गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. प्रेमाची गोष्ट
Written By

विवाह : एक अ‍ॅडजेस्टमेंट

प्रेमविवाह किंवा ठरवून केलेला विवाह... कोणत्याही प्रकारचा विवाह असला तरी तो विवाह यशस्वी होतोच असं नाही. ठरवलेले विवाहही फिस्कटतात किंवा प्रेमविवाहही यशस्वी होतात. शेवटी तुमचे आचार, विचार आणि तुमची अ‍ॅडजेस्ट करण्याची तयारी यावर या गोष्टी अवलंबून आहेत.सीमा इयत्ता सातवीपासूनच प्रेमात पडली होती. पुढे त्यांचं शिक्षण झाल्यावर त्यांच्या आई-वडिलांनीदेखील तिच्या लग्नाला होकार दिला. सगळं कसं छान जणूकाही चित्रपटाप्रमाणे वाटत होतं. लग्नाला आठ महिने झाले नाहीत तोवर सीमा माहेरी आली. याचं कारण काय सांगितलं तर म्हणे आमचा दोघांचा स्वभाव एकमेकांशी पटत नाही. 
 
रेवा अगदी साधी मुलगी, कधीच कोणाशी जास्त न बोलणारी. शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागली आणि नोकरीच्या ठिकाणी तिच्यासारखाच स्वभाव असणा-या एका तिच्या सहका-याने तिला लग्नाची मागणी घातली. एकमेकांचे स्वभाव जुळत असल्याने तिने त्याला लगेच होकार दिला मात्र तो जातीतला नसल्याने तिच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला. शेवटी तिने पळून जाऊन लग्न केलं आणि आता ती दोघं सुखात नांदत आहेत. 
 
प्रिया अगदी हुशार आणि उच्चशिक्षित मुलगी. चांगल्या ठिकाणी नोकरी करणारी. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तिला तिच्याच तोलामोलाचा मुलगा तिच्यासाठी शोधला. अगदी आनंदात लग्नही पार पाडलं. बघता बघता लग्नाला तीन वर्षे झाली तरी मूल होत नव्हतं म्हणून तिच्या ‘उच्चशिक्षित’ नव-याने डॉक्टरांचा सल्ला न घेता हिलाच दोष देऊन चक्क घटस्फोट घेतला. 
 
आजकाल प्रेमविवाहांचं प्रस्थ वाढत चाललं आहे. शंभरपैकी ९५ टक्के लग्नं ही प्रेमविवाहच असतात असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. मुळात तुम्ही प्रेमविवाह करता की पारंपरिक पद्धतीने विवाह करता हा प्रश्नच मुळी उद्भवत नाही. तुमचं लग्न कितपत यशस्वी होतं हे महत्त्वाचं असतं. वर सांगितलेलं सीमाचंच उदाहरण घ्या ना! सीमाची तिच्या नव-याशी आठ ते दहा वर्षे ओळख होती मात्र एकमेकांसोबत एकत्र फिरणं किंवा मजा-मस्ती करणं हे सगळं वरवरची मजा करणं अतिशय सोपं असतं किंवा ती खूप छान वाटू शकते. मात्र जेव्हा लग्न होऊन एकमेकांसोबत राहून संसार करायची वेळ येते, कित्येक गोष्टी अ‍ॅडजेस्ट कराव्या लागतात तेव्हा कुठे लग्न या शब्दाचा अर्थ हळूहळू लक्षात यायला लागतो. लग्नाआधी केलेल्या कित्येक गोष्टी सासरी गेल्यावर बदलतात. अगदी आपल्या रोजच्या सवयीपासून ते स्वयंपाकापर्यंत कित्येक गोष्टी बदलतात. घर, घरातली माणसं, त्यांच्या सवयी, आवडी-निवडी, त्यांचे स्वभाव, त्यांच्या कलाने घेणं आदी गोष्टी अ‍ॅडजेस्ट करताना मुलीला खूप अ‍ॅडजेस्ट करावं लागतं. या अ‍ॅडजेस्टमेंटमध्ये तुमचं प्रेम कितपत टिकतं हीच खरी तुमची कसोटी असते. त्यातच तुमच्या प्रेमाचा विजय असतो. मात्र हे सगळं प्रत्येकीलाच जमतं असं नाही. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे प्रेमात पडतात आणि फिरून झाल्यावर जेव्हा प्रेम निभावण्याची वेळ येते तेव्हा त्यांची अवस्था रेवासारखी होते. 
 
लग्न म्हणजे केवळ दोन जिवांचं नाही तर दोन कुटुंबांचं मिलन असतं. म्हणूनच प्रेमविवाह जर आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय असेल तर मात्र घरचे खूप विरोध करतात. हा विरोध काळजीपोटी असला तरी लग्नानंतर तो ब-याचदा मावळलेला असतो. कदाचित मुलीच्या सासरची माणसं आपल्या मुलीशी कशी वागतात, आपल्याशी कशी वागतात त्यावरून त्यांचा विरोध मावळतो. मात्र प्रेमविवाह की ठरवून केलेला विवाह? हा वादच मुळी चुकीचा आहे. कारण अगदी ठरवून केलेल्या प्रियाचं काय झालं? ते दोघेही सुशिक्षित होते. तरीही शेवटी वेगळे झाले.
 
