मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By वेबदुनिया|

अकबर-बिरबल कथा : थोडं-फार येतं

आधी न कळवता आजारी बिरबलाला पाहण्यासाठी अचानक बादशहा त्याच्या घरी गेला. घरापुढील अंगणात प्रवेश करता-करता, बिरबलच्या तिथेच खेळत असलेल्या दहा-बारा वर्षांच्या मुलीस बादशहाने उर्दूत विचारले, ''बेटी, तुझे वडील घरात आहेत का?'' 

बादशहाच्या याच नाही, तर आणखी दोन-तीन उर्दूत विचारलेल्या प्रश्नांना बिरबलच्या त्या चुणचुणीत मुलीने अगदी योग्य अशी समर्पक उत्तरे उर्दूतूनच दिली. ती उत्तरं ऐकून त्याने तिला विचारले,
''बेटी, तुला उर्दू बोलता येतं वाटतं?''
त्यावर बिरबलकन्या म्हणाली, ''थोडं-फार येतं.''
तेव्हा बादशहानं विचारलं, ''थोडं-फार म्हणजे किती?''

यावर बिरबलाची मुलगी म्हणाली, ''महाराज, ज्यांना उर्दू फार येतं, त्यांच्याशी तुलना केली तर मला 'थोडं, येतं आणि ज्या लोकांना ते अगदीच 'थोडं' येतं, त्यांच्याशी तुलना केली तर, मला ते फार येतं.'' बापाचे चातुर्य बेटीतही सहीसही उतरलेले पाहून बादशहाने कौतुकाने तिची पाठ थोपटली.