शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. लव्ह स्टेशन
  4. »
  5. प्रेमाची गोष्ट
Written By वेबदुनिया|

एका अव्यक्त प्रेमाची गोष्ट

ND
एका मुलाला कॅन्सर होता. अवघ्या महिन्याचाच तो सोबती होता. तो रोज एका सीडीच्या दुकानावर जायचा. या दुकानात एक छानशी मुलगी होती. ती त्याला फार आवडायची. मनोमन तो तिच्यावर प्रेम करायचा. सीडी आणायला गेला की तिच्याशी गप्पा मारता मारता वेळ कधी संपायचा ते त्याला कळायचंही नाही. तिच्याशी बोलायला मिळतंय म्हणून तो अगदी रोज त्या दुदुकानावर जायचा. पण आपल्या प्रेमाची अभिव्यक्ती तो कधीही करू शकला नाही. त्याचं तेवढं धाडसंच झालं नाही.

एका महिन्यानंतर दुखणं बळावलं आणि त्याचा मृत्यू झाला. तिच्यावरचं त्याचं प्रेम त्याच्या मनातच राहून गेलं.

बर्‍याच दिवस तो येत का नाही म्हणून सीडीच्या दुकानातली मुलगी एकदा त्याचा पत्ता शोधत घरी पोहोचली. घरी त्याची आई होती. आईला तिने त्याच्याविषयी विचारलं. त्या माऊलीच्या ओघळत्या आसवांनीच तिला सारं काही सांगितलं. त्याची आई तिला त्याच्या खोलीत घेऊन गेली.

त्या खोलीत गेल्यानंतर तिनं पाहिलं. सगळ्या सीडी जशा नेल्या तशाच ठेवल्या होत्या. न उघडता.

आता मात्र तिला रडू आवरेना. कारण माहितेय?

कारण तिनं त्याला लिहिलेली सगळी प्रेमपत्र त्या सीडीच्या पाकिटात तशीच राहून गेली. त्यानं न वाचता. तीही त्याच्यावर तितकंच उत्कट प्रेम करत होती. पण.....

म्हणून कुणावर प्रेम करत असाल तर त्या प्रेमाला वेळीच अभिव्यक्त करा. याबाबतीत कुसुमाग्रजांनी सांगितलेलं एवढं नक्कीच लक्षात ठेवा.

शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस,
बुरुजावरती झेंडयासारखा फडकू नकोस.

उधळून दे तूफान सगळं,
काळजामध्ये साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं,
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवूनसुद्धा,
मेघापर्यंत पोहचलेलं.

(ई-मेलमधून आलेल्या कथेचं स्वैर रूपांतर)