गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी साहित्य संमेलन-०८
Written By वेबदुनिया|

आमची माय मराठी (काल, आज आणि उद्या)

-डॉ. बा. ना. मुंडी

PRPR
मराठी साहित्य निर्मितीस प्रारंभ झाला तो सामान्यत: दहाव्या अकराव्या शतकात व तो प्रामुख्याने केला महानुभाव पंथीयांनी. त्यांनी मराठीचा उपयोग संस्कृतच्या जागी करण्यास प्रारंभ केला व काही काळ तरी संस्कृत-निष्ठांना चांगलाच शह दिला. पण त्या पंथाच्या विचित्र व सर्वसामान्यांच्या पूर्वापार धारणा-विचारांना धक्का देणार्‍या, अपरिचित तत्त्वज्ञानामुळे त्यांना आपले पंथीय तत्त्वज्ञानप्रचाराचे कार्य गुप्तपणे, अनेक सांकेतिक लिप्यातून करावे लागले. यामुळे मराठी माध्यमाच्या द्वारे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या त्यांच्या मूळ हेतूस सहजच बाधा येऊन खंड पडला. त्यांचे सर्व मराठी साहित्य त्या पंथीयांपुरतेच मर्यादित राहिले. मराठीचा यथावश्यक परिचय होणे मागे पडले. अलिकडेच ते सांकेतिक लिप्यांच्या कडीकुलुपातून मुक्त झाले आणि त्यावेळीच त्याचे अलौकिकत्व, महत्त्व लक्षात आले. चक्रधर हे त्या पंथाचे संस्थापक. त्यांनी महाराष्ट्रासंबंधी अभिमानाने म्हटले ते ज्ञात आहे.

महाराष्ट्री असताची योग्यता महाराष्ट्र सात्त्विक... तेथचे जडचेतन पदार्थ तेही सात्त्विक: तेथ असता शारीर मानसिक कव्हणीची उपद्रव नुपजिति: आणिक देशी शारीर मानसिक उपद्रव उपजला असे तो महाराष्ट्री असता शमे: तेथचां अन्नोदकी शमे: तेथचां औषधी शमे: तेथचां वारा, झाडी, पावूस तेहि सात्त्विक: तेणे सकळ उपद्रव शमेती:

''महंत म्हणजे निर्दोष: आणि एकं देश निर्दोष होती: परी सगून नव्हेति: महाराष्ट्र निदोर्ष: आणि सगुन तेथ असता अनाचार करावयाची बुध्दि नुपजे: आन उपनली तर करू ल्हाइजे: आपण आनाचारू न करी: आणीकास करू न दीती: ते महाराष्ट्र धर्म सिध्दि जाए: ते माहाराष्ट्र: महंत म्हणिजे थोर: तर तेची थोरी कवणे कवणे अर्थे असे पा: ना: सात्त्विक हा एक: दुसरा सुखरूप: तिसरा इष्टकारक: चवथा निर्दोष: पांचवा सगुण: महाराष्ट्र थोर: आणिक कैसे थोर: जेणुका अर्थी आपुली थोरी असे: तेतुलाही अर्थी आणिकासी थोरी करी: थोरापासौनि महाथोर तयाते महाराष्ट्र म्हणिजे:...''

त्याच्यानंतर त्यांच्या नागदेवाचार्य, माहिंभट्ट ऊर्फ महिंद्रबास इत्यादी अनेक लहान मोठ्या शिष्यांनी संस्कृतच्या ऐवजी मराठीचा पुरस्कार करून आपल्या वाड्:मय निर्मितीसाठी तिचा सर्रास उपयोग केला आणि चक्रधरांनी सुरू केलेली पूर्व परंपरा अत्यंत कसोशीने व निष्ठापूर्वक पुढे चालविली. केशोबासारख्या संस्कृतप्रेमी पंडितांना पुन: पुन: संस्कृतमध्ये रचना करण्याची तीव्रतम इच्छा होई, पण तिला वेळीच बंधन घातले जाई. नागदेवाचार्यांनी केशोबास सुचविले.

