गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. मातृ दिन
Written By वेबदुनिया|

आईचे दान

- रामकृष्ण भगवंत अघोर

रुक्मिणी नऊ महिने पूर्ण होताच अचानक पोट दुखू लागल्याने प्रसूती गृहात दाखल झाली. प्रत्येक सेकंद सेकंदाला तिला मरणांतिक यातना होत होत्या. ती त्रासामुळे अगदी पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी तडफडत होती. कारