बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

एकत्र कुटुंबाची क्रेझ वाटतेय....

लग्न ठरवायला किंवा आपला मनपसंत जोडीदार निवडायला मदत करणार्‍या ‘शादी डॉट कॉम’ या वेबसाईटने एक वेगळाच निष्कर्ष समोर आणला आहे. त्यांच्या मते या साईटवर मनपसंत जोडीदार निवडण्यासाठी येणार्‍या 54 टक्के मुला-मुलींनी एकत्र कुटुंबात राहणार्‍या जोडीदाराला पसंती दर्शवली आहे. यात मुलींची संख्या लक्षणीय आहे. कारण काहीही असो पण एकीकडे एकल कुटुंबात जन्मलेल्या आणि नात्यांना मुकलेल्या मुला मुलींना आता माणसं हवीशी वाटत आहेत. लहानपणापासून घरात एकटेच वाढलेले किंवा विभक्त कुटुंबात वाढलेले मुलं-मुली आपल्या संसाराचा जेव्हा विचार करू लागली आहेत तेव्हा त्यांना एकत्र कुटुंब असावं असं वाटत आहे. म्हणजे भारतीय संस्कृतीचा जो पाया आहे तो अजूनही भक्कम आहे असं म्हणायला हरकत नाही.

आज एकत्र कुटुंबाची एवढी मोठी क्रेझ का वाटू लागली आहे याला अनेक कारणं आहेत. एकतर ज्या मुलांनी घरात फार माणसं पाहिलेली नाहीत किंवा ज्यांना नात्यांची आस आहे त्यांना आपल्या संसारात एकत्र कुटुंब असावं असं वाटत राहतं. याचं दुसरं कारण एकत्र कुटुंबात घरात मिळणारा पाठिंबा हेही आहे. आज नवरा बायको दोघांना नोकरी करावी लागते अशावेळी घरात कोणीतरी असण्याची किंमत काय असते हे आता त्यांना कळून आलं आहे. आजारपणात आपलेपणाने चौकशी करणारं किंवा आपल्या अनुपस्थितीत कुणीतरी घराकडे लक्ष ठेवणारं असेल तर बाहेरच्या जबाबदार्‍या किती निश्चिंतपणे पार पाडता येतात याची जाणीव आता नव्या पिढीला होऊ लागली आहे. आजवर एकत्र कुटुंब म्हणजे केवळ भांडय़ाला भांडं लागणं, स्वातंत्र्य गमावणं किंवा मनाप्रमाणे निर्णय न घेता येणं असंच चित्र रंगवलं गेलं होतं. (यात माध्यमांचा फार मोठा वाटा आहे!) पण आपली जबाबदारी झटकून न टाकणार्‍या नव्या पिढीतल्या काही शिलेदारांना कर्तव्य आणि भावना यांचा मध्य गाठायचा असेल तर एकत्र कुटुंबाशिवाय पर्याय नाही याची जाणीव झाली आहे.

आर्किटेक असलेली सुरभी म्हणते, ‘माझं बालपण एकतर शाळेत किंवा पाळणाघरात गेलं. कारण आई-बाबा दोघं नोकरी करायचे. आजी - आजोबांशी पटत नाही म्हणून त्यांच्यापासून आम्ही कायम दूर राहिलो पण जेव्हा माझ्या मैत्रिणी आजीच्या हातचा डबा आणायच्या किंवा त्यांच्या आजोबांबरोबर बागेत किंवा फिरायला जायच्या तेव्हा मला खूप एकटं वाटायचं. त्यामुळे मी ठरवलं की मला एकत्र कुटुंबात संसार करायचा आहे.

WD


मला मुलांना सगळी नाती मिळवून द्यायची आहेत. त्यासाठी काही गोष्टी अँडजेस्ट कराव्या लागतात. प्रसंगी तुम्हाला प्रायोरिटी बदलाव्या लागतात पण त्यातून मिळणारं समाधान मोठं आहे. मी वेळी अवेळी घराबाहेर पडले तरी घरात मुलांनी जेवण केलं असेल का किंवा त्यांचा अभ्यास झाला असेल का अशी काळजी मला करावी लागत नाही कारण घरात त्यांची आजी, काकू, काका अशी सगळी माणसं आहेत.’
विहारचा अनुभव त्याहून वेगळा आहे. तो म्हणतो, ‘मागच्या पिढीच्या चुकांकडून आपण काही शिकलं पाहिजे. माझे आई-वडील त्यांच्या आई-वडिलांकडे राहिले नाहीत. पण म्हातारपणी आजी-आजोबांकडे पाहायला कोणी नाही याची खंत त्यांना कायम जाणवायची.

WD


ही परिस्थिती आपली होऊ नये याची काळजी मी घेतो. कारण कितीही मतभेद झाले तरी आई-वडिलांची काळजी ही वाटतेच. त्यांनाही भरल्या घरात राहण्यासारखं सुख नाही. त्यामुळे मी एकत्र कुटुंबात राहण्याचा निर्णय घेतला. माझ्या बायकोने त्याला पूर्ण साथ दिली त्यामुळे आज माझ्या मुलांना आजी-आजोबांचं प्रेम मिळतंय.’

आज पुन्हा एकदा नवी पिढी एकत्र कुटुंबाला प्राधान्य देताना दिसतेय. कारणं काहीही असली तरी त्यांना या परस्पर जिव्हाळ्याची ओढ वाटतेय. ते पार कसं पाडायचं हा विचार आता त्यांनी करायला हवा. आजवर स्वतंत्र शैलीत राहण्याची सवय झाली असेल तर आपल्या मतांना थोडी मुरड घालायची आणि परिस्थिती सांभाळून घ्यायचं कौशल्य त्यांनी दाखवायला हवंय. एकत्र कुटुंबात राहताना काही गोष्टी टाळल्या तर हा सहवास अधिक सुखकारक होऊ शकतो. मोठय़ांचं म्हणणं एकदम खोडून काढू नका. काही गोष्टी पटल्या नसतील तरी एकदम नकाराचा सूर लावू नका. प्रश्न मांडल्याने सुटतील यावर विश्वास ठेवा. कोणतीही समस्या समोरासमोर बसून सोडवली तर चांगली सुटते.

WD


मोठय़ांचा आदर तुम्ही करायला शिका आणि मुलांना करायला शिकवा म्हणजेच मुलंही मोठी झाल्यावर तुम्हाला आदर देतील. घरात कितीही मतभेद झाले तरी ते चार भिंतीत राहू द्या. काही चुका झाल्या तरी तत्काळ आरोप करू नका. शहानिशा करून विचार विनिमय करा. दोष दिल्याने नाती तुटतात. एकत्र कुटुंबात राहण्याचा निर्णय घेत असाल तर या गोष्टींवरही एकदा विचार करा. म्हणजे या मार्गातले खाचखळगे पार करणं सोपं जाईल!