''नको गा केशवद्या: येणे माझीये स्वामीचा म्हातारिया सामान्य परिवारू नागवैल कीं: परमेश्वरे तरी जीवाचेया संकोचता आन अनेक वासना अयोग्यता जाणौन‍ि आन काठिन्यता चुकवौत‍ि सकळासि अल्पायासे ब्रम्हविद्याचियां ठाये निवसितां येवौनि परमात्म लाभुद्यमां वावु होआवा म्हणौनीच महाराष्ट्रीये निरौपिले कीं गा: एरव्ही सर्वज्ञा काई देववाणी निरोपू न लाहे की गा: म्हणौनि केशवा संस्कृत सूत्रबध्द प्रकरण न करी तू कीं:. चुकून केशोवासांनी संस्कृत पारिभाषिक संज्ञा उपयोजिल्या. तर नागदेवांची कडक सूचना, पंडित केशवदेया: तुमचा अस्मात् कस्मात् नेणो: मज चक्रधरें निरोपिली मर्‍हाटी तियाचि पुसा: मग केशोबास संस्कृत बंद न करितीची:'', -ह्या मागील भावना, लोककल्याणाची कळकळ तसेच मातृभाषेवरिल प्रेमही स्पष्ट होते.

लोककल्याणाच्या उदात्त हेतूने प्रेरित होऊन चक्रधरांनी ज्या मायमराठीचा पुरस्कार केला, तिचाच उपयोग इतर महानुभाव लेखकांनीही तितक्याच प्रेमोदराने, श्रध्दानिष्ठेने, आत्मविश्वासपूर्वक करावा यात आश्चर्य कसले? दामोदर पंडित आपल्या 'वच्छहरण' या काव्याचा प्रारंभ करतांना म्हणतात, 'नागरी बोलीं स्छल वाणिजे: सकल रसांते पोखिजे' व हिच्या साह्याने 'उपमा श्लेष वर्णुक: एहीं रंजॐ सकलैक लोक.' 'प्राकृत जन मानवती' तशीच कथासंगती मी करीन: 'रूक्मिणी सैंवर'कर्ता नरेंद्रकव‍ि तर स्पष्टच म्हणतो, 'हे पुण्य पावन मराठी । आइकती आदरें कर्णपुटी । तैयासी कवन्ही न पडे कामाठी । संसाराची।।' नारोबा आपल्या 'ऋद्वीपुर वर्णनात' लिहितात, 'जेथची नांव तर्‍ही मराठी: परि षट्दर्शनातें दळवटी । प्रमेय धुंडाळिता सृष्टी । आथीचिना ।।' 'सह्याद्रिवर्णनात' हिरांबा म्हणते 'जेथ परा चकितु झाली।। तेथ महाराष्ट्रीचा काइसी केली। परी माझी वाचा वालमैली'. प्रसिध्द भास्कर कवि आपल्या 'शिशुपाळवधात' म्हणतात, 'साहित्याचिया खेडकुळिया। सुदेशां बोलाचियां चिपुलियां। सिंपने खेळती सांवळीयां। रसवृत्ति।। फुन वाचां रसाळा। गर्व सांडवीण कोकिळां।' काशीराजाने 'द्रौपदी सैंवरात' व्यक्तविलेली श्रध्दा पहा. तो म्हणतो. 'मर्‍हाटी टिका देशभाषा मर्‍हाटी। मर्‍हाटी कुळी जन्म वानी मर्‍हाटी। गुरूग्रंथ हा सेविला म्या मर्‍हाटी:।।'

याप्रमाणेच अनेक महानुभावीय लेखकांनी मराठीच्या प्रशंसापर अभिमानाचे उद्गार वेळोवेळी व जागोजागी काढले आहेत. वरील दिलेल्या काही उतार्‍यांवरून इतरांबद्दल सहज कल्पना येऊ शकेल.

