बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. जागतिक महिला दिन
Written By
Last Modified: शनिवार, 8 मार्च 2014 (12:56 IST)

जर्मन विद्यार्थ्यांना चिंता भारतीय ‘वातावरणाची’!

अॅड. असीम सरोदे यांच्या ‘सहयोग’ या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्टुडंट एक्स्चेंज कार्यक्रमांतर्गत जर्मनीतील कायद्याचे चार अभ्यासक विद्यार्थी त्यांच्याकडे इंटर्नशीप करतात. त्यांनीही आज उपस्थित महिलांशी संवाद साधला. आपल्या अभ्यासांतर्गत आलेले अनुभव तसेच भारतीय व जर्मन कायद्यातील फरक त्यांनी सांगितले.
 
सेरा ही विद्यार्थिनी घटस्फोट प्रकरणांचा अभ्यास करते. ती म्हणाली, भारतात घटस्फोटासाठी पुरूष अधिक प्रमाणात अर्ज दाखल करतात. त्याउलट जर्मनीत महिलांचे प्रमाण अधिक आहे. तिकडे घटस्फोटाआधी एक वर्ष विभक्त राहण्याची अट असते आणि त्यानंतर साधारण वर्षभरात संबंधित प्रकरणाचा निकाल लागतो.
 
हिना ही बलात्कार प्रकरणांचा अभ्यास करते आहे. तिने बलात्काराच्या प्रकरणांत भारतातील शिक्षा ही अधिक कडक असल्याचे सांगितले. जर्मनीमध्ये त्यासाठी सहा महिने ते एक वर्षाच्या कारावासाची तरतूद आहे. तथापि, जर्मनीत पुरूषांवरील बलात्कार आणि विवाहांतर्गत बलात्कार हे सुद्धा दखलपात्र गुन्हे आहेत.
 
जोहान्स हा विद्यार्थी पर्यावरणविषयक कायद्यांचा अभ्यास करतो. तो म्हणाला, दिल्लीत उतरल्यापासून भारतातल्या प्रदूषणाच्या समस्येकडे माझे लक्ष वेधले गेले आहे. कोल्हापूरच्या रंकाळा तालावालाही आम्ही काल भेट दिली. त्याच्या प्रदूषणाची समस्याही गंभीर आहे. या प्रदूषणासंदर्भात जागृती करण्याची खूप गरज आहे.
 
ज्युलिआन या विद्यार्थ्यानं जर्मनीकडे आजही ‘हिटलरचा देश’ म्हणून पाहिलं जातं, याविषयी खंत व्यक्त केली. तो आमचा अत्यंत अप्रिय असा भूतकाळ आहे. त्या फॅसिझमच्या झळांत आम्ही आजही होरपळतो आहोत. त्याचे दुष्परिणाम भोगतो आहोत. त्यामुळं दुसरं फॅसिझम आमच्या देशात आम्ही होऊ देणार नाही, हे नक्की असलं तरी इतर काही देशांत तशा प्रवृत्तींचं आकर्षण वाढते आहे, ही खूप चिंताजनक बाब आहे.