गौरांगीच्या बाबतीतही अगदी असंच झालं. गौरांगी आणि गौरव दोघेही उच्चशिक्षित होते. ठरवून केलेला त्यांचा विवाह. त्यांना मुलगी झाली. दोन-अडीच वर्षांची झाल्यावर त्यांच्यात मतभेद झाले आणि ते सगळं घटस्फोटापर्यंत आलं. त्याचा परिणाम त्या लहान मुलीवर होत होता. 
सहा महिन्यांनी त्यांना काय उपरती झाली कोणास ठाऊक पण गौरांगीने त्याच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. याबाबत ती म्हणते, ‘मी घरी जरा लाडाकोडात वाढलेले होते. त्यात मला काम करायची सवय नव्हती. आम्ही दोघंच राहात असलो तरी काम असायचं. मुलगी झाल्यावर एकटीने सगळा उपसा काढायचा माझ्या खूप जिवावर यायचं. घरातलं करायचं की मुलीचं करायचं असं व्हायचं. त्यात आम्ही भाड्याने राहात होतो म्हणून सगळ्याच बाबतीत अ‍ॅडजेस्ट करावं लागत होतं. 
 
बाई कोणी मिळत नव्हती. याची गौरवला काहीही फिकीर नव्हती. हे सगळं मला अजिबात सहन होत नव्हतं. त्यात आमची भांडणं व्हायला लागली. मारामारीपर्यंत प्रकरण गेलं. शेवटी घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि आईकडे येऊन राहिले. मात्र सहा महिन्यांनंतर आम्ही परत भेटलो आणि निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा आईने मला समजावलं आणि मी त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. 
आज माझी मुलगी कॉलेजला जाते तर मुलगा दहावीला आहे. लग्नानंतर अ‍ॅडजेस्टमेंट करावी लागते हे गौरांगीला उशिराच कळलं. खरं म्हणजे ते दोघंच राहात असूनही त्यांच्यात मतभेद आणि वाद होते. शेवटी दोघांनी सावरायचं ठरवलं तेव्हा कुठे सावरलं सगळं. 
 
धनश्री मात्र वेगळी होती. तिने आंतरजातीयच नाही तर आंतरधर्मीय विवाह केला होता. तेही मुस्लिम कुटुंबात आणि त्यांचं एकत्र कुटुंब होतं.धनश्रीने पळून जाऊन लग्न केलं आणि सुखात संसार केला. त्याच्या घरच्यांनादेखील तिने आपलंसं केलं आहे. ती म्हणते, ‘माझा नवरा मुस्लिम असून आमचं एकत्र कुटुंब आहे. त्यामुळे मला लग्नानंतर अ‍ॅडजेस्ट करावं लागणार याची कल्पना होतीच. लग्न कसं करायचं इथपासून सुरुवात होती. पण आम्ही दोघंही ठाम होतो. सुरुवातीला स्वयंपाक बनवून मी त्याच्या घरच्यांना आपलंसं केलं. त्यामुळे सासू आणि सासरे दोघंही खुश झाले. 
घरातल्या बाकीच्या माणसांनीदेखील मला अ‍ॅडजेस्ट केलं, त्यामुळे आमचं चांगलं पटतं. आम्ही दोघंही एकमेकांचे सण-समारंभ, यात्रा सगळं काही प्रेमाने साजरं करतो. आम्हाला एक मुलगी आहे आणि तिलादेखील आम्ही दोन्ही संस्कार देण्याचा प्रयत्न करतो. पण कोणतीच गोष्ट तिच्यावर लादत नाही. तिला जे वाटतं ते तिने करावं. 
थोडक्यात काय तर तुम्ही प्रेमविवाह करा किंवा ठरवून केलेला विवाह.. तो तुम्ही कसा टिकवता यावरच त्याचं यश अवलंबून आहे. शेवटी तुम्ही किती सुशिक्षित आहात, किती श्रीमंत आहात याला अजिबात महत्त्व नाही. तुमच्या किंवा तुमच्या आई-वडिलांच्या पसंतीलादेखील महत्त्व नसतं. तुमचे विचार, तुमचा स्वभाव आणि एकमेकांच्या गुण-दोषांसकट एकमेकांना स्वीकारण्याची तयारी यावर ते लग्नाचं यश अवलंबून आहे. कोणताही माणूस हा परिपूर्ण नसतो शेवटी त्याला समजून घेणं हेच महत्त्वाचं असतं. हे तुम्हाला जमलं तर तुम्ही यशस्वी झालात म्हणून समजा!