मुकुंदराज व ज्ञानेश्वर या सर्वमान्य आद्य मराठी कवींनी मराठीची वैशिष्ठ्ये तिच्या सामर्थ्यासह मांडताना मुकुंदराज, 'देशी हो कां मर्‍हाटी। परि उपनिषदाचीच राहाटी। तरी हा अथु जीवाचिया गांठी। कां न बांधावा?' (मुकुंदराज) 'मर्‍हाटिहेचां नगरीं। ब्रम्हविद्येचा सुकाळूकरी। घेणे देणे सुखाच वेर्‍ही। हो देई जगा। माझा मर्‍हाटाचि बोलू कवतिके। परि अमृतातेही पैजेसिं जिंके। ऐसी अक्षरेचि रसिके। मेळविन।।' (ज्ञानेश्वर)

अशा प्रकारे त्यांनी संस्कृतातील उच्च प्रकारचे साहित्य, नित्याच्या व्यवहाराच्या भाषेत मराठीत निर्माण करून स्त्रीशूद्रांसह आबाल वृध्दांना सुलभ केले. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून नंतरच्या अनेक लहानमोठ्या साहित्यिकांनी संस्कृतची जोडीतोडीची व प्रसंगी तिच्याहूनही वरचढ अशी करून प्रत्यक्ष संस्कृत पंडितांकडूनही सन्मान मिळवला. एकनाथपंडितांनी प्रत्यक्ष काशीक्षेत्री मराठी 'भागवत' लिहून हत्तीवरून मिरवणूक काढण्याइतपत सन्मान मिळविला. वामनपंडितांना मराठीत रचना केल्यामुळे प्रत्यक्ष मुलाचा विरोध पत्करावा लागला. पण या लोकांची निष्ठाच जबर. आपल्या मातृभाषेवरील प्रेम वरवरचे, दिखाऊ किंवा ओढून ताणून आणलेले नसून आंतरिक, खरे होते. स्वयंभू होते. म्हणून संस्कृतपंडित किंवा नवीन मुसलमानी राजवट आल्यामुळे फारशीकडून वेळोवेळी झालेले हल्ले त्यांनी मोठ्या धैर्याने, जोमाने परतवून स्वभाषा टिकवली. श्री एकनाथ, वामनपंडित, मुक्तश्वर, दासोपंत, श्रीधर, मोरोपंत, तुकाराम, रामदास, इत्याद‍ि जेष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक आणि त्यांच्याच बरोबर इतर अनेक लहान मोठ्या कवींनी मायबोलीवरील निस्सिम, तीव्रतम प्रेमापोटी लक्षावधी अभंगांदीची प्रचंड रचना मराठीत केली व मोठ्या आत्मविश्वासपूर्वक संकटाला तोंड देऊन त्याचा प्रतिकार, परिहार केला.

शिवछत्रपतीच्या काळात मराठीत शिरलेला फारशीपणा काठून तिला संस्कृतनिष्ठ रूप देण्यात आले व त्यासाठी 'राजव्यवहार कोष' तयार करविला गेला. पण त्यामुळे पेशवे काळात भाषेतील मराठीपणाच जाऊन हळूहळू संस्कृतचे वर्चस्व प्रस्थापित होऊ लागले. या सर्व प्रसंगी कोणी संस्कृतशी समन्वय करण्याचा तर कोणी तिच्यावर टीकेचा मारा करून मराठीचे श्रेष्ठत्त्व पटविण्याचा, तर एखाद्या एकनाथसारख्या फटकळाने 'संस्कृत देवे निर्मिली', प्राकृत काय चोरापासूनी आली?' असला रोखठोक प्रश्नही विचारला. ते म्हणतात, ' देवासी नाही वाचाभिमान'. दासोपंत त्यापुढे एक पायरी जाऊन असा व्यर्थ संस्कृताभिमान बाळगणार्‍यांची कींव येऊन अशा 'मुर्खाशी किती मुंडणे' अशा शब्दात संभावना करतात तर, संतोषमुनि कृष्णदास संस्कृतपेक्षा मराठी श्रेष्ठ कां हे सांगतांना संस्कृतचा थोडा उपहास करीत म्हणतो, 'महाराष्ट्री स्त्रीलिंग वाक्य आणि संस्कृत तव नपुंसक'. मोरोपंतानी मराठीत प्रचण्ड निर्मिती केली तरी तसे करण्याची त्यांची कारणमीमांसा संस्कृतला अनुकूल स्वरूपाची दिसते. 'गीर्वाण शब्द पुष्कळ जनपदभाषाच‍ि देखता थोडी। आहे, गुणज्ञ लोकी याची घ्यावी हळूहळू गोडी'. (मराठी शब्द समृध्द नाहीत तेव्हा पंडितांनी तिचे हळूहळू सेवन करावे म्हणजे ती संस्कृतच्या सहवासाने शब्द समृध्द‍ि मिळवू शकेल) असे ते म्हणतात. हा भाव दासोपंतांची उपरोक्त आत्यंतिक प्रवृत्त‍ि सोडली तरी त्यांनीच लिहीलेले पुढील विचारही लक्षणीय आहेत.

