गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

व्हिनेगरमुळे मुंग्या, माशा, पाली, वास, डाग. छूऽऽऽ

व्हिनेगर आणि स्वच्छता

- स्वयंपाकघरातली स्टीलची बेसिन्स खूपदा मळकट दिसू लागतात. २ टेबलस्पून मीठ व १ टीस्पून पांढरं डिस्टिल्ड व्हिनेगर यांची पेस्ट बनवून त्या पेस्टनं बेसिन घासल्यास ते चकचकीत होतं.

- बेसिनमध्ये अन्नकण गेल्यानं कित्येक वेळा घाणेरडा वास येतो. तो जाण्यासाठी पांढरं डिस्टिल्ड व्हिनेगर प्रथम बेसिनच्या जाळीमध्ये बेकिंग सोडा घालून त्यावर ओतावं. मग ५ मिनिटं थांबून बेसिनच्या पाइपात गरम पाणी ओतावं.

- कचर्‍याच्या डब्यांमधली घाण जाण्यासाठी डबे प्रथम धुवून मग व्हिनेगर व सोड्याच्या मिश्रणानं घासून धुवावेत.

- ओव्हनच्या दरवाजावरचे तेलाचे, तुपाचे डाग काढण्यासाठी व्हिनेगरमध्ये स्पंज बुडवून दरवाजा व्हिनेगरनं पूर्ण ओला करावा. थोड्या वेळानं पुसून काढावा.

- काचेच्या पेल्यांवरचे धब्बे काढून टाकण्यासाठी पेपर टॉवेल्स व्हिनेगरमध्ये बुडवून पेल्यांच्या आत व बाहेर गुंडाळून ठेवावेत. त्यानंतर पाण्यानं पेले धुवून पुसून कोरडे करावेत

- व्हाइट डिस्टिल्ड व्हिनेगर आणि मीठ यांच्या मिश्रणानं चहाचे, कॉफीचे कप घासल्यास त्यावरील चहा-कॉफीचे डाग निघून जातात.

-  प्लास्टिकच्या डब्यांना लागलेले वास व्हिनेगरनं डबे पुसून काढल्यास जातात.

- मुंग्या येऊ नयेत म्हणून खिडकीजवळ, उपकरणांच्या आजूबाजूला, दारापाशी व्हाईट डिस्टिल्ड व्हिनेगर पसरावं.

- डायनिंग टेबलवर माशा बसू नयेत म्हणून एका बशीत व्हिनेगर ओतून ती टेबलवर ठेवावी म्हणजे माशा येत नाहीत.

- ओट्याच्या कडांना व्हिनेगर ओतून ठेवल्यास मांजरं ओट्यावर चढत नाहीत.  - डिस्टिल्ड व्हिनेगरमध्ये बुडवलेल्या स्पंजनं पंख्याची पाती, एक्झॉस्ट फॅनची जाळी, ओव्हनचा आतला भाग पुसल्यास तिथे असलेला  चिकटपणा  जातो.

- एखाद्या वस्तूवरची प्राइस टॅग किंवा लेबल काढून टाकण्यासाठी त्या लेबलवर व्हिनेगरमध्ये बुडवलेला कापडाचा तुकडा रात्रभर ठेवावा.

- स्वच्छतेसाठी वापरले जाणारे स्पंज, घासण्या, फडकी व्हिनेगर मिसळलेल्या पाण्यात रात्रभर बुडवून ठेवावीत.

बाथरूममधील स्वच्छता

- बाथरूम स्वच्छ व सूक्ष्मजीवविरहित ठेवण्यासाठी दरवाजे, खिडक्या, बेसिन्स, टब्ज, बादल्या, मग्ज, नळ हे सर्व व्हाईट डिस्टिल्ड व्हिनेगरनं पुसावं. नंतर धुवून टाकावं.

- टॉयलेटमध्ये  व्हिनेगर ओतल्यास घाणेरडा वास निघून जातो.

कपडे, गालिचे,  काचा, खिडक्या इस्त्री..

- ३ लिटर पाण्यात १ कप व्हिनेगर घालून त्या पाण्यानं लिनोलियम पुसल्यास ते चकचकीत होतं.

