शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By वेबदुनिया|

भगवान जगन्नाथाची रथयात्रा

WD
धर्मयात्रेच्या या भागात आम्ही आपणास नेणार आहोत लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अहमदाबादच्‍या भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत. अनेक वर्षांपासून दरवर्षी आषाढी शुद्ध द्वितीयेला ही रथयात्रा परंपरागत उत्‍साहात काढली जाते.

जुन्या अहमदाबादमध्ये रथोत्‍सवाच्‍या दिवशी प्रचंड उत्‍साहाचे वातावरण असते. जगन्नाथ मंदिरातून रथास सुरूवात होते. सुभद्रा व बलराम यांच्यासह वेगवेगळ्या तीन रथांवर भगवान जगन्नाथ संपूर्ण शहराच्‍या भ्रमणासाठी निघतात. यात्रेत मोठ्या संख्येने भाविक व वेगवेगळया आखडयांचे साधू-संत सहभागी होउन आपल्‍या कसरती करून ईश्‍वराबददलची आपली भक्‍ती सिध्‍द करतात.

रथोत्सवा निमित्ताने संपूर्ण शहाराचा कायापालट होऊन ठिकठिकाणी श्रद्धाळुंकडून भगवान जगन्नाथाच्या रथावर पुष्पवृष्टी केली जाते.

WD
रथोत्‍सवाची अशी परंपरा आहे, की सर्वप्रथम रथाचे दर्शन करण्‍याच मान मंदिरातील हत्तीला असतो. संस्‍थनाचा प्रमुख सोन्याच्या झाडूने रस्ता स्वच्छ करतो. आणि त्यानंतर रथयात्रेस प्रारंभ होतो. सकाळी निघालेली ही रथयात्रा शहरातील विविध भागात जाऊन दुपारी सरसपूर भागात विश्रांतीसाठी थांबते. यात्रेत सहभागी झालेल्या जवळपास एक लाख भाविकांना यावेळी महाप्रसादाचे वाटप केले जाते.

भगवान जगन्नाथाच्‍या मंदिराचा इतिहास हा सुमारे 443 वर्षांचा आहे. असे म्‍हटले जाते, की 125 वर्षांपूर्वी मंदीराचे महंत श्रीनरसिंहदासजी महाराज यांना भगवान जगन्नाथाने स्‍वप्‍नात दृष्‍टांत देऊन रथयात्रा सुरू करण्याचा आदेश दिला. त्‍या दिवसापासून ही परंपरा कायम आहे. जो भाविक मनोभावे भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत सहभागी होऊन दर्शन घेतो. त्यांच्या संसाराचा रथ प्रभूच्‍या कृपेने सुव्‍यवस्थित चालतो.

WD
भरूच (गुजराथ) येथील मल्लांनी सर्वात आधी यात्रा काढण्याच्या हेतूने रथ तयार करून दिला. त्यामुळे यात्रेचा रथ ओढण्याचा अधिकारही या मल्लांनाच देण्याची परंपरा आहे. सामाजिक व धर्मिक सदभावाचे प्रतीक म्‍हणून या उत्‍सवाकडे पाहिले जाते. रथोत्‍सवाच्या दिवशी मुस्लीम समाज बांधव मंदिराच्‍या महंतांची पुजा करून त्‍यांचे दर्शन घेतात. रथयात्रेत प्रसाद म्हणून जामून व मूग यांचे वाटप केले जाते. तर भगवान जगन्नाथाला भोपळा, गवाराची भाजी व खिचडीचा नैवेद्य दाखविला जातो.

कसे पोचाल

रस्‍ताः
अहमदाबाद हे गुजरात राज्यातील व्यावसायिक शहर असून राज्यातील तसेच संपूर्ण देशातील प्रमुख रस्त्यांशी जोडले आहे.

रेल्वेः
पश्चिम रेल्वेमार्गावरील अहमदाबाद हे मोठे जंक्‍शन असून देशभरातील प्रमुख शहरांमधून येथे पोचण्‍यास रेल्‍वेसेवा उपलब्‍ध आहे.

विमान सेवा
अहमदाबाद आंतरराष्‍ट्रीय विमान तळ असल्‍याने येथे पोचणे सहज शक्‍य आहे.