संस्कृत अथवा प्राकृत। जे जे भाषा जेथ जेथ।
ते ब्रम्हात्मस्थिति समस्त। ब्रम्हचि होये।

संस्कृत अथवा प्राकृत। समानब्रम्हचि समस्त। अथवा निर्विकत्वीं निश्चित। काहींच नसे।। तेथ भेदु मानावा विचारे। कवणे आतां? असाच संस्कृतशी समन्वयात्मक व्यवहारच अधिकांश कवींनी केला आहे. अमृतराय म्हणतात, भाषा संस्कृत कां मर्‍हाटी। अर्थ तेणे सारिखा। सुवर्ण रौप्य ताम्र घटीं। येकचि दुधाची कसवटी।। श्रीधर म्हणतात, प्राकृत भाषा हे साचार। परि अर्थ संग्रह भांडार।' संस्कृती इक्षुदण्डी रस गुप्त। न कळे भोळिआसि अत्यत। त्यांचा प्राकृती रस काढोनी देत।' मात्र जाता जाता 'संस्कृत अबलांस न कळे यथार्थ' असा शेरा दिला आहेच.

कृष्ण याज्ञवल्कि म्हणतो, 'भाषा संस्कृत-प्राकृत। या सहोदरी जी सत्य।'संस्कृतपेक्षा मराठी कशी उपयुक्त आहे, तिच्यात काय विशेष आहे इत्यादिबद्दल पुष्कळच लिहिले गेले आहे. नामदेव म्हरतात, 'संस्कृत भाषा जनासि कळेना' म्हणून देवाला दया आली व त्याने 'ज्ञानेश्वर' हा अवतार घेतला. चांगदेव लिहितात, ''मल्हाटी बोलिजे आरज। बालबोधिपणे विरज।'' राजशेखर, मराठी 'सुकुमार प्राकृतबंध' म्हणतो तर वामनपंडित म्हणतात, 'वदोंभाव त्याचा महाराष्ट्रवाणी। जरी शब्द थोडे न अर्थास वाणी।' नरसीनारायण, 'मराठिया भाषा विचक्षण' म्हणतो तर वहिरा जातवेद म्हणतो, 'केली महाराष्ट्र टीका। ह्या सप्रेम ओव्या अमोलिक। ऐकता भाविकां निजसुख' आणि 'दुरिते पळति उठाउठी। कर्णसंपुटी ऐकतां 'गीर्वाण उमजेना बोधितां', म्हणून मुरारीमल्लाने 'गीता वानिलि वागीश्वरी। महाराष्ट्रभाषे।' आणि 'संस्कृत न कळे आरजा जनां' म्हणून महालिंगदासाला मराठी रचना कराव‍ी लागली. मुक्तेश्वर संस्कृतमराठी संबंध दर्शवितांना म्हणतात, 'संस्कृत 'रत्नकुंभ' तर मराठी 'मृतिकाघट: संस्कृत' कार्पास सुपवित्र तर मराठी प्रमेय निर्मिले भाषावतस्त्री:' संस्कृत शब्द 'सुवर्णताट' तर मराठी 'रंभापर्ण:' देशभाषा परी भांडार। साहित्याचे जाणिजे। असेही ते म्हणतात. 'हे प्राकृत। परि तत्त्वज्ञान धनामृत' असे ग्रंथराजकार म्हणतो तर वर दिलेला कृष्ण याज्ञवल्कि म्हणतो: 'देशातल्या छप्पन्न भाषात मराठी ही' जैसा शोभे मुकुटी। रत्नामाजी। अशी आहे. 'संस्कृती अप्रवेशु तमाते। सोपान हे'। असे रंगनाथ मोगरेकर यांना वाटते तर 'ऐकताच जन अर्थ लाहे। आणि थोडियाच मध्ये पाहे। प्रमेय राहे सकळिका।' असा निर्वाळा रमाअल्लभदास देतो. त्र्यंबकराज म्हणतात 'संस्कृत केवळ। अर्थे करावे प्रांजळ। येरव‍ी रक्षितां फळ। कोण त्याचे?' हे मर्‍हाटे परिबरवे शास्त्रदोहन आहे' आणि 'उघडावया मोक्षद्वारा। हे किली दिधली' (परमेश्वराने)

