शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By वेबदुनिया|

मराठी कथा बेघर

दाराला लटकलेल्या बंद कुलूपाकडे पहात आनंद किती वेळ तरी उभाच राहीला. भानावर आला तेव्हा त्याला समजलं की चौकीदार त्याला विचारतोय, 'कोन पायजेल साहेब'? पंडित बाई कुठे गेल्यात रे? आनंदने विचारल्यावर चौकीदार म्हणाला 'परवाच गेल्यातजी गावाला. महिना दीड महिना तरी येणार न्हाईत' अस कोणी तरी बाई म्हणत व्हती.

व्हरांड्यात लटकलेला केनचा झुला ग्रीलमधून दिसत होता. झुल्यावर बसून हलके झोके घेत चहा प्यायची सवय उमाची होती. हे त्याला आत्ता एकदम आठवलं. जे काय काम असेल, तर तांदूळ निवडणे, भाज्या निवडणे, वाचन विणकाम ती झुल्यात बसूनच करायची. किती शांत सोशिक उमा जशी काही देवघरांत मंदपणे तेवणारी समईच.

लग्नानंतरचे रंगीबेरंगी दिवस फुलपाखरासारखे उडून गेले. किती सुखाचे होते ते दिवस. पुन्हा येतील का? एक विचार आनंदच्या मनांत चमकून गेला. कालचक्र उलटे फिरवून जूने दिवस आणता आले असते तर झालेल्या चुका सुधारता येतील. आनंदच्या मनात विचारांचे काहूर उठले. लग्नानंतर वर्ष दीड वर्षानंतर उमाला बाळ हवं होतं.

पण आपलाच हट्ट आडवा आला आणि सारा सत्यानाश झाला. आपणच नको नको म्हणून तिला थांबवलं. रोज जबरीने गोळी घ्यायला लावल्याशिवाय तिला स्पर्श केला नाही, कां? तर इतक्या लवकर मुल नको म्हणून! खरचं चुकलंच आपलं. आज आनंदला केल्या चुकीचा पश्चाताप होतोय पण उपयोग नाही.

उमाने आनंदला अगदी भरभरून सुख दिले. स्वतःची बॅंकेची नोकरी सांभाळून तर्‍हतर्‍हेचे पदार्थ करून आनंदला तृप्त करत होती. बँकेच्या परीक्षा देत होती. पास होत होती. मजेचा संसार होता. सुखच सुख. तिच्या बँकेच्या लोनवरच त्यांचा छोटासाच का होईना फ्लॅटपण झाला. 'आता बाळ हवं' या तिच्या हट्टाला मात्र आनंद तयार नव्हता. 'थांब'ग थोडी, फिरू मजा करू मग तुला हवी तितकी बाळं! हे त्याच ठरलेल उत्तर असायचं. असं करता करता आठ नऊ वर्ष उलटली.

आनंद एका कंपनीत सर्व्हिसला होता पगार चांगला. पण काम भरपूर. प्रायव्हेट कंपनी नं? हौसमौजेच्या सार्‍या वस्तू घरात आल्या. बरंच फिरून झालं. आता एक ग्रॅंड युरोप ट्रीप झाली की मग बाळ आणू. आनंदने जाहीर केलं. उमा आनंदली, मोहरली. युरोप ट्रीपची तयारी सुरू असतानाच उमाची तब्येत बिघडली. आणि त्यानंतर बिघडतच रा‍हीली. प्रॉब्लेम मासिक पाळीचाच.

कधी दोन दोन तीन तीन महिने नाही तर कधी एकदा सुरू झालं की नळ फुटावा तसं ब्लिडींग व्हायचं. काय होतंय काही कळेना. निरनिराळ्या डॉक्टरांना दाखवणं, टेस्टस्, एक्सरे, सोनोग्राफी. काय अन् काय हेच चक्र सुरू झालं. अतिरिक्त गोळ्या व मानसिक ताण यामुळेच हे सर्व झालं असं डॉक्टरांचं म्हणणं पडलं.

उमाच्या तब्येतीमुळें युरोप ट्रीप बारगळली. जेमतेम बँकेचे काम उरकून घरी येऊन पडून रहायची उमा! कधी पुस्तक हातात पण नजर शुन्यात असं व्हायचं. कितीदा तरी तिला डोळे पुसताना आनंदने पाहिलं होतं, पण काय करणार. इलाज नाही. एवढी आनंदी उमा पण हल्ली खिन्न उदास झाली होती, आता तर औषध गोळ्या तिच्या मागे लागल्या होत्या.

आपल्याच नशिबाचे भोग दुसरं काय? स्वतःची समजूत घालत बसे. तब्येत जास्तच बिघडू लागली त्यावर गर्भाशय काढून टाकणे हाच निर्णय डॉक्टरांनी घेतला. आनंद तिच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हता. त्याचं अपराधी मन त्यालाच खाऊ लागलं. ऑपरेशन झालं. उमा रिकामी होऊन घरी आली.

काळ कोणासाठी थांबत नाही. तो आपल्या गतीने पुढे पुढे जातच असतो. हळूहळू उमा बरी झाली. वेळेतच डिलीव्हरी होऊ दिली असती तर ! हे जर तर चे विचार हल्ली त्याच्या मनात खूपदा येत. उमानंतर आनंदने प्रीतीशी अनुनय करायला सुरवात केली. पण त्यांच्यातही एक दिवस कडाक्याचं भांडण झालं. ते इतकं विकोपाला गेलं की प्रिती म्हणाली 'तुम्हारी सारी बाते चूपचाप सहने सूनने के लिये मैं तुम्हारी बिबी थोडे ही हूँ. मेरे घरसे निकल जाओ.

गेट आऊट म्हणून हात ओढू लागली. या फ्लॅटचे पैसे मी दिले आहेत असे आनंदने म्हणताच 'मैं पगली नही हूँ, तुम्हारे जैसे बुढ्ढे के साथ शादी जो करू. मेरे प्यार में तुम उल्लू बन गये थे. कान खोलकर सुनो मेरी शादी किसी ओर से हो रही है. इतनी अच्छी पत्नी को छोड दिया कल मुझे भी छोडोगे. तुम्हारा क्या भरोसा गेट आऊट' असे म्हणत तिने धाडकन दरवाजा बंद केला.

आज आनंद आपली सुटकेस घेऊन उमाकडे आला. दाराला कुलूप पाहून उभाच राहिला. इतक्या वर्षांच्या सगळ्या घटना, सगळे प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून सरकत गेले. जणू आपल्या आयुष्याचा चित्रपटच पाहिला त्याने, त्याचे आई-वडील कधीच हे जग सोडून गेलेले होते. भाऊ बहिण नव्हतेच. जवळचं नात्याचं असं कोणीच नाही जे कोणी होते त्यांच्याशी कधी संबंधच ठेवले नाहीत.

एका उमाचीच आशा होती. निदान अंग टाकायला ओसरी तरी देईल ती! परंतु ती ही इथे गावात नव्हती. कुठे तरी ट्रीपला गेली होती. होते नव्हते सगळे पैसे प्रीतीवर खर्च झाले. महिन्याचा पगार येईल तोच पैसा तोवर रहायचं कुठे हा प्रश्न भेडसावत होता. नियती खदखदून हसत होती. दोन दोन घरं असून आनंद बेघर होऊन आज उमाच्या अंगणात उभा होता.

-सौ. सुभाषिणी मधुक्रर कुकडे