शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शनिवार, 6 सप्टेंबर 2014 (18:05 IST)

रामनामाचा महिमा

बिरबल जसा विलक्षण बुद्धीचा होता, तसाच तो रामभक्तही होता. अकबर जिथे जिथे म्हणून जायचा तिथे तिथे बिरबल त्यांच्यासोबत असायचाच. असेच एकदा सरकारी कामानिमित्त ते प्रवासास निघाले होते. त्यांच्या प्रवासाची वाट घनदाट अरण्यातून जात होती. प्रवासाने ते आता थकून भागून गेले होते. 
 
अकबरास खूप भूक लागली होती. म्हणून तो जवळपास कुठे एखादी झोपडी दिसते का की जिथे खाण्यासाठी काही मिळेल, असा विचार करून इकडे तिकडे पाहू लागला. 
बिरबलासही तो सांगत होता की, जवळपास कुठे एखादे घर दिसते का ते पाहा म्हणून. परंतु बिरबल रामनाम जपात निमग्न होता, त्यामुळे त्याला सांगण्यात काही अर्थ नव्हता. 
 
बिरबलाकडे पाहून अकबर म्हणाला, ‘नुसते रामनाम जपाने कुठे खायला अन्न मिळते का? तू स्वत: प्रयत्न केले पाहिजेस! प्रयत्नाशिवाय तुला काहीही प्राप्त व्हावाचे नाही!’ असे म्हणून अकबराने बिरबलास त्या झाडाच्या सावलीतील जागेत सोडून तिथून दूर काही खायला मिळते का म्हणून शोधायला जायचे ठरविले. अकबर निघाला. थोडे दूर गेल्यावर त्याच्या दृष्टीस एक घर पडले. अकबर त्या घराच्या दिशेने चालला. 
 
आपला राजा अकबर आपल्या घराकडे येत असलेला पाहून त्या घरातील सर्वजण मनोमन अगदी खूश झाले. त्यांनी राजास वंदन करून स्वागत केले. घरी होते ते अन्न राजास खावायास दिले. राजाने पोटभर अन्न ग्रहण केले आणि काही थोडे बिरबलासाठी बांधून घेतले. 
 
तरूतळवटी येऊन अकबराने बांधून आणलेले अन्न बिरबलास दिले. राजा अकबर म्हणत होता, ‘हे बघ बिरबल! मी तुला म्हणालो होतो की नाही. अन्न मिळविण्यासाठी मी थोडेसे प्रयत्न केले आणि मला अन्न मिळाले. तू नुसते रामनाम जपत बसलास, त्याने काय तुला अन्न मिळाले?’
 
बिरबल म्हणाला, ‘रामनामाचा महिमा मी या आधी कधी इतक्या उत्कटतेने अनुभवला नव्हता! आपण या देशाचे शासक आहात! राजा असूनही अन्नासाठी तुम्हाला याचना करावी लागली! आणि माझ्याकडे बघा. मी तर नुसते या तरुतळवटी रामनाम जपत होतो. त्या   रामनामाने राजास माझ्यासाठी अन्न घेऊन यावास लावले! अशा प्रकारे मला इथे निवांत बसून केवळ रामनाम जपाने, दुसरे काहीही न करता, अन्नग्रहण करावास मिळाले! हाच रामनामाचा महिमा!’