गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी लेखक
Written By वेबदुनिया|

पु. ल. देशपांडे

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व

८ नोव्हेंबर १९१९ (मुंबई) ते १२ जून २००० (पुणे)
शिक्षण : एम. ए., एल. एल. बी.

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे. पुल बहुरूपी होते. लेखक, नाटककार, अभिनेता, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक असा अनेक भूमिका त्यांनी वठवल्या. त्यांची कीर्ती लेखक म्हणून असली तरी त्यांची गती या सर्व क्षेत्रात सारखी होती.

'गुळाचा गणपती' या 'सबकुछ पु.ल.' म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जवळजवळ सर्वच पैलूंचे दर्शन होते.
पुलंनी मराठी माणसाला काय दिले? तर त्याच्या रोजच्या जगण्यातील गमतीदार निरिक्षणे नेमकेपणाने पकडून त्याला हसायला शिकवले.

मुंबईत जन्मलेले पुलं पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकले. ४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी महाविद्यालयात शिक्षक या नात्यानेही काही काळ काम केले. त्यांचे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील योगदान लक्षणीय आहे.

ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले. दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.

पुलंनी जवळपास 40 वेगवेगळी पुस्तके लिहिली. बटाट्याची चाळ, असा मी असा मी, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकांच्या तर 20 हून अधिक आवृत्या खपल्या. त्यांच्या लोकप्रियतेचे उदाहरण व साहित्याचा कस जोखण्याचे यापेक्षा कोणते वेगळे परिमाण असू शकते?

मराठी वाडमयाचा (गाळीव) इतिहास, खोगीरभरती, पुरचुंडी, नस्ती उठाठेव, गोळाबेरीज, हसवणूक ही त्यांची इतर विनोदी पुस्तकेही गाजली. त्यांच्या आवृत्त्यांचेही विक्रम झाले. त्यांची निरीक्षण शक्ती अफाट होती, हे त्यांनी लिहीलेल्या प्रवासवर्णनावरूनच कळेल. त्यांनी अमेरीका, युरोप, आशियातील अनेक देश पाहिले.

त्यात त्यांना प्रवासात आलेले अनुभव त्यांनी अतिशय गमतीदार पध्दतीने लिहिले आहेत. पूर्वरग, अपूर्वाई, जावे त्याच्या देशा , वंगचित्रे आदी प्रवासवर्णने आहेत. त्यांची नाटकेही अतिशय गाजली. वार्‍यावरची वरात, तुझं आहे तुझपाशी, अमलदार, सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा, फुलराणी ही काही नाटके आहेत.

याशिवाय त्यांनी लिहिलेली काही व्यक्तिचित्रेही अजरामर ठरली आहेत. गणगोत, गुण गाईन आवडी, मैत्र, आपुलकी यात पुलंनी आपल्या सुह्रदांबद्दल लिहिले आहे. पुलंच्या नावावर काही चांगले अनुवाद आहेत. द ओल्ड मॅन अॅण्ड द सी या हेमिंग्वेच्या गाजलेल्या पुस्तकाचे एका कोळीयाने या नावाने पुलंनी केलेला अनुवाद निव्वळ अप्रतिम.

याशिवाय मनोहर माळगावकरांच्या कान्होजी आंग्रे हे ऐतिहासिक व्यक्तिचित्र रेखाटलेले अनुवादीत पुस्तकही पुलंच्या नावावर आहेत. बटाट्याची चाळ व असा मी असामी चे त्यांनी एकपात्री प्रयोगही बरेच केले. बा. भ. बोरकरांच्या कविता त्यांनी व सुनीताबाई देशपांडे यांनी एकत्र वाचण्याचे कार्यक्रमही त्यांनी केले.

पुलंनी मराठी माणसाला एवढे काही दिले आहे की 'किती घेशील दो कराने' अशी त्यांची अवस्था झाली आहे. साहित्य अकादमी व संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार मिळवणार्‍या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो.

त्यांना मिळालेले पुरस्कार खालीलप्रमाणे

पद्मश्री सन्मान
महाराष्ट्र भूषण
साहित्य अकादमी
महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार
मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

पुलंची साहित्यसंपदा

विनोदी साहित्य / लेखनसंग्रह
खोगीर भरती, नस्ती उठाठेव, गोळाबेरीज, हसवणूक, खिल्ली, अघळपघळ, पुरचुंडी, मराठी वाङमयाचा (गाळीव) इतिहास, उरलं सुरलं

प्रवास वर्णने

अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा, वंगचित्रे,

नाटके व एकांकिका

तुका म्हणे आता, अंमलदार, भाग्यवान, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा, राजा ओयदिपौस, एक झुंज वार्‍याशी (अनुवाद), ती फुलराणी (रुपांतर), मोठे मासे छोटे मासे, विठ्ठल तो आला आला, आम्ही लटिके ना बोलू, वयं मोठं खोटं (बालनाट्य), नवे गोकुळ (बालनाट्य)

अनुवाद
एका कोळियाने, काय वाट्टेल ते होईल, कान्होजी आंग्रे, स्वगत (जयप्रकाश नारायण), पोरवय

पत्रलेखन संग्रह
मुक्काम शांतिनिकेतन

निवडक पु. ल.
पुढारी पाहिजे, एक शून्य, चित्रमय स्वगत, रेडियोवरील भाषणे व श्रुतिका (भाग एक व दोन) चार शब्द टेलिफोनचा जन्म दाद, रविंद्रनाथ: तीन व्याख्याने, कोट्याधीश पु. ल., व्यक्ति आणि वल्ली

व्यक्तिचित्रे
गणगोत, गुण गाईन आवडी, मैत्र, आपुलकी

भाषणे
रसिकहो! सज्जनहो! मित्र हो! श्रोते हो!

एकपात्री
असा मी असामी, बटाट्याची चाळ