बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|

साहित्यिकांमध्ये रंगली जुगलबंदी

किरण जोशी

साहित्य संमेलनामधील 'वाद' ही नवीन बाब नाही. या ना त्या कारणाने प्रत्येक संमेलनामध्ये वाद झडतच राहतात पण, त्याचे पडसाद व्यासपीठावर उमटू नयेत याची दखल मात्र, साहित्यिकांकडून घेतली जात नाहीये. अध्यक्षपद, माजी अध्यक्ष आणि महामंडळाच्या भूमिकेमुळे वादात सापडलेल्या या संमेलनाचा वाद आता व्यासपीठावर रंगू लागल्याने राजकारण्यांसारखी साहित्यिकांमधील गटबाजी उघडपणे दिसून येत आहे.

डॉ. आनंद यादव यांनी संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ख-या अर्थाने हे संमेलन वादाच्या भोव-यात सापडले. डॉ. यादव यांच्या राजीनाम्यामुळे साहित्यिकांच्या अस्मितेला धक्का लागल्याची जळफळाट संमेलनास उपस्थित असणा-या तोकड्या साहित्यिकांकडून व्यक्त केली जात आहे. रामदास फुटाणे, अशोक नायगावकर यांच्यासह इतर साहित्यिकांनी जाहीर नाराजी व्यक्त करून डॉ. यादव यांच्या अध्यक्षीय भाषणाची प्रत देण्याची मागणी केली.

डॉ. यादव यांचा राजीनामा मंजूर केला नसल्यामुळे तेच अध्यक्ष आहेत असा मुद्दा उपस्थित करून त्यांच्या भाषणाची प्रत देण्याची मागणी केली. राजन खान, मधू मंगेश कर्णिक, राम शेवाळकर आदींनी या मागणीचे समर्थन करीत डॉ. यादव यांना पाठिंबा दिला आहे.

काहीही करून भाषणाच्या प्रती बाहेर पडाव्यात प्रयत्न केला जात असतानाच व्यासपीठावरील साहित्यिक मात्र, डॉ. यादव यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहेत.

महामंडळाने संधी दिली म्हणून त्यांच्या भूमिकेचे समर्थन करणे क्रमप्राप्त आहे या अर्थाने व्यासपीठावरील साहित्यिक मूळ विषयाला बगल देऊन डॉ. यादवच कसे चुकीचे आहेत, हे ठासून सांगत आहेत. शंकर अभ्यंकर, ह. मो. मराठे यांच्यासारख्या दिग्गजांनी अप्रत्यक्षपणे का होईना पण, हाच वाद व्यासपीठावर आणला त्यामुळे साहित्यप्रेमी नाराज झाले आहेत. दुसरीकडे केवळ पदासाठी आसुसलेल्या स्वयंघोषित साहित्यिक या वादाची मजा घेत आपले काही साध्य होते का? या प्रयत्नात आहेत.

साहित्यप्रेमींना या वादाबद्दल काही देणेघेणे नाही, त्यांना साहित्यविषयक चांगले विचार ऐकण्यासाठी ही मंडळी जमलेली आहेत. महाबळेश्वरासारख्या छोट्या गावात संयोजकांनीही उत्तम संयोजन केले आहे. पण, साहित्यिकांनीच साहित्यमुल्यांना तडा देत संमेलनाला गालबोट लावले आहेत.