बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. महिला दिन
Written By वेबदुनिया|

अंत्यसंस्कारः स्त्रीचा हक्क

ND
स्त्रिया अंत्यसंस्कार करू शकत नाहीत. वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा आताच्या काळात अव्यावहारिक ठरते आहे. भारतीय संस्कृतीत घरातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला मृताचा भाऊ, मुलगा, पुतण्या, नवरा, वडील हेच मुखाग्नी देऊ शकतात. दुसर्‍या भाषेत सांगायचे म्हटले तर पुरूष वर्गच अंत्यसंस्कार करू शकतो. स्त्रीपेक्षा पुरूष श्रेष्ठ असल्याची जाणीव करून देणारी ही परंपरा आहे.

गेल्या दशकापासून या व्यवस्थेला आव्हान दिले जात आहे. सामाजिक, जातीय परंपरेची तळी उचलून धरणार्‍यांनी याला विरोध केला पण. तरीही हा विरोध झुगारून देऊन स्त्रियांनी आपल्या प्रिय व्यक्तीच्या चितेला अग्नी दिला आणि आत्मिक समाधान मिळविले.

एक आई, मुलगी, बहीण, पत्नी यांनी देखील चितेला अग्नी दिल्याचे बरीच उदाहरणे समोर आहेत. या बातम्या आता वादाऐवजी कौतुकाच्या बनत आहेत. देशभरातील अशा कित्येक घटना या परंपरेला आव्हान देत आहेत. या घटनांना परंपरेचा विरोध, सामाजिक नियम-कायद्यांचे उल्लंघन का मानले जावे? हा प्रश्न पडतो. ज्या पुत्रहीन आहेत, तिथे पुरूष नातेवाईकाचा शोध का घेतला जावा? त्यापेक्षा स्त्रीजगताला या परंपरेचे वाहक का मानू नये?

बदलत्या परिस्थितीत या प्रथेवर कोणाचेही बंधन असू नये. हिंदू परंपरेत मुलाद्वारे दिल्या गेलेल्या मुखाग्नीला महत्त्वपूर्ण मानले आहे. त्याला मृताच्या आत्म्याच्या मुक्तीशी जोडले आहे. तसेच मुलासाठी एक पुण्य कर्म म्हणून जोडले आहे. आता प्रश्न असा पडतो की या पुण्याची हकदार मुलगी का बनू शकत नाही? या नात्यात आत्मीयता नसते?

कायद्याने संपत्तीतही मुलीला उत्तराधिकारी बनविले आहे. आता हळू-हळू स्त्रीदेखील अंत्यसंस्काराच्या पुण्य कर्माची भागीदार बनली पाहिजे. ती आई-वडील, भाऊ-नवरा किंवा कुटुंबाला आधार देण्यात पुढाकार घेतच आहे ना? याची बरीच उदाहरणे आपल्या घराच्या आजूबाजूलाच मिळतील. प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने लौकिक मिळविला आहे. अगदी इतिहासातही. मग या वर्गाला याच कार्यापासून वंचित का ठेवले जावे?

वेद पाठ करणारी स्त्री याच देशात आहे. धार्मिक ग्रंथांमध्येदेखील स्त्री-सन्मान सांगितला आहे. जवळपास दहा वर्षांपूर्वी राज्यसभा सदस्य हेमामालिनी यांचा एक चित्रपट आला होता 'इंदिरा'. या नायिकाप्रधान चित्रपटात एका हेमाने एखाद्या मुलाइतकाच कुटुंबाचा भार पेलला होता. शेवटच्या दृश्यात वडिलांच्या मृत्यूनंतर मुखाग्नी हेमानेच दिला होता. त्या दरम्यान तिला सामाजिक विरोधाला सामोरे जावे लागले होते. पण त्यात तिने प्रश्न केला होता, 'एक मुलगी आपल्या कुटुंबाचा भार उचलू शकते, तर मग अंत्यसंस्कार का नाही करू शकत?

स्त्री मनाला कोमल मानून तिला स्मशानघाटावर नेणे उचित मानले जात नाही. पण आता मात्र हे चित्र बदलले आहे. स्त्री आपल्या प्रियजनांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी जाऊ लागली आहे. अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची अनेक उदाहरणे आहेत, जसे: इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यावरील अंत्यसंस्कार, हा एक धार्मिक विधी असून जर मुलगी किंवा पत्नी पार पाडीत असेल तर त्याला विरोध न करता प्रोत्साहन मिळावयास हवे. त्यासंबंधातील मानसिकता बदला तरच परिवर्तन प्रभावी वाटेल.