गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Updated : गुरूवार, 7 ऑगस्ट 2014 (14:48 IST)

मराठी कविता : अगदीच कंटाळा आलाय खाली वाकायचा

किती दिवस बघायच्या त्यांच्या पायाच्या भेगा
त्यांची यशस्वी वाटचाल जोखायला
किती दिवस ओशाळ हसू हसत
हात जोडायचे त्यांच्या समोर
किती दिवस झेलायची त्यांची
नकोशी आशीर्वचन
मग अगदी ठरवूनच टाकलं
नाही वाकायचं

पण नंतर काही दिवसांनी
''ताठ मान'' हा शब्दच बाहेर गेला जगातून
कोठे गेला कळलेच नाही
आणि हळू-हळू अगदी दिसेनासा झाला

मी जमवत होते कशीबशी ताठमानेविना
तर एक दिवशी काडकन आवाज आला
मला समजले, पाठीचा कणा मोडल्याचे
पण ताठ मानेची हाव काही सुटत नाहीय

हल्लीच एका जाणकाराने एक टेग अडकवलाय
हळूच माझ्या गळ्यात
''असाध्य रोगाने ग्रसित''

-अलकनंदा साने