शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. नक्षलवाद
Written By वेबदुनिया|

सूचनांकडे दुर्लक्ष केल्‍याने मोजावी लागली किंमत!

- विकास शिरपूरकर

ND
ND
छत्तीसगडच्‍या दंतेवाडा येथील जंगलांमध्‍ये झालेल्‍या नक्षलवादी हल्‍ल्‍याने अनेक प्रश्‍न उपस्थित केले असून नक्षलवादी पूर्वनियोजन करून एवढा मोठा हल्‍ला घडवून आणू शकतात याची जाणीव असतानाही तशी खबरदारी का घेतली गेली नाही. असा मुख्‍य प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

सरकारने ऑपरेशन ग्रीन हंटला सुरूवात केल्‍यानंतर आणि तो करण्‍यापूर्वी पासून नक्षलवाद्यांच्‍या कारवायांमध्‍ये वाढ झाली आहे. आजवर झालेल्‍या प्रत्येक कारवाईत नक्षलवाद्यांनी भू-सुरूंगाचा स्‍फोट घडवून आणणे हे समान दुवा आहे. असे असताना 120 च्‍या संख्‍येने सीआरपीएफचे जवान वाहनांतून एकत्र गेलेच कसे हा प्रश्‍न अद्यापही अनुत्तरीत आहे.

नीमलष्‍करी दलाकडून कारवाईला सुरूवात झाल्‍यानंतर पहिल्‍याच दिवशी सोमवारी ओरीसात नक्षलवाद्यांनी एसओजीच्‍या जवानांची गाडी सुरूंगाचा स्‍फोट घडवूनच उडवून दिली. त्यात 11 जवान शहीद झाले. या घटनेस 24 तास उलटत नाही तोच दंतेवाडातील मुकरानाच्‍या दाट जंगलात सीआरपीएफच्‍या 120 जवानांच्‍या वाहनांना भू-सुरूंगाचे स्‍फोट घडवून उडवून देण्‍यात आले. यात 75 जवान शहीद झाले. या दोन्‍ही घटना म्हणजे नीमलष्‍करी दलाची शुद्ध आत्महत्‍याच म्हणावी लागेल.

नक्षलग्रस्‍त भागात विशेषतः जंगलात कारवाई दरम्यान ए‍कत्रित वाहने न वापरण्‍याच्‍या स्‍पष्‍ट सूचना असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर जवानांनी एकत्र जाणे म्हणजे आत्महत्‍याच म्हटली पाहिजे. जंगलांमध्‍ये कारवाईसाठी नीमलष्‍करी दलाला स्‍पष्‍ट दिशानिर्देश देण्‍यात आले असून कारवाईसाठी जाताना पायी जावे तसेच दोन ते तीन पेक्षा अधिक जवानांनी एकत्र चालू नये अशा स्पष्ट सूचना देण्‍यात आल्‍या आहेत.

जंगलात अशा कारवाईच्‍या वेळी सामूहिक वाहनांचा वापर कुठेही केला जात नाही. श्रीलंकन सैन्‍याने लिट्टे विरुद्धच्‍या कारवाईतही सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यात वाहनांचा वापर करण्‍याचे स्‍पष्‍ट पणे टाळले होते. असे असूनही त्‍याकडे दुर्लक्ष करण्‍यात आले आणि त्याची किंमत मोजावी लागली.

एकत्रित एकाच वाहनातून गेल्‍यामुळे नक्षलवाद्यांना एकाच बॉम्ब किंवा सुरूंगात मोठी जिवीत हानी करता येणे शक्य असते. अशा घटना नेहमीच घडत असतात. मात्र तरीही इतकी मोठी कारवाई करताना त्याबाबत दक्षता घेतली जाऊ नये ही बाब आश्‍चर्यकारक आहे.

नक्षलवादाशी अनेक वर्षांपासून लढत असूनही या संदर्भात निश्चित अशी दिशा ठरलेली नाही. राज्‍या-राज्‍यामध्‍ये इतर वेळी नक्षलवादा संदर्भात समन्‍वय आणि संपर्क नाहीच. मात्र तो अशा मोठ्या कारवाईच्‍या वेळी तरी असण्‍याची अपेक्षा आहे. मात्र तो देखिल दिसून येत नाही. अन्‍यथा ओरीसातील घटनेपासून आणि त्‍यापूर्वी घडलेल्‍या अशा अनेक घटनांपासून बोध घेतला असता तर एवढा मोठा हल्‍ला टाळता आला असता.