- व्हिनेगर, बेकिंग सोडा व मीठ यांच्या मिश्रणानं गालिच्यांवरचे डाग निघून जातात.

- लहान मुलं किंवा पाळलेले प्राणी काही वेळा घरात शी-शू करून घाण करतात. ती घाण पुसली तरी वास येत रहातो. तो न येण्यासाठी ती घाण उचलून तो भाग पुसून झाला की व्हिनेगरमिश्रित पाण्यानं तो भाग पुन्हा पुसावा.

- लहान मुलांच्या दुधाच्या बाटल्यांमध्ये सततच्या वापरामुळे एक प्रकारचा धुरकटपणा येतो. गरम पाणी व व्हिनेगर समभाग घेऊन बाटली भरून ठेवावी. एक तासभर तशीच ठेवावी. मग बाटली धुवायच्या ब्रशनं धुवून टाकावी.

- लहान मुलांची खेळणी  जंतुविरहित करण्यासाठी साबणाच्या पाण्यात व्हिनेगर घालून त्या पाण्यानं खेळणी धुवावीत. मग साध्या पाण्यानं धुवून कोरडी करावीत.

- काळ्या कपड्यांवर साबणाचा अंश राहिला की ते धुरकट दिसू लागतात. तसे दिसू नयेत म्हणून धुवून झाल्यावर शेवटी आगळताना पाण्यात थोडे व्हिनेगर मिसळल्यास साबणाचा अंश निघून जातो.

- पांढर्‍या मोज्यांवर, नॅपकिन्सवर पडलेले डाग काढण्यासाठी पाण्यात व्हिनेगर घालून ते उकळावे व त्या पाण्यात मोजे, नॅपकिन्स घालून रात्रभर ठेवावेत.  - कपड्यांवरचा घामाचा वास व डाग  जाण्यासाठी त्यावर व्हिनेगरचा स्प्रे मारून मग तो कपडा धुवावा.

- वॉशिंग मशिनमधला वास घालविण्यासाठी व पाइप स्वच्छ होण्यासाठी पाण्यात व्हिनेगर मिसळून  मशीन थोडा वेळ कपडे न घालता  चालवावं व मग पाणी काढून टाकावं.

- कपड्यांवरचे रंग चमकदार दिसण्यासाठी वॉशिंग मशिनमध्ये शेवटच्या रिन्सच्या वेळी अर्धा कप व्हिनेगर पाण्यात घालावं. यामुळे स्वेटर्सही भरलेले दिसतात.

- वाफ येणार्‍या इस्त्रीमधली छिद्रं स्वच्छ ठेवण्यासाठी इस्त्रीत घालण्याच्या पाण्यात व्हिनेगर समप्रमाणात मिसळावं. मग इस्त्री सुरू करून त्यातून थोडा वेळ वाफ येऊ द्यावी. नंतर पाणी काढून टाकून इस्त्रीमध्ये स्वच्छ पाणी भरावं. इस्त्रीवरले डाग काढण्यासाठीही व्हिनेगरचा उपयोग होतो.

- किडा चावल्यास किंवा कापल्यास व्हिनेगरमध्ये बुडवलेला कापसाचा बोळा त्यावर दाबून धरल्यास फायदा होतो.

- केसांचे ब्रश व कंगवे व्हिनेगरमिमिश्रत पाण्यात बुडवून ठेवून मग स्वच्छ धुवावेत. स्वच्छ व जंतुविरहित होतात.

- बूट, पर्सेस यासारख्या चामड्याच्या वस्तू व्हिनेगर व लिनसीड ऑइल यांच्या मिश्रणानं साफ कराव्यात.

- फ्लॉवरपॉटमध्ये पाणी घालून त्यात थोडे व्हिनेगर व साखर घालून मग त्यात फुलं ठेवल्यास ती खूप दिवस टिकतात.
व्हिनेगरसारख्या स्वयंपाकात उपयोगी पडणार्‍या वस्तूचे इतरही इतके उपयोग आहेत. हे पाहिलं की खरोखर कमाल वाटते..