शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

पालक वड्या

साहित्य : एक जूडी मोठ्या पानांचा पालक, 1 कप बेसन, आवडीप्रमाणे हिंग, तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, आले लसूण वाटण, गूळ वा साखर, आंबटपणासाठी एक टेबलस्पून चिंचेचा कोळ किंवा दोन टेबलस्पून दही, एक टिस्पून तेल (वरून फोडणी द्यायची असेल तर जास्त फोडणीसाठी तीळ, मोहरी, हिरवी मिरची) वरून पसरण्यासाठी कोथिंबीर आणि ओले खोबर.
कृती : पालकाच्या पानांचे शिरा वगळून मोठे मोठे तुकडे करून घ्या. बेसनात दही वा कोळ आणि बाकी मसाले घालून भज्यांसाठी भिजवतो त्यापेक्षा थोडे घट्ट भिजवा. कूकरच्या डब्याला तळाशी पुसटसा तेलाचा हात लावा. त्यावर पालकांच्या पानाचा एक थर द्या, पण बाकिचे तुकडे बेसनात घोळवून वर पसरत जा आणि त्याचे थर करा. वरचा थर जमल्यास नुसत्या पानांचा द्या किंवा शिल्लक राहिलेला घोळ वर ओता. कूकरमध्ये शिटी न ठेवता 20 मिनिटे वाफवा. पूर्ण थंड झाले की आवडीप्रमाणे वड्या कापा. पथ्यासाठी या नुसत्यास कोथिंबीर घालून खाता येतील, नाहीतर तेलाची तीळ, जिरे, मिरची घालून फोडणी करून वर ओता व खोबरे कोथिंबीर पसरून घ्या किंवा फोडणीत परता किंवा शॅलो फ्राय करा.