गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Updated : शुक्रवार, 20 जून 2014 (13:51 IST)

मुलांचे छंद खोलीत जपा!

चार-पाच खोल्यांच घरामध्ये हॉल आणि किचन वगळता मुलांसाठी वेगळ्या खोलीचे प्रयोजन करणे अगदी शक्य आहे. मुलांसाठी वेगळी रूम असणे ही आज गरजच होत आहे. आज मुलांचे बालपण बदलत आहे. सर्वागिण विकास होण्यासाठी एकाचवेळी त्यांना अद्ययावत शिक्षण दिले जाते, एखाद्या खेळाचे प्रशिक्षण मिळते, त्याला एखाद्या कलेची जोड असते. या सर्वअंती दिवसाअखेर घरी येणार्‍या प्रत्येक सदस्याला आवश्यक विश्रंतीची आणि एकांताची गरज असते. प्रत्येकाला वेगळी रूम असल्यास ही गरज आपोआपच भागते. घरखरेदीबरोबरच घराची सजावट करतानाही हा विचार महत्त्वाचा ठरतो.

विशेषत: मुलांची खोली सजवताना एक विशेष दृष्टिकोन बाळगणे आवश्यक असते. लहान मुलांच्या आपल्या खोलीच्या सजावटीविषयी बर्‍याच चित्रविचित्र कल्पना असतात. कोणाला आपल्या खोलीतले फर्निचर कारच्या आकाराचे हवे असते तर कोणाला बेडचा आकार एखाद्या वाद्यासारखा हवा असतो! बहुतेक मुलांना क्रिकेटचे वेड असते.

त्यामुळे फर्निचरमध्ये क्रिकेटमधील साहित्याचा आकारही अपेक्षित असतो. खोलीचे डेकोरेशन करताना मुलांच्या या सर्व इच्छांना मान राखणे सहज शक्य आहे. दोन मुले रूम शेअर करणार असल्यास दोघांच्याही इच्छांचा मान राखावा. यामुळे त्यांचे खोलीतील वास्तव् सहचर्याचे राहण्यास मदत होऊ शकते. फर्निचर उठावदार रंगात सजवल्यास खोलीला आकर्षक रूप प्राप्त होते. मुलांच्या खोलीत जास्तीत जास्त कपाटे असावीत. कारण मुलांचा पसारा कधीच आवरण्याजोगा नसतो. शालेय साहित्य, खेळाचे साहित्य वेगवेगळ्या छंदाचे साहित्य याशिवाय कपडय़ांची भरताड यामुळे मुलांची खोली सतत पसलेली असते शिवाय यातील कुठलीही गोष्ट टाकून देण्याला मुलांचा विरोध असतो. त्यामुळे जास्तीचे साहित्य मावेल असे माळे आणि कपाटे अवश्य करून घ्यावीत. फर्निचर करताना त्याचे कोपरे गोलाकार असावेत. यामुळे दुखापत होण्याची शक्यता कमी होते.

सतत मस्ती करण्याची मानसिकता लक्षात घेता मुलांच्या खोलीतील प्रत्येक साहित्य दणकट आणि सुरक्षित असावे एका खोलीत दोन मुले राहणार असल्यास ‘बंक बेड’ चा पर्याय उपलब्ध आहे. हा बेडदेखील वेगवेगळ्या आकारात तयार करता येतो अथवा रेडिमेड मिळतो. यामुळे जागेचा योग्य वापरही होतो. मुलांना ग्रहतार्‍यांचे आकर्षण असते. छतावर, ग्रहतार्‍यांचे स्टिकर्स चिटकवल्यास ही हौसही भागू शकेल. या खेरीज एखादी भिंत कोरी ठेवल्यास मुले त्यावर मनसोक्त चित्र काढू शकतात. भिंतीवर एखादा डिस्प्लेबोर्ड लावल्यास मुले तिथे आपले लेखन, कार्यानुभवाचे प्रोजेक्ट, क्राफ्ट आर्टिकल्स, ओरीगामी आदी लावू शकतात.

स्वाती वाळिंबे