शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By

मंदिरात दोष पाहु नयेत

एकदा श्री टेंबे स्वामी सरस्वती मंदिरात पूजेस बसले असता कुणीतरी मंदिरात नैवेद्यासाठी प्रसादाचे पंचपक्वानांचे ताट आणून दिले.
 
 प्रसादाचे ताट पाहून तेथील ब्राम्हण पुजा-याचा मोह अनावर झाला. त्याने ते नैवेद्याचे ताट त्वरित खाऊन टाकले. तेव्हा श्री टेंबे स्वामी सरस्वती त्याच्यावर फार चिडले. त्याला खूप बडबडले व नंतर पुजेस बसले. 
 
पुजा संपल्यावर श्री गुरु दत्ताञेय गाभाऱ्यातून निघून जाताना त्यांनी पाहिले. त्यानंतर तीन दिवस त्यांना श्री गुरु दत्ताञेयांनी दर्शन दिले नाही. ते बैचेन झाले. त्यांना कळले मी पुजा-याला टाकून बोललो म्हणून श्री गुरु दत्ताञेयांना राग आला असणार.
 
 तेव्हा श्री टेंबे स्वामी सरस्वतींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तसेच त्यांच्या मुखातून करुणाञिपदीचे बोल बाहेर पडले. 
 
' शांत हो श्रीगुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता । 
शांत हो श्रीगुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता ।।' 
 
करुणाञिपदीचे हे बोल ऐकून श्रीगुरु दत्ताञेय श्री टेंबे स्वामी सरस्वतींच्या समोर उभे राहिले. 
 
तेव्हा श्री टेंबे स्वामी म्हणाले, "देवा माझे काही चुकले असे मला वाटत नाही. तुला नैवैद्य दाखवायच्या अगोदर त्या पुजा-याने तो खाऊन टाकला". 
 
तेव्हा श्री गुरु दत्ताञेयांनी प्रश्न केला, " इथे सत्ता कोणाची ? " ह्या प्रश्नावर श्री टेंबे स्वामी म्हणाले, " देवा इथे सत्ता तुमची आहे. इथे सारे तुमच्या इच्छेने चालते ". त्यावर श्री गुरु दत्ताञेय म्हणाले, "अरे तो पुजारी गेली तीन दिवस उपाशी होता. त्याच्यासाठी मी ते ताट पाठवले होते. ते त्याने खाल्ले. त्यात तुझे काय गेले ?" त्यावर श्री टेंबे स्वामी सरस्वतींना आपली चूक कळली व श्री गुरु दत्ताञेय अंतर्धान पावले. 
 
 
 
या अध्यात्मिक मार्गात प्रामाणिकपणे वाटचाल करणार्‍या माणसाची देवाकडून गुरु कडून क्षणाक्षणाला परीक्षा बघितली जाते. इतका हा मार्ग कठीण आहे. 
 
टेंबे स्वामी हे अधिकारी पुरुष होते एका रागामुळये त्यांची ही अवस्था झाली. आपण तर सामान्य माणस आपण जर राग आवरु शकलो नाही तर आपली आयुष्यभराची साधना व्यर्थ ठरु शकते. 
 
आपण ज्या मंदिराला जातो तेथे एकच गोष्ट लक्षात ठेवावी, त्या मंदिरात त्या देवाची सत्ता असते. तिथे काय घडते ते पाहू नये. तिथे चालणाऱ्या सर्वच गोष्टींकडे त्या देवतेचे लक्ष असते. मंदिरातील सेवेकरी, पुजारी, विश्वस्त यांचे सर्व कृत्य त्या देवाला माहीत असते. 
 
ज्या ठिकाणी ईश्वरी शक्तीचे सत्तेचे अधिष्ठान असते तेथे सामान्य माणसाने फक्त ईश्वरी इच्छेचा आदर करावा.