गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: सोमवार, 22 जून 2015 (15:07 IST)

वेगळी कल्पना

एकदा एका व्यापाराकडे चोरी झाली. खूप शोध लावल्यावरही चोर सापडला नाही म्हणून व्यापारी आपल्या एका समजूतदार मित्राकडे पोहचला. सगळी गोष्ट ऐकून त्या मित्राने व्यापार्‍याच्या सर्व मित्रांना आणि नोकरांना बोलवणे पाठवले. सर्व एकत्र झाल्यावर त्याने सर्वांना एक-एक काठी दिली. सर्व काठ्या एकाच मापाच्या होत्या. कोणतीही लहान किंवा मोठी नव्हती.

सर्वांना काठी देऊन तो मित्र म्हणाला की आपणं ही काठी घेऊन आप- आपल्या घरी जा आणि उद्या पुन्हा येथे एकत्र व्हा. आणि हो या काठीची विशेषता आहे की ही चोराकडे जाऊन आपोआप एक बोट लांब वाढते. आणि जे जोर नाहीत त्यांच्याकडे ती आहे तशीच राहते. या प्रकारे चोर कोण आहे ते कळून येईल.

काठ्या घेऊन सर्व आपल्या आपल्या घरी निघाले. त्यात त्या व्यापार्‍याकडे चोरी करणारा चोरदेखील सामील होता. घरी पोहचल्यावर त्याने विचार केला की जर उद्या माझी काठी एक बोट मोठी झालेली सापडली तर ते मला लगेच ओळखतील आणि मला शिक्षा होईल. त्यापेक्षा मी आजचं या काठीला एका बोटाएवढी कापून टाकतो. हा विचार करतं त्याने काठी कापून तिला घासून आधीसारखं दिसेल अशी तयार केली आणि आरामात झोपून गेला.

सकाळी चोर स्वत:ला फार बुद्धिमान समजून खूश होत व्यापाराच्या मित्राकडे पोहचला. तिथे इतर सर्व लोकं ही जमा झालेले होते.

व्यापार्‍याचा मित्र एक-एक करून काठी बघायला लागला. जेव्हा चोराची काठी हाती लागली तर त्याची लांबी कमी पडली, त्यांनी चोराला लगेच ओळखून घेतले. मग त्याकडून चोरी केलेले सर्व सामान परत घेऊन त्याला पोलिसाच्या ताब्यात दिले.

व्यापार्‍याच्या मित्राची ही वेगळी कल्पना सर्वांना खूप पसंत पडली. सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचे अभिनंदन केले.