बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By

बाल कथा : देव सर्वत्र आहे

पाठशाळेत गुरूजी मुलांना शिकवत होते. ते म्हणाले, देव सर्वत्र व्यापक आहे. पृथ्वी, पाताळ, जमीन आकाश, जळ, स्थळ, घर, जंगल, झाड, दगडधोंडे, रात्रंदिवस, सकाळ संधकाळ या सर्व स्थानी तो आहे. भगवंताविना काहीही नाही. ते सर्वत्र पाहात व ऐकत असतात. त्यांना  नकळत कुणी काही करू शकत नाही. त्या उपदेशाचा सर्व मुलांवर परिणाम होत होता. त्या छात्रगणात एक शेतकर्‍याचा बालक होता. 
 
तो शाळा सुटताच घरी आला. गुरूच्या उपदेशाचा मात्र तो सतत विचार करीत असे. त्याच्या वडिलांनी म्हटले की बेटा! चल आपल्याला एक काम करावायचे आहे आणि मुलास त्याने सोबत नेले. बापाने म्हटले आपली गाय उपाशी आहे. चारा हवा आहे. इथे कुणी नाही मी गायीकरीता चारा कापून आणीत आहे. जास्त मिळाल्यास विकून पैसे आणू. तू येथे कुणी येत आहे का हे पाहात उभा राहा. 
 
मुलगा राखण करीत तेथे बसला. बाप चारा कापण्‍यास जवळच्याच शेतात गेला. मुलाने विचार केला की, तो परमेश्वर सर्वत्र आहे तो सर्व काही पाहात आहे. हे आपल्या बाबांना माहीत नाही का? बाप गवत कापत असता त्याने मुलाला विचारले कुणी पाहात आहे का? आता त्या मुलास बोलण्यास संधी मिळाली. त्याने म्हटले, बाबा, येथे या जागी तुम्ही व मी दोघेच आहोत. येथे दुसरा कुणी माणूस नाही. 
 
आपले काम पाहाण्यास कुणी माणूस दिसत नाही पण बाबा आमच्या गुरूजींनी सांगितले की, वर खाली, आत बाहेर, जलस्थळी, सर्वत्र तो देव व्यापलेला आहे आणि तो देव सर्वत्र सर्व काही पाहात असतो. 
 
त्या बालकाच्या या सांगण्याने बापावर मोठा प्रभाव पडला आणि त्या दिवसापासून बापाने हे चोरीचे र्का सोडून दिले. आपली चूक त्यास   समजून आली.