शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

मुलांना बनवा रफ अ‍ॅण्ड टफ

सुटी आली की आजकाल पालकांना काय करू आणि काय नको असं होतं. कारण एरवी शाळा आणि क्लासच्या जीवावर असलेले पालक मुलांना हाताळायचं म्हटलं की एकदम हतबल होऊन जातात. मुलांच्या वयाप्रमाणे त्यांच्यात मिसळून खेळण्याची ना त्यांच्याकडे सवड आहे ना ताकद. त्यामुळे सुटीतले मुलांचे उपक्रम आतापासूनच ठरवायला सुरुवात झाली आहे. या वेळेचा उपयोग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी करता आला तर कुणाला नको आहे? त्यातून मुलांच्याही आवडीचं काही करायला मिळालं तर सोन्याहून पिवळं. म्हणूनच आजकाल साहसी शिबिरांना मागणी वाढली आहे. त्यात सहभागी होऊन मुलंही खुश दिसतात आणि पालकांनाही काही तरी दिल्याचं समाधान मिळतं. 
 
साहस शिबिरे म्हणजे नक्की काय? यात अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करायला मुलांना शिकवलं जातं. जिथं तंबू ठोकून मुक्काम करावा लागतो. घराच्या सोयींशिवाय राहण्याची तयारी करावी लागते अशा परिस्थितीत मुलांना पाठवणं म्हणजे एकप्रकारे त्यांची घरापासून लांब राहण्याची मानसिक तयारी करणंच आहे. जगात एकटं राहण्याची ही पूर्वतयारी आहे असं म्हणायलाही हरकत नाही. आजकाल मुलांना फार लवकर घराच्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून जगाशी सामना करावा लागतो. त्याची तयारी अशा छोट्या-मोठ्या शिबिरांतूनच होणार असते. तिथे पालक नसतात, मित्र-मैत्रिणींचा परिचित घोळका असण्याची शक्यता कमी असते. इतरांशी जमवून घ्यावे लागते. प्रसंगी मनाला मुरड घालावी लागते. या सगळ्याची ओळख घरातल्या चार भिंतीत होणं तसं अवघड आहे. आजकाल घरात एकटेच लहान मूल असलेल्या मुलांना इतरांशी जमवून घेण्याची सवयच नसते. त्यांना अशा परिस्थितीत बाहेरच्या जगाशी ओळख होण्याची ही चांगली संधी म्हणायला हवी. 
 
या साहसी शिबिरात इतरही अनेक गोष्टी ज्या मुलांना त्यांच्या रुटीन लाईफमध्ये करायला मिळत नाहीत त्या करायला मिळतात. आजकालच्या शहरी वातावरणामुळे मुलांना निसर्गाच्या जवळ जायला मिळत नाही. मातीत खेळायला, डोंगर चढायला किंवा वन्य प्राणी जंगलात जाऊन बघायला मिळत नाहीत.त्यातल्या काही गोष्टींचा आनंद मुलांना अशा शिबिरात घेता येतो. मुलांना निसर्गाच्या चमत्कृतीपूर्ण आश्चर्यांची ओळख यावेळी होते. एरवी फक्त टी.व्ही.मध्ये पाहिलेले धाडसी खेळ प्रत्यक्ष करायला मिळाल्यावर त्यातला आनंद काही वेगळाच असतो. रिअ‍ॅलिटी शो म्हणजे तरी काय असतो? त्या कार्यक्रमात भाग घेणा-या मुलांची तयारी अशा शिबिरात भाग घेऊनच झाल्याचे आपण पाहतो. पाण्यातील खेळ हे या अशा शिबिरांचे मुख्य आकर्षण आहे. वॉटर राफ्टिंग, स्किर्इंग, पाण्यावर बांधलेल्या दोरीने नदी पार करणे, अशा गोष्टींची त्यांना सवय होते. या गोष्टी करताना त्यांना मार्गदर्शनही मिळते. त्यामुळे सुरक्षितताही वाटते. मुलांमध्ये काही गोष्टींची सवय व्हायला अशी निवासी शिबिरे उपयुक्त ठरतात. 
 
काही गोष्टी या साहस शिबिरात मुलांना करता येतात. या साहसी शिबिरात मुलांना अंगमेहनतीचीही सवय होते. चालणे, पळणे, डोंगर-किल्ले चढणे, पोहणे वगैरे गोष्टींची त्यांची ओळख होते. शिवाय हे सगळं ब-याच मोठ्या ग्रुपमध्ये होत असल्याने त्यात सर्वांबरोबर काम करण्याची आणि वाटून घेण्याची वृत्ती वाढते. मुलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठीही त्याचा फार उपयोग होतो. निर्णयक्षमता वाढणे, आत्मविश्वास वाढणे, सगळ्यात मिसळण्याची वृत्ती वाढणे अशा अनेक गुणांचा विकास मुलांमध्ये करता येतो. यासाठी वेगळं काही करायची गरजही नसते. हे गुण मुलांमध्ये उपजतच असतात पण त्यांना जोखण्याची, इतरांपुढे प्रकट होण्याची संधीच मिळत नाही. अशा शिबिरात घरापासून लांब असताना काही गुणांचा विकास होत असतो. सांघिक भावना वाढीस लागणे हा या शिबिरांचा एक मुख्य उद्देश म्हणायला लागेल. नेतृत्वगुण वाढीस लागणे हाही त्यातला एक महत्त्वाचा फायदा आहे. अनेकांच्या अंगात ही कला उपजतच असते. पण संधी न मिळाल्याने त्याची जाणीव होत नाही. अशा मुलांना तर अंगचे गुण दाखवण्याची संधी मिळतेच पण ज्यांच्या अंगात तो गुण नसतो त्यांनाही तो अंगी बाणवण्याची संधी मिळत असते. 
 
साहसी शिबिरांचे असे अनेक फायदे दिसत असले तरी त्यातले काही अन्य पैलूही लक्षात घ्यायला हवेत. आपल्या मुलांना काही दिवस लांब ठेवायचं म्हणजे पालकांचा जीव खालीवर होत असतो. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेची पूर्ण खात्री झाल्याशिवाय अशा शिबिरांचा पर्याय न निवडलेलाच बरा. त्यातूनही खाजगी किंवा सरकारी शिबिरे यात निवड करायची झाली तर मान्यता असणा-या शिबिरांना नेहमीच प्राधान्य द्यावे. बरोबरचे प्रशिक्षक कसे आहेत? त्यांचा अनुभव काय आणि आपल्या ओळखीत अशी शिबिरे केलेल्या पालकांचे अनुभव काय याचा विचार पालकांनी आवर्जून करायला हवा. मुलांना एका वेगळ्या विश्वाची ओळख करून देताना योग्य त्या सुरक्षा साधनांची चौकशी केली तर मुलांना अशा शिबिरातून आपलं व्यक्तिमत्त्व खुलवायची संधी अवश्य द्यायला हवी. ही त्यांच्या आगामी आयुष्यासाठी मोठी शिदोरी ठरू शकते आणि सुटी सार्थकी लागल्याचे समाधानही मिळवून देऊ शकते. 

- मोना भावसार