शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी लेखक
Written By वेबदुनिया|

गॉडफादरचा जन्म

अमोल कपोले

मणिरत्नमच्या दयावान पासून, रामगोपाल वर्माच्या सत्या, सरकारपर्यंत जगभरातील अंडरवर्ल्डपटांना प्रेरणा देणार्‍या साहित्यकृतीचा जनक मारियो पुझो याचा आज स्मृतीदिन. गॉडफादर या कादंबरीद्वारे आणि तिच्यावर निघालेल्या तीन चित्रपटांद्वारे जगभर प्रसिद्गीस पावलेल्या या प्रतिभावंताने ही कादंबरी प्रकाशित होईपर्यंत कोणत्याही डॉनला प्रत्यक्षात पाहिलेलं नव्हतं, हे कुणालाही सांगून खरं वाटणार नाही. याचं कारण पुझोने चितारलेली डॉन व्हिटो कॉर्लिऑनची व्यक्तिरेखा.

अमेरिकेत स्थलांतरित होऊन आलेल्या आई-बापापोटी पुझो जन्मला. पुझोला सहा भावंडं होती. न्यू-यॉर्कमधील स्थलांतरितांच्या हेल्स कीचन या वस्तीत पुझोचं बालपण गेलं. त्याचे वडील रेल्वे ट्रॅकमन होते. बालपणातच कधीतरी लागलेला वाचनाचा नाद आणि वाचनालयांशी जवळिक पुझोला लेखनाची प्रेरणा देऊन गेली. पुझो विशीत असतानाच दुसरं महायुद्ध भडकलं आणि अमेरिकी हवाई दलातर्फे त्याची रवानगी पूर्व आशिया आणि नंतर जर्मनीत झाली.

दुसरं महायुद्ध संपल्यानंतर त्याने जर्मनीतच थांबण्याचा निर्णय घेतला. तो तेथे हवाई दलाच्या जनसंपर्काची जबाबदारी सांभाळू लागला. तेथे काही काळ घालवून तो अमेरिकेत परतला आणि न्यू यॉर्कच्या न्यू स्कुल फॉर सोशल रिसर्चमध्ये आणि नंतर कोलंबिया विद्यापीठात त्याने अध्ययन केले. याच काळात तो साहित्य व सर्जनशील लेखनाचे अध्यापन करू लागला. १९४६ मध्ये त्याने एरिका ब्रोस्के या तरूणीशी तो विवाहबद्ध झाला. १९५० साली पुझोची पहिली कथा अमेरिकन व्हॅनगार्ड या नियतकालिकात दी लास्ट क्रिसमस या नावाने प्रकाशित झाली. १९५५ मध्ये डार्क एरिना ही त्याची पहिली कादंबरी त्याच्या वयाच्या ३५ व्या वर्षी प्रकाशित झाली. त्यात एक माजी अमेरिकन सैनिक आणि एक जर्मन तरूणी यांच्यातील प्रेमकथा, ज्यात सूडाचेही मिश्रण होते, चितारण्यात आली होती.

जवळपास वीस वर्षे पुझोने न्यू यॉर्क तसेच परदेशांतही अमेरिकेच्या सरकारी कार्यालयांचा प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहिले. १९६३ पासून त्याने मुक्त पत्रकारिता व पूर्ण वेळ लेखन करण्याचा निर्णय घेतला. स्टॅग आणि मेल ही पुरूषांची नियतकालिके त्याचप्रमाणे रेड बुक, हॉलिडे, बुक वर्ल्ड या नियतकालिकांमध्ये त्याने विविध लेख, पुस्तक परीक्षणे, कथा लिहिल्या. १९६५ मध्ये त्याची दुसरी कादंबरी दी फॉर्च्युनेट पिलग्रिम प्रकाशित झाली. त्यात एका इटालियन श्रमिक महिलेचा अमेरिकी मूल्यांशी संघर्ष पुझोने चित्रित केला होता.

पुझोच्या पहिल्या दोन्ही कादंबंर्‍यांकडे वाचकांनी पाठ फिरवली असली, तरी जाणकारांनी व समीक्षकांनी पुझोचे कौतुक केले होते. १९६६ मध्ये पुझोने दी रनअवे समर ऑफ डेव्हिड शॉ ही मुलांसाठीची कादंबरी हातावेगळी केली, तरीही यश आणि किर्ती अद्याप त्याला हुलकावण्याच देत होते. पुझोच्या मनात आता व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरेल, अशी कादंबरी लिहिण्याचे विचार घोळू लागले. गुन्हेगारी विश्वाशी पत्रकारितेमुळे त्याचा संपर्क होताच. त्यात बातम्या गोळा करताना कळलेल्या माफिया जगताच्या पार्श्वभूमीवरच आपली कथावस्तू रचण्याचे त्याने ठरवले आणि त्या दृष्टीने संशोधनास सुरूवातही केली. १९६९ मध्ये गॉडफादर प्रकाशित झाली आणि पुझोचे नाव बेस्टसेलर लिस्टमध्ये झळकले.

