मंगळवार, 19 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By वेबदुनिया|

रामभक्त हनुमानाचे अनोखे संग्रहालय

-अरविंद शुक्ला,

PRPR
लखनौमध्ये हनुमानासंदर्भात एक आगळे संग्रहालय उभारण्यात आले आहे. रामभक्त हनुमानसंदर्भात अनेक औत्सुक्यपूर्ण वस्तुंचा संग्रह यात असल्याने याचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे. सुनील गोंबर या हनुमान भक्ताच्या प्रयत्नातून हे संग्रहालय उभे राहिले आहे. देश-विदेशात हनुमानासंदर्भात सापडलेल्या अनेक वस्तू गोंबर यांनी येथे संग्रहित केल्या आहेत.

PRPR
लखनौच्या इंदिरानगर भागात बजरंग निकुंज या आपल्या निवासस्थानातील खालचा पूर्ण मजला गोंबर यांनी या संग्रहालयासाठी दिला आहे. या संग्रहालयात काय नाही? प्रभू रामचंद्रांच्या ४८ चिन्हांनी अंकित केलेल्या पादुका येथे आहेत. पूर्ण चांदीत या पादुका तयार करून घेण्यात आल्या आहेत. प्रभू रामचंद्रांनी उच्चारलेली हनुमानाची एक हजार नावे येथे वाचता येतात. हनुमान सहस्त्रनाम स्तोत्रातून ही नावे घेण्यात आली आहेत. संस्कृतातून हिंदीत त्याचा अनुवाद करण्यात आला आहे.

गोंबर यांनी सतराव्या शतकापासून मिळालेली हनुमानाची चित्रे संग्रहित केली आहेत. त्यांचा छानसा अल्बम बनविला आहे. याशिवाय हनुमानाच्या अनेक दुर्लभ मूर्ती येथे आहेत.

PRPR
संग्रहालयाच्या भिंतीवर संकटमोचन दिव्य लोक दाखविण्यात आला आहे. यात हनुमानाचे कुटुंबही आहे. यात शंकर, त्यानंतर हनुमानाचे स्वामी प्रभू रामचंद्र, सीता, लक्ष्मी, पिता केसरी, माता अंजनी त्यांचे गुरू सूर्यदेव, हनुमानाचे पिता पवन यांचा मसावेश आहे. याशिवाय सुग्रीव, अंगद, नल, नील हेही आहेत. तुलसीदासांचा समावेश यात नसता तरच नवल.

हनुमान संग्रहालयात या रामभक्तावर निघालेल्या ध्वनिफितींचाही संग्रह आहे. हनुमानावरील विविध भाषांमधील, देशविदेशांमधील जवळपास अडीचशे पुस्तके येथे पहायला मिळतात. हनुमानावर काम करणार्‍या विविध देश-परदेशातील संस्थांची सूचीही येथे आहे. याशिवाय हनुमानाच्या व्यक्तिमत्वाचा भाग असलेला मुकूट, कुंडल, गदा, ध्वज, शेंदूर, जानवे हेही येथे आहे. हनुमानाच्या विचारांचा प्रसार करणार्‍या साधुपुरूषांची चित्रे येथे आहेत. त्यात नीम करौली बाबा, महाराष्ट्रातील समर्थ रामदास यांचा समावेश आहे. याशिवाय हनुमानावर आधारीत १३७ संकेतस्थळांची यादी येथे पहाता येईल.

PRPR
या संग्रहालयाचे उद्घाटन २१ नोव्हेंबर २००४ मध्ये झाले आहे. तेव्हापासून येथील संग्रहात वाढच होत आहे. हंगेरीतील चित्रकार ह्युमिल रोजेलिया (राधिकाप्रिया) यांनी रामचरितमानसाच्या सात खंडांवर आधारीत सात चित्रे काढली होती. तीही येथे पहायला मिळतात. याशिवाय १८६४ मध्ये रतलाम येथील राजे रंजीत सिंह यांनी हनुमानाचे चित्र असलेली नाणी काढली होती. तीही येथे आहेत. याशिवाय हनुमानाला एका भव्य रूपातही येथे दाखविण्यात आले आहे. हनुमानाचे एक अगदी वेगळे चित्र येथे आहे. त्यात हनुमान उंटावर बसला असून त्याच्या हातात पताका आहेत. याशिवाय पाळण्यात झोपलेला हनुमान पाहणे हेही विलोभनीय दृश्य आहे.

गोंबर यांनी संग्रहालयाव्यतिरिक्त राम-हनुमान लेखन बॅंकेचीही स्थापना केली आहे. गोंबर हे प्रकाशन व्यवसायात आहेत. सातव्या इयत्तेत असल्यापासून ते हनुमानाची भक्ती करत आहेत. हळूहळू ही भक्ती आत्यंतिक प्रेमात परावर्तित झाली. काही वर्षांपूर्वी त्यांच्या नाकातून अचानक रक्त निघू लागले. त्यानंतर त्यांचे व्यक्तिमत्वच बदलून गेले. मग त्यांनी जय बजरंग चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. संपूर्ण आयुष्य त्यांनी हनुमानाच्या भक्तीतच घालवण्याचे ठरविले.

गोंबर यांनी हनुमानासंदर्भात चार पुस्तकांचे संपादन केले आहे. तुलसीदार हनुमान साधना शब्दमणी हे त्यांचे सर्वाधिक खपले गेलेले पुस्तक आहे. याशिवाय तुलसीदास का हनुमान दर्शन, सुंदरकांड सुंदर क्यो?, भक्तों का दृष्टिकोन अर्थात वर्ल्ड ऑफ लॉर्ड हनुमान हीसुद्धा त्यांची पुस्तके आहेत.

हनुमानासंदर्भात काहीही माहिती, एखादी दुर्मिळ वस्तू वा साहित्य सापडल्यास वा त्याची माहिती मिळआल्यास त्वरीत आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन गोंबर यांनी केले आहे. गोंबर यांचे हे संग्रहालय भक्तांना रविवारी सकाळी अकरा ते दुपारी एकपर्यंत पाहता येते.
संग्रहालयाचा पत्ता-
बजरंग निकुंज 14/1192, इंदिरानगर, लखनौ
फोन-0522-2711172, मोबाईल -9415011817