शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालकथा
Written By wd|
Last Modified: शनिवार, 26 एप्रिल 2014 (14:44 IST)

आईसिक्रमची महती

आईस्क्रिम कोणाला नाही आवडत? उन्हाळच्या तापलेल्या दिवसात गारेगार आईस्क्रिम खाणं म्हणजे एक अवर्णनी आनंद असतो. त्याचे वेगवेगळे फ्लेअर्स आणि प्रकार पाहिले की, कुठला खाऊ आणि कुठला नको असं होऊन जातं. सगळ्यांच्या आनंदाचं कारण ठरणारं हे आईस्क्रिम पहिलं कधी तार झालं, हे तुम्हाला ठावूक आहे का?
 
आईस्क्रिमला खूप जुना इतिहास आहे. पर्शियामध्ये उन्हाळ्याच्या ऋतूत लोक द्राक्षाचा रस बर्फावर  घालून खात असत. उन्हाळ्यापासून सुटका करण्यासाठी लोक बर्फ आणि द्राक्षाच्या रसाचं हे मिश्रण जमिनीतल्या याकचाल म्हणून ओळखल जाणार्‍या भांडय़ात साठवून ठेवत असत. बर्फवृष्टी व्हायची तेव्हा टेकडय़ावरुन बर्फ जमा करून या याकचालमध्ये ठेवला जाईल. जमिनीतील याकचालच्या वर मातीचा ढिगारा असे. हे याकचाल पर्शियन लोकांनी तयार केलेला एक प्रकारचा फ्रीजच होता. त्यात तयार होणारे आईस्क्रिम हे कँडीसारखं होतं. त्याकाळचे रोमन सम्राट निरो आपल्या नोकरांना बर्फ आणण्यासाठी उंच टेकडय़ावर पाठवायचे. तो बर्फ जेवणानंतर फळांवर घालून खाण्याचीही  पध्दत होती. इजिप्तचे राजे फैरोही अशा प्रकारे बर्फ आणि फळाचं मिश्रण खायचे. हे सगळे आईस्क्रिङ्कचे प्राथङ्किक प्रकार म्हणाला हवेत.
 
आता आपण दूध किंवा क्रीमपासून बनवलेलं आईस्क्रिम खातो ते सर्वप्रथम इसवी सन पूर्व 200 मध्ये चीनमध्ये तयार झालं. त्यावेळी चीनमध्ये दूध आणि तांदूळ, फळांचा रस गोठवून तपासून मिठाई बनवली जात असे. त्यानंतर अनेक शतकानी साधारण बाराव्या शतकात मार्को पोलो या इटालिअन खलाशाने चीनला भेट दिली. दूध, तांदूळ आणि फळांचा रस घालून बनवलेला हा गोठवलेला पदार्थ मार्को पोलोला खूप आवडला आणि त्याने त्याची पाककृती इटलीला नेली. आज इटलीचं जिलेटो आईस्क्रिम जगभर प्रसिध्द आहे.
 

सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये चार्ल्स पहिला या राजाच्या काळात त्याच्या स्वयंपाक्याने चिनी    पाककृती वापरून आईस्क्रिम बनवलं आणि ते त्याने शाही मेजवानीमध्ये मिष्टान्न म्हणून पाहुण्यांना दिलं. ते सगळ्यांना खूप आवडलं. आपल्या दरबारात पाहुण्यांना दिलेल्या या आईस्क्रिमची पाककृती कुणाला कळू नये यासाठी चार्ल्स पहिला याने आचार्‍याला भरपूर लाच दिली. इंग्लंडमध्ये निर्माण झालेल्या सामाजिक असंतोषातून चार्ल्स पहिला याचा शिरच्छेद करण्यात आला आणि त्यानंतर आईसक्रिमच्या पाककृतीचं रहस्य जगासमोर आलं.
 
मूळचे पर्शिन राज्यकर्ते असलेल्या मुघलांनी भारतावर राज्य केलं. तेव्हा तेही हिंदकुश पर्वतावरुन बर्फ आणत आणि शाही मेजवानीत ते पर्शिअन पध्दतीप्रमाणे बर्फावर फळांचा रस घालून खात असत. या काळात या आईस्क्रिमबाबत थोडीफार माहिती भारतीयांनाही मिळाली. पर्शिया, रोम, चीन, इजिप्त, इटली यासारख्या देशातून आईस्क्रिमची कीर्ती जगभर पसरली. एकोणिसाव्या शतकात आईस्क्रिम हा जगातला सर्वात महाग पदार्थ होता आणि फक्त उच्चभ्रू लोकांनाच आईस्क्रिम खाणं परवडत असे. विसाव्या शतकात जेव्हा रेफ्रिजरेटर सर्वसामान्य लोकांना परवडेल एवढय़ा दरात उपलब्ध झाला. तेव्हा कुठे आईस्क्रिमचे दर कमी झाले आणि आईस्क्रिम दुकानातसुध्दा मिळू लागलं. आईस्क्रिमचा शोध पर्शिया, चीनमध्ये लागला असला तरी आजच्या काळात आइस्क्रिमचं सगळ्यात जास्त उत्पादन आणि विक्री अमेरिकेत होते आणि सगळत जास्त आईस्क्रिम खाणारा देशही अमेरिकाच आहे.