हे व अशा प्रकारचे मराठीचा उपयोग कररार्‍या अनेक कवींनी आपापले विचार व बाजू मांडली आहे. त्यावरून संस्कृत मराठी संबंधीच्या कवींच्या विविध दृष्टिकोणाचा परिचय होईल.

ही अशी परिस्थिती जवळ जवळ पेशवाई अखेरच होती. असा समन्वय सहित प्रतिकारात्मक संघर्ष करीत मराठीला आणखी किती काळ काढावा लागला असता याचा काही अदमास करता येत नाही. परंतु पेशवाईच्या स्वराज्याबरोबरच मातृभाषेलाही ग्रहण लागून हळूहळू तिलाह‍ि अवकळा प्राप्त होऊ लागली. स्वराज्याच्या अंताबरोबरच तिचे स्वातंत्र्य नष्ट झाले अ तिला दुसर्‍याचे अंकित होणे, दुसर्‍याच्या अंगुलिनिर्देशानुरूप चालणे भाग झाले.

मराठीवरील हे संकट पूर्वीपेक्षा निराळ्या स्वरूपाचे होते. संस्कृत-मराठी हा केवळ आपसातला, उच्चनीचता, श्रेष्ठकनिष्टता, व्यवहार्य अव्यवहार्यता असला तरी आजी -नातीचा प्रेमाचा संघर्ष होता. एकाच रक्ताचा. पण इंग्रजी सर्वस्वी भिन्न अशा परकीय संस्कृतीची. आपलेच लोक तिच्या प्रभावाने इतके भारावून गेले की तिला 'वाघ‍िणीचे दूध' म्हणून गौरवू लागले. अशाहि विषम परिस्थितीत मराठी साहित्यिकांची मायबोलिच्या सामर्थ्यावरील अढळ निष्ठा व दृढ विश्वास, तिच्या उज्ज्वल परंपरा व तिच्याबद्दलचा सार्थक अभिमान अणुमात्र ढळला नाही. उलट तो यशवंत,माधव जूलियन, विनायक, कोल्हटकर, मोगरे, च्या लेखणीतून कवितेतून उखाळून वर येऊ लागला. माउली माझी मराठी! भक्त मी मोठा तिचा। गर्व हा वाटे मला की मी मराठी जातिचा।। ऊर वा प्रेमे भरेना तो मराठा हो नव्हे।। कळोनी परी आत्मनिष्क्रीयता ती तदा हाय पस्तावते मन्मत‍ि।। महाराष्ट्र माझा! महाराष्ट्र माझा।। इत्यादि.

