा कापसाच्या वखारीत काम करीत असलेल्या सात-आठ नोकरांपैकी एकाने बरीच मोठी कापसाची एक गासडी चोरली आणि पैसे घेऊन कोणाला तरी विकली. ही गोष्ट मालकाला समजल्यावर त्याने सर्वांना दम देऊन विचारले, प्रत्येक जण 'आपण गासडी चोरली नाही,' असी शपथ घेऊन सांगू लागले. शेवटी वैतागून मालकाने हे प्रकरण बिरबलाकडे नेले.

बिरबलाने सर्व नोकरांना आपल्याकडे बोलवून एका रांगेत समोरच उभे केले. त्या सर्वांना एकदा पाहून तो खो खो हसत सुटला. त्याच्या मालकाला खोटेच म्हणाला, ''मालक, ज्या नोकराने डोक्यावर ठेवून कापसाची गासडी पळविली, त्याच्या मुंडाशाला कापूस लागलेला आहे. त्याने तो झटकण्याची काळजी न घेतल्याने तो आयताच आपल्या हाती लागला.

बिरबलाने असे म्हणताच ज्या नोकराने चोरी केली होती, तो आपले मुंडासे चाचपडू लागला. लागलीच 'हाच कापूसचोर असणार,' हे बिरबलाने ओळखले आणि त्या नोकराला फटक्यांची धमकी देताच त्या नोकराने कापसाची गासडी चोरून नेल्याचे कबूल केले.