गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. लव्ह स्टेशन
  4. »
  5. प्रेमाची गोष्ट
Written By वेबदुनिया|

त्याच्या प्रेमाची परीक्षा!

- डॉ. यश वेलणकर

ND
तो घरात आला, कपडे बदलून हातपाय धुऊ लागला, ती घरातच होती. त्याच्या हालचाली पाहत होती. तो काही बोलला नाही; पण त्याच्या हालचाली पाहिल्यानंतर तिला जाणवले की, त्याची प्रकृती बरी नाही आहे. तिनं विचारलं, ‘बरं नाही वाटत का? डोकं दुखतं आहे?’ तो मानेनेच ‘हो’ म्हणाला. तिनं आपल्या पर्समधून एक गोळी काढून दिली. ‘चहाबरोबर ही गोळी घे, बरं वाटेल.’ त्याला खरंच बरं वाटलं
काही दिवसांनी तिची कंबर दुखत होती; पण तिला आता त्याच्या प्रेमाची परीक्षा घ्यायची लहर आली. तिला वाटले त्यादिवशी त्यानं काहीही न बोलतादेखील मला त्याचे डोके दुखते आहे, हे समजले. कारण माझं खरं प्रेम आहे त्याच्यावर. मग आज मी सांगणारच नाही, मला बरं नाही वाटत ते पाहूया. त्याला ओळखता येते का, असं स्वत:शीच म्हणून ती वाट पाहत राहिली. तो घरातच होता, टीव्ही पाहत होता अधूनमधून तिच्याशी बोलत होता. तीही बोलत होती. पण तिचं बोलणं रोजच्यासारखं नव्हतं. तिला वेदना होत होत्या. केवळ त्याची परीक्षा पाहण्यासाठी ती त्या सहन करीत होती; पण छे, वाट बघून बघून तिचं डोकंही ठणकायला लागलं; पण त्याच्या काही ते लक्षात आलं नाही.
‘तुला बरं नाही का?’ या त्याच्या प्रश्नाची ती आतुरतेने वाट पाहत होती; पण बराच वेळ झाला तरी तिची अपेक्षा पूर्ण झाली नाही. मग तिचा फणकारा सुरू झाला, ‘जळला मेला बायकांचा जन्म, नवर्‍याचे मूड सांभाळायचे; पण माझ्याकडे लक्ष आहे का त्याचं, उद्या मी मरायला लागले तरी ओरडून सांगावे लागेल त्याला मी मरते आहे आता याशिवाय लक्षात नाही येणार त्याच्या!’
असं का घडतं?
तिचे डोळे, कान त्याच्यापेक्षा अधिक तल्लख असतात. त्यामुळे ती देहबोली पटकन समजू शकते. त्यामुळेच त्याने न सांगतादेखील केवळ हालचालींवरून त्याला बरं नाही आहे, हे ‘ती’ ओळखू शकते; पण तिला असं वाटतं की, देहबोली जाणण्याची ही शक्ती सर्वांकडेच असेल म्हणूनच ती ‘त्याच्याकडून’ अपेक्षा ठेवते आणि त्याचा संबंध प्रेमाशी जोडते. पण या अपेक्षाच चुकीच्या आहेत. पुरुष या विषयात थोडे बधिरच असतात. त्यांना देहबोलीवरून दुसर्‍याच्या भावना, दुसर्‍याच्या वेदना फारशा समजत नाहीत. त्यामुळे तिच्या वेदना तिने न सांगता त्याला समजल्या नाहीत, याचा अर्थ त्याचे तिच्यावर प्रेमच नाही, असा होत नाही. ‘तिला’ बरं नाही हे तिनं स्पष्ट शब्दांत सांगितले की, तो तिला डॉक्टरकडे घेऊन जाईल, औषध देईल; पण आपली अशी परीक्षा बघितलेली त्याला आवडत नाही आणि आपण परीक्षेत नापास झालो, या विचारानं तो अधिकच चिडतो.