मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

घराच्या सजावटीस इनडोर प्लॅन्ट

शहरीकरण झपाट्याने झाल्याने घराचे अंगण हरवले आहे. त्यामुळे बागबगिचा ही संकल्पना काळाच्या पडद्याआड गेली आहे. घरांचे ब्लॉक झाल्याने घरातच लहान कुंड्यामध्ये विविध प्रकारची रोपे लावून घराचे सौंदर्य वाढविले जाते. इनडोअर प्लॅन्ट घराच्या सौंदर्यात भर घालतात, त्याचप्रमाणे घरात सुखकारक वातावरण निर्माण करतात. घराच्या दिवाणखाण्यातील सोफ्याशेजारी, जिन्याच्या पायर्‍यांवर तसेच डायनिंग टेबलवर इनडोर प्लॅन्टची कुंडी ठेवून घराची सजावट केली जाते.

घरात इनडोर प्लॅन्ट ठेवल्याने इंटिरिअर डेकोरेटरची कमतरता तुम्हाला झाकता येऊ शकते. आपल्या घरात मोजकेच फर्निचर असल्याने त्याच्या जागी तुम्हाला एक मोठी कुंडी आणून ठेवा ती खाली जागेचा उपयोग होईल. तसेच लहान कुंड्यामध्ये बोगनवेली, मालती, चमेली, मनी प्लॅन्टस् घराच्या मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला ठेवून घर सजवू शकता. घरात अथवा गॅलरीत कुंड्या ठेवायला जागा नसेल तर एका प्लॉस्टिकच्या बास्केटमध्ये शो ची रोपे लावून ते टांगू शकता. लहान मोठ्या बास्केट खिडकी अथवा गॅलरीमध्ये खूपच सुंदर दिसतात. चायनीज पध्दतीने तयार करण्यात आलेल्या कुंड्या बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या असून त्याच्यात विविध रोपे लावून घरात ठेवण्याची आजकाल फॅशन झाली आहे. या कुंड्यांवर आकर्षक चित्रे काढल्यास त्या अधिकच सुंदर दिसतात.

  ND
इनडोर प्लॅन्टची काळजी कशी घ्याल?
* प्लॉस्टिकच्या कुंड्या तर आकर्षक असतात, मात्र यात रोपटी लवकर मरतात. त्यामुळे आधी मातीच्या कुंडीत रोपटे लावावे. ते जगल्यानंतर त्याला प्लॉस्टिकच्या कुंडीत ठेवावे.
* रोपटे फूलदाणीत ठेवायचे असल्यास फूलदाणीत आधी थोडे पाणी टाकावे. म्हणजे ते जास्त दिवस ताजे राहते.
* स्प्रे द्वारे रोपट्याच्या पानांची नियमित स्वच्छता करावी.
* वर्षातून एक वेळा कुंडीतील माती बदलून घ्यावी.
* इनडोर प्लॅन्टला दोन दिवसातून एक वेळा पाणी दिले तरी पुरेसे असते.
* सुर्याच्या सरळ येणार्‍या किरणांपासून इनडोर प्लॅन्टला वाचविले पाहिजे.
* पाच ते सहा दिवसामधून रोपट्यांना खुल्या हवेत ठेवले पाहिजे.
* महिन्यातून एक वेळा बोनमिल पावडर कुंडीत टाकली पाहिजे.