शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी साहित्य संमेलन-०८
Written By वेबदुनिया|

सांगली संमेलनाने पाडला चांगला पायंडा

सांगलीतील ८१ व्या साहित्य संमेलनाने एक चांगला पायंडा पाडला. हे संमेलन सांगलीत म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या जिल्ह्यात होणार असे जाहीर झाल्यानंतर या आयोजनात त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असणार हे उघड होते. शिवाय हे संमेलन सांगलीला भरविण्यात त्यांचा मोठा हात होता, हेही सर्वांनाच माहित आहे. सांगलीचे एकूण राजकीय वजन पहाता, या संमेलनावर राजकीय ठसा राहील अशी शक्यताही दाट वाटत होती.

पण आर. आर. आबांनी संमेलनाची तयारी सुरू असतानाच एक चांगला निर्णय घेऊन इतरांनीही आदर्श घ्यावा असे त्यातून सुचविले. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आपली निवड करू नये असे स्पष्टपणे सांगून ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार उत्तम कांबळे यांची निवड करावी अशी सूचना त्यांनी केली. संमेलनातील आयोजकांनी सुरवातीला कुरकुर केली. पण आबांचा निर्णय असल्याने सर्वांनीच ते मान्य केले.

संयोजनात आबांचाच हात मुख्य असल्याने सहाजिकच ते स्वागताध्यक्ष होतील, अशी अटकळ बांधली जात होती. त्याला त्यांनी आपल्या या कृतीने छेद दिला. वास्तविक ही योग्य बाब आहे. साहित्यातले ज्याला कळते, तीच व्यक्ती या पदावर असणे केव्हाही चांगले. वास्तविक यापूर्वी झालेल्या साहित्य संमेलनात तेथील प्रमुख राजकीय नेता आणि संमेलनाचा मुख्य आयोजक (प्रायोजकही) हाच स्वागताध्यक्ष असायचा. पण आबांनी तसे न करता हा चांगला पायंडा पाडला.

आता या संमेलनात मात्र, राजकीय लुडबूड होऊ नये यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील. कारण सांगली राजकीय दृष्ट्या संवेनदशील जिल्हा आहे. शिवाय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाची परंपरा असलेला जिल्हा आहे. शिवाय मुख्यमंत्रीपदासाठी बाशिंग बांधून बसलेलेही या जिल्ह्यात आहेत. त्यामुळे या मंडळींची व्यासपीठावर गर्दी झाल्यास साहित्य झाकोळून राजकारणच समोर येईल. त्यामुळे ते टाळण्याची आता गरज आहे. मागील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरूण साधून यांनी राजकारणी जर चांगले वाचक, रसिक असतील, तर त्यांनी संमेलनाला उपस्थित रहाण्यात काहीच गैर नाही. मात्र, त्यांनी साहित्याचा आस्वादक म्हणून रसिकांत बसावे, अशी सूचना केली होती. ती पाळली गेली पाहिजे, एवढीच अपेक्षा.