Widgets Magazine
Widgets Magazine

मराठी कथा : परीक्षा

jallosh
वेबदुनिया|
PR
ही महाभारतातील कथा आहे. कौरव-पांडवांचे युध्द संपल्यानंतर भगवंत पांडवांचा निरोप घेऊन द्वारकेला जायला निघाले. ते राजस्थानच्या वाळवंटात आले. तेथे उत्तंक मुनींचा आश्रम होता. तेथे ते गेले. मुनींनी त्यांचे आनंदाने स्वागत केले. त्यांच्या सेवेने प्रसन्न होऊन भगवंत म्हणाले, ‘तुम्हाला काय पाहिजे ते मागा.’ तेव्हा मुनी म्हणाले, ‘या मरूभूमीत पाणी मिळत नाही. जेव्हा मला तहान लागेल तेव्हा पाण्याची व्यवस्था व्हावी, मला अमृत पाजले तर त्याहून बरे होईल.’ यावर भगवंत म्हणाले, ‘आम्ही तुम्हाला अमृत देऊ, पण जो कोणी अमृत घेऊन येईल त्याला तुम्ही ओळखले पाहिजे. तरच तुम्हाला अमृत मिळेल,’ असे म्हणून भगवंत द्वारकेला निघून गेले.

पुढे काही दिवसांनी उत्तंक मुनी वाळवंटात फिरत असताना त्यांना अतिशय तहान लागली. जीव व्याकूळ झाला. घसा कोरडा पडला. त्यांनी भगवंताचे स्मरण केले. त्यांना असे दिसले की एक काळा कभिन्न, अक्राळ विक्राळ असा चांडाळ येतो आहे. त्याच्यामागे त्याची क्रूर व राक्षसी मोठी चार कुत्री येत आहेत. त्यांच्या दोर्‍या हातात घेऊन तो धावतो आहे. त्याचे मूत्र खाली पडत आहे. तो उत्तंक मुनीजवळ येत म्हणाला, ‘तुला तहान लागली ना? घे हे मूत्र, पी.’ मुनींना किळस आली. त्यांनी रागाने त्याला नको म्हणून हाकलून दिले. ‘चालता हो इथून’, हे ऐकल्यावर तेथे इंद्र प्रकट होऊन म्हणाले, ‘मी चांडाळ नसून इंद्र आहे. मला भगवंतांनी अमृत घेऊन पाठवले होते. तुम्हाला ते ओळखता आले नाही. भगवंताची अट पूर्ण करू शकला नाहीत. मी चाललो.’ त्याचे बोलणे ऐकून मुनी व्याकूळ झाले. ते भगवंताचे स्मरण करून ‘देवा, तुम्ही मला फसवलं. पण आता माझ्या पाण्याची काय सोय?’ म्हणू लागले. तेव्हा भगवंत प्रगट होऊन म्हणाले, ‘तू पाणी मागता मागता अमृत मागितलेस. आता अमृताचा आग्रह धरू नकोस. पण तुला तहान लागली तर माझे स्मरण कर. त्यावेळी आकाशात ढग येऊन तुझ्यापुरते पाणी देतील नि निघून जातील.’ तेव्हापासून मरुभूमीत असे लहान लहान ढग येतात. म्हणून या ढगांना उत्तंकमेघ असे म्हणतात.
रजनी थिंगळे


यावर अधिक वाचा :