शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

लग्न जुळवताय? सावधान !

तुळशीच्या लग्नानंतर विवाहेच्छू तरूण-तरूणींसाठी स्थळसंशोधन सुरू होतं. प्रत्येक समाजात वर- वधू मेळावे भरविले जातात. मुला-मुलीच्या वि‍वाहासाठी पालकवर्ग आयुष्यभर जमा केलेली पुंजी खर्ची घालतात. केवळ विश्वासाच्या जोरावर दोन अनोळखी जीवांना एकत्र आणतात. परंतु, काळाच्या प्रवाहात 'विश्वास' मागे पडला आहे. समाजात चोर- भामट्यांचा सुळसुळाट झाला आहे. निरखून, पारखून 'संशोधन' नाही केले तर अंती फसवणूक पदरी पडते. शेवटी नशिबाला दोष देण्यात संपूर्ण आयुष्य निघून जाते. त्यामुळे विवाहाची बोलणी करण्यापूर्वीच काळजीपूर्वक पाऊल उचलणे गरजचे आहे. 
 
विशेषतः मुलीच्या बाबतीत फसवणुकीची शक्यता जास्त असते. त्यातही मुलीची अब्रू समाजात अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे तिची फसवणूक झाल्यास आयुष्यभर स्वतःला कोसत बसण्याशिवाय तिच्यापुढे पर्याय उरत नाही. म्हणूनच मुलीच्या पालकांनी कुणाही अनोळखी मुलाच्या गळ्यात आपल्या मुलीला हार घालण्यापूर्वी नीट चौकशी केली पाहिजे. भावनेच्या भरात घाईगडबडीने घेतलेला निर्णय चुकू शकतो.
 
मुलीसाठी चांगल्या वराची निवड करताना पालकवर्गात जागरूकततेचा अभाव आहे. वरचेवर आपण मुलाला पाहतो, त्याला मुलगी दाखवतो आणि उडवून टाकतो लग्नाचा बार! मात्र आता काळ झपाट्याने बदलत जात आहे. वधु पित्याच्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. म्हणूनच वर आणि वधुची माहिती काढण्यासाठी हल्ली डिटेक्टिव नेमले जात आहेत. गेल्या दोन वर्षात डिटेक्टिव लोकांना तर सुगीचे दिवस आले आहेत.
 
वराची माहिती काढताना विद्यार्थीदशेपासून तर पार पोलीस रेकॉर्ड पाहिले जाऊ लागले आहे. मुलासह त्याच्या कुटुंबियांची आर्थिक स्थिती, वर्तणूक, त्यांचे समाजातील स्थान, मुलाचे शिक्षण व नोकरीविषयी सखोल माहिती मिळविली जात आहे. अगदी डिटेक्विव नाही नेमला तरी तुम्हीही विवाह जुळवताना खालील काळजी घ्या. 
 
1) विवाह जुळवताना वर संदर्भात थोडासाही संशय आल्यास त्याविषयी संपूर्ण माहिती काढा. 
2) नातेवाईकांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा.
3) विवाहावर लाखो रूपये खर्च करण्यापूर्वी थोडे पैसे खर्च करून मुलाची संपूर्ण माहिती करून घेणे महत्त्वाचे आहे. 
4) बायोडाटा व नोकरी ठिकाणचे कागदपत्र जाणीवपूर्वक तपासून पहा.
5) मुलासह त्याच्या कुटुंबियांची आर्थिक स्थिती, वर्तणूक, त्यांचे समाजातील स्थान, मुलाचे शिक्षण व नोकरीविषयी सखोल माहिती मिळवावी.
6) मेडिकल सर्टीफिकेट व रक्त गट देखील जाणून घ्या. एचआयव्ही टेस्टही करून घ्या. 
7) विवाहापूर्वी त्या मुलाची दोन- तीनदा भेट घ्या. 
8) वेबसाइटच्या माध्यमातून विवाह जुळवताना अधिक लक्ष दिले पाहिजे. 
9) दबावात विवाह जुळवणी करू नये.
10) डिटेक्टिव नेमायचा असेल तर तो प्रोफेशनल असला पाहिजे. कारण या कानाची खबर त्या कानापर्यंत पोहचत नाही.