असे किती सांगावे. मराठी आज सात आठ शतके जिवंतच आहे असे नव्हे तर भारतीय साहित्यात तिला मोठ्या मानाचे स्थान आहे. तिचे साहित्य श्रेष्ठ दर्जाचे, विविध प्रकारचे, विपुल प्रमाणात व प्रगत‍िशील आहे. अधून मधून उठणार्‍या वावटळीच्या धुळीच्या आड किंवा एखाद्या ढगाआड सूर्य झाकाळला जात असला तरी पूर्वस्थिति, पूर्वरूप प्राप्त व्हावयाला फारसा वेळ लागत नाही हे सर्वमान्य तत्त्व मराठीच्या बाबतीतही तितकेच सत्य आहे. अर्थात केवळ दैवावर हवाला देऊन आशावादावर स्वस्थ बसून काही होणारे नाही. हातपाय हलवावयास हवेच. 'केल्याने होत आहे रे। आधी केलेची पाहिजे' हे जसे लक्षणीय, अनुसरणीय मार्गदर्शन आहे तितकेच 'सुकार्याविणे' केवळ 'वृथा ही बढाई' पोकळ बडबड' ही व्यर्थ होय हेही लक्षणीय. प्रयत्नांती मराठीचा ध्वज सतत फडकत ठेवणे आपले कर्तव्य आहे. भूतकाळातून थोडा वर्तमानाकडे दृष्टीक्षेप केला तर काय दिसते? मराठी मायबोलिची काय अवस्था आहे? तिची दैन्यावस्था दयनीय स्थिति वस्तुत: किती लक्षणीय आणि म्हणूनच रक्षणीय आहे हे आवर्जून दिग्दर्शित करावेच लागले का? महाराष्ट्रीय कुटुबियांनी आपापल्या घरातून मायमराठीची होत चाललेली हलाखीची परिस्थिती जरा लक्ष देऊन पेहण्याचा प्रयत्न करावा.

महाराष्ट्रीयन संस्कृतीच जेथे घराघरातून अधिकांश विलुप्त होणाच्या मार्गावर आहे तेथे संस्कृतीचा प्रमुख घटक असणार्‍या भाषेबद्दल विशेष काय अनुभवास येणार? पाश्चात्य संस्कृतीने आमच्या जीवनाच्या अधिकांश अंगावर कधीचेच आक्रमण केले आहे. मुंगीच्या पावलाने का होईना पण तिचा प्रवेश कधीचाच झालेला आहे. कालपर्यंतची पिढी तग धरून होती. पण आजची बाल-तरूर पिढी? घरात डॅडी, मम्मी, हॅलो! हाय! रूजत चालले आहे. इंग्रजी ही जागतिक ज्ञानार्जनाची भाषा आहे. तिच्या मुळे भावी जीवन योग्य मार्गाला लागणार नाही या सबबीखाली मायबोलीचा विसर पडत चालला आहे. भावी पिढी अशा परिस्थितीतून आपल्या पूर्व कवींनी व्यक्त केलेला आशावादी दृष्टीकोण कितपत प्रत्यक्षात आणणार? तशात महाराष्ट्रात प्रारंभापासून बालकांना शिशूंना इंग्रजी अत्यावश्यक केले आहे. कां तर नवीन अवतरलेल्या कम्प्यूटर युगाला या पिढीला तोंड देता यावे. या वृत्तीचे पडसाद विद्यालये, विश्वविद्यालये यावर उमटणे आवश्यक आहे. हे इंग्रजीचे मराठीवरील आक्रमण चिंता निर्माण करणारे आहे. तरीही इतके भीण्याचे किंवा बावचळून जाण्याचेही कारण नसावे.

कोणतीही स्थिती सदासर्वदा एकसारखी राहत नसते. उलट, परिस्थितीला स्वानुकूल करून इष्ट वळण देण्याचे सामर्थ्य आणि कर्तृत्व आपले आपल्याच हातात असते. स्वत्त्व, अस्मिता रक्षणाचा संघर्ष आणि प्रयत्न हेच प्रमुख मार्ग आहेत. विरोधानेच केवळ विकास संभवतो असे वाटण्याचे कारण नसावे. हे आमच्या मराठीच्या पूर्व कवींनी समन्वयाने विरोध आत्सात करण्याचा मार्ग दाखवून दिले आहेच. संघर्षाऐवजी समन्वय, विरोधाऐवजी सामंजस्य, सदभावना आणि विशेष म्हणजे आपली स्वत:ची अढळ श्रध्दा, प्रेम, भक्ति, निष्ठा, आत्मविश्वासयुक्त सक्रियता हीच परीस्थितीवर विजय मिळविण्याची खरी व प्रभावी गुरूकिल्ली आहे.

(महाराष्ट्र साहित्य सभा, इंदूर यांच्या 'मालविका' या स्मरणिकेतून साभार)