गॉडफादरच्या गडद विश्वात पुझोने प्रेम, गुन्हेगारी, नातेसंबंध, मूल्यांचा संघर्ष अशा अनेकविध छटा मिसळल्या. पुझोने गुन्हेगारी विश्वातील अनेक व्यक्तीचा आधार कादंबरीतील व्यक्तीरेखा रंगविण्यासाठी घेतला. प्रसिद्ग अमेरिकी गायक नट फ्रँक सिनात्रावरही त्याने गॉडफादर मधील एक पात्र बेतले होते, ज्यामुळे त्याला सिनात्राच्या जाहीर शिव्या-शापांचे धनी व्हावे लागले.

पुझोने डॉन कॉर्लिऑनची व्यक्तिरेखा त्याचा मित्र ज्युल्स सीगेल याचे वडील जिमी सीगेल यांच्यावरून चितारली असा प्रवाद आहे आणि स्वतः सीगेलनेही पुझोच्या मृत्यूनंतर त्याला श्रद्गांजली वाहणार्‍या लेखात तसा उल्लेख केला असला, तरी स्वतः पुझो मात्र या व्यक्तिरेखेचं मूळ आपल्या आईत असल्याचं सांगत असे. पुझोच्या गॉडफादरवर दिग्दर्शक फ्रान्सिस फोर्ड कपोला याने चित्रपट काढण्याचे ठरवले, तेव्हा अमेरिकेतील इटालियन दबावगटाने त्यावर निर्बंध आणण्यासाठी निदर्शने केली, अखेर चित्रपटात माफिया हा शब्द वापरणार नाही, असा शब्द कपोलाने दिल्यावर ही निदर्शने थांबविण्यात आली.

गॉडफादर प्रदर्शित झाल्यानंतरचा इतिहास सर्वज्ञात आहे.

गॉडफादर कादंबरीचा जन्म चक्क एका स्पर्धेनिमित्त झाला आहे, हे फारच थोडा लोकांना माहित आहे. १९६४-६५च्या सुमारास पुझो मॅगेझीन मॅनेजमेंट कंपनीत पत्रकार म्हणून काम करीत असे. या कंपनीची अनेक मासिके होती, ज्यात प्रामुख्याने गुन्हेगारी कथा प्रसिद्ध होत. एक दिवस पुझोला सीगेल या त्याच्या मित्राने इटलीतील माफियाविषयीचा दस्तऐवज दिला व त्यावरून काही कथा विकसित करता आली, तर पहा असे सुचविले. इटलीतील एका कुटुंबाची माफिया जगतात असलेली सत्ता त्या दस्तऐवजात वर्णिली होती. मूळ अतिशय रूक्ष असलेले तपशील मारियोने आपली प्रतिभा ओतून, त्याला मानवी भावनांचा ओलावा देऊन फुलविले व एक दीर्घकथा लिहिली. वाचकांनी त्याचे भरभरून स्वागत केले, मारियोच्या लेखनाची मागणी त्यामुळे वाढली.

याच सुमारास जो लेविन या चित्रपट निर्मात्याने आपल्या आगामी चित्रपटाच्या कथेसाठी एक २३ हजार अमेरिकन डॉलर्सचे पारितोषिक असलेली कथा स्पर्धा जाहीर केली. मात्र, त्याच्याकडे आलेली एकही कथा त्याला त्या लायकीची वाटेना. याच सुमारास पुझोचे नाव गाजू लागले असल्याने लेविनसाठी स्पर्धेचे काम पाहणार्‍या साउल ब्राउन याने मारियो जर कथा लिहिणार असेल, तर आपण स्पर्धेची मुदत एक वर्षांपर्यंत वाढविण्यास तयार आहोत, असे सुचविले. हा निरोप मारियोच्या मैत्रिणीने सीगेल मार्फत त्याच्या पर्यंत पोहोचवला. मारियोही त्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करू लागला. त्याने गॉडफादरचा संक्षिप्त आराखडा ५००० शब्दांत लिहून काढला आणि ब्राउनकडे पाठविला. तो आराखडा वाचूनच ब्राउन इतका प्रभावित झाला, की त्याने तातडीने पुझोला बोलावून घेतले आणि कादंबरीचे हक्क आपण घेत आहोत, असे सांगून त्याला ऍडव्हान्स मानधनही दिले.
.. एक गॉडफादर जन्माला आला होता.

(दि.१५ ऑक्टोबर हा मारियो पुझोचा स्मृतीदिन, १९९९ साली त्याचे निधन झाले)