शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By वेबदुनिया|

मराठी कथा : सासू-सून

शीलाचे सासरे रामशरण भटनागर व सासू कौशल्या यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सासूबाई व सासरेबुवांची सर्व मित्रमंडळी व त्यांचे भाऊ-बहिण देखील कार्यक्रमास उपस्थित होते. जेवणाची व संपूर्ण सजावटीची जबाबदारी शीलाने स्वीकारली होती. स्वयंपाक खूपच चविष्ट झाला असल्याने आलेल्या पाहुण्यांकडून शीलाचे कौतुक होत होते. व्यासपीठावर विराजमान झालेल्या शिलाच्या सासू-सासऱ्यांचा आनंद तर गगनात मावत नव्हता. त्यांनी पन्नास वर्षे सुख-समृद्धी व आनंदात घालवली होती. 
  
मित्र परिवारामध्ये ते 'यशस्वी जोडपे' म्हणून ओळखले जायचे. त्यांना मुला-मुलींनी व भावा-बहिणींनी भेटवस्तू दिल्या. त्यात सर्वात आकर्षक भेटवस्तू शिलाच्या पतीने आणली होती. ती होती काचेचा ताजमहाल. शीलाच्या सासू-सासऱ्यांनी ती भेटवस्तू स्वीकारून आपल्या मुलाला व सुनेला आशीर्वाद दिले. नंतर शीलाला तो ताजमहाल लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशा जागी ठेवायला सांगितले. 
 
शीला ताजमहाल घेऊन ठेवायला गेली आणि तिचा पाय साडीच्या पदरात अडकून ती ताजमहालासह पडली. जोरदार आवाज झाला आणि ताजमहालाचे तुकडे तुकडे झाले. तो प्रसंग पाहून शीलाला पाहुणे मंडळी तिच्या गलथानपणाविषयी बोलायला लागली. शीलाचा पतीही तिच्याकडे रागाने पाहू लागला. शीलाला रडू आवरले नाही. शीलाला पाहून तिची सासू कौशल्या मात्र तिच्याकडे धावतच गेली. तिने तिची समजूत घालत सांगितले, की ताजमहालच फुटला ना. काळजी करू नको. तो पुन्हा आणता येईल. 'सास भी कभी बहू थी' असे म्हणत तिने तिचा गतकाळ उपस्थितांना सांगितला. त्या म्हणाल्या, मी सून असताना जे भोगले ते माझ्या सुनेसोबत होऊ देणार नाही. शीलाच्या सासूनं एवढे म्हटल्याने वातावरण बऱ्यापैकी थंड झाले. ताण सैलावला. शीलाची सासू पाहुण्यासमोर शीलाचे गुण गात होती. शीलादेखील तिच्या कामात व्यस्त झाली आणि मनात विचार करू लागली, अशी सासू सगळ्यांना मिळाली तर.... 
 
थोडक्यात.... सून देखील मुलगी असते. चूक प्रत्येकाच्या हातून होते. त्यामुळे सुनेला मुलीसारखी वागणूक मिळायला पाहिजे नाही का?