गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. धर्मयात्रा
  3. धर्मयात्रा लेख
Written By श्रुति अग्रवाल|

शिवशंभोचे 'महाकाल'रूप

उज्जैनचे महाकाल मंदिर हे शंकराच्या बारा ज्योर्तिर्लिंगांपैकी एक आहे. हे एकमेव दक्षिणमु्‍खी शिवलिंग आहे. तांत्रिक-मांत्रिकांसाठीही हे मंदिर खूप महत्त्वाचे मानले जाते. श्री महाकाल मंदिराची प्रशंसा महाभारतकालीन वेद व्यासांपासून कालिदास, बाणभट्ट आणि राजा भोज यांनीही केली आहे.

येथील मंदिराची निर्मिती अकराव्या शतकात झाली. त्यानंतर जवळपास 140 वर्षानंतर दिल्लीचा सुलतान इल्तुतमिशाने उज्जैनवर आक्रमण करून हे मंदिर उध्वस्त केले. सध्याचे मंदिर मराठाकालीन आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार अडीचशे वर्षांपूर्वी शिंदे घराण्याचे दिवाण बाबा रामचंद्र शेणवी यांनी केला होता.

येथे शिवलिंग स्थापन होण्यासंदर्भात अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. ''दूषण नावाच्या राक्षसाच्या अत्याचाराला उज्जैनवासीय वैतागले होते. त्यांनी संरक्षणासाठी शंकराची आराधना केली. शंकर प्रसन्न झाले. ज्योतिच्या रूपात प्रकट होऊन त्यांनी दूषण राक्षसाचा संहार केला. भक्तांच्या आग्रहानंतर लिंगाच्या रूपात ते उज्जैनमध्ये स्थायिक झाले.'' अशी कथा ‍शिवपुराणात आहे.
Shruti WD  

येथील शिवलिंग जगा‍तील एकमेव असे शिवलिंग आहे जेथे भस्माआरती केली जाते. ही भस्मारती म्हणजे अलौकीक सोहळा असतो. पहाटे चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत वैदिक मंत्र, स्तोत्रपठण, वाद्य यंत्र, शंख, डमरू आणि घंटानादात ही भस्मारती केली जाते. बम-बम भोलेच्या जयघोषात ही आरती आपले अंतर्मन जागृत करते. या आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक उत्सुक असतात.

भस्मारतीवेळी पूजा करण्यासाठी साधे वस्त्र धारण करून गाभार्‍यात जाण्याची परवानगी नाही. पुरूषांसाठी रेशमी वस्त्र आणि महिलांना साड‍ी परिधान केल्यानंतरच गाभार्‍यात प्रवेश दिला जातो. मुख्य आरतीत केवळ पुरूषच सहभागी होतात. यावेळी स्त्रियांना प्रवेश दिला जात नाही. गाभार्‍याबाहेर तयार केलेल्या नंदी हॉलमध्ये भक्त या भस्मारतीचा आनंद घेऊ शकतात.

''पूर्वी येथे मृतदेहाला जाळल्यानंतर उरलेल्या राखेने (चिताभस्म) भोलेनाथाला सजविले जात असे. परंतु, एकदा मृतदेहाची ताजी राख (चिताभस्म) मिळाली नाही. त्यावेळी पुजार्‍याने आपल्या जिवंत पुत्राला अग्निच्या हवाली करून दिले आणि बालकाच्या चिताभस्माने शंकराला सजविले होते. तेव्हापासून येथे मृतदेहाच्या चिताभस्माऐवजी गायीच्या शेणाने तयार केलेल्या भस्मापासून भगवान शिवाला सजविले जाते.'', अशी दंतकथा आहे.
ShrutiWD
महाकाल मंदिरात शिवरात्र आणि श्रावणी सोमवारच्या दिवशी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी उज्जैनचा राजा महाकाल आपल्या जनतेची परिस्थिती जाणून घेण्यासाठी शहरात फिरायला निघतो, अशी समजूत आहे. या दिवशी भगवान शिवाचे मुखवटे पालखीत ठेवून मिरवणूक काढली जाते. शेवटच्या श्रावण सोमवारी महाकालची शाही मिरवणूक काढली जाते. यामध्ये हजारोच्या संख्येने लोक सहभाग घेतात. सगळीकडे महाकालचा जयघोष चाललेला असतो.

''उज्जैनचा एकच राजा आहे, तो म्हणजे महाकाल' असे पूर्वी सांगितले जात असे. यामुळे उज्जैनच्या सीमेमध्ये कोणताही राजा-महाराजा रात्री थांबत नसे, असेही बोलले जाते. म्हणूनच उज्जैनवर शिंदे घराण्याचे राज्य होते, तेव्हाही रात्र काढण्यासाठी त्यांनी आपला राजवाडा शहराच्या सीमेबाहेर बांधला होता, अशी दंतकथा आहे.

आरतीचा वेळ- श्री महाकाल मंदिराचे दरवाजे पहाटे चार वाजता उघडतात. ही वेळ भस्मारतीचा असून ती सकाळी सहा वाजेपर्यंत चालते. सकाळी साडेसात ते आठ वाजून पंधरा मिनिटांपर्यंत नैवेद्य आरती चालते. संध्याकाळी पाचपासून जलाभिषेक बंद होतो. संध्याकाळी साडेसहा ते सात वाजेपर्यंत सायंआरती आणि रात्री साडेदहा वाजता शयन आरती असते. रात्री अकरा वाजता मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. (उन्हाळ्याच्या दिवसात नैवेद्य आरती सकाळी सात ते पाऊणे आठ वाजेपर्यंत आणि सायं आरती सात ते साडेसात वाजेपर्यंत असते.)
ShrutiWD


उज्जैनला जाण्यास योग्य काळ- वर्षभर महाकाल मंदिरात भक्तांची रांग लागलेली असते, परंतु शिवरात्र आणि श्रावण महिन्यात या नगरीचे रूप निराळेच असते. सगळीकडे गर्दी असते. रस्त्यावर खांद्यावर कावड घेतलेले लोक नजरेस पडतात. संपूर्ण शहर शिवभक्तीत मग्न झालेले असते. श्रावणात येथे श्रावण महोत्सव होतो.

कसे जावे- रस्त्याने- उज्जैन-आग्रा-कोटा-जयपूरमार्गे, उज्जैन-बदनावर-रतलाम-चितोडमार्गे, उज्जैन-मक्सी-शाजापूर-ग्वालियर-दिल्लीमार्गे, उज्जैन-देवास-भोपाळमार्गे, उज्जैन-धुळे-नाशिक-मुंबईमार्गे.

रेल्वे मार्ग- उज्जैनहून मक्सी-भोपाळ मार्गे (दिल्ली-नागपूर रेल्वे मार्ग), उज्जैन-नागदा-रतलाम मार्गे (मुंबई-दिल्ली रेल्वेमार्ग), उज्जैन-इंदूरमार्गे ( मीटरगेजने खांडवा रेल्वेमार्ग), उज्जैन-मक्सी-ग्वालियर-दिल्लीमार्गे.
ShrutiWD


हवाई मार्ग- उज्जैनपासून इंदूर विमानतळ जवळपास 65 किलोमीटरवर आहे.

राहण्याची व्यवस्था- उज्जैनमध्ये चांगल्या हॉटेलपासून सर्वसामान्यांना परवडेल अशा धर्मशाळा आहेत. तसेच महाकाल समितीची महाकाल आणि हरसिद्धी मंदिराजवळ धर्मशाळा आहेत. या धर्मशाळेत वातानुकूलित, साध्या खोल्या आणि हॉलही उपलब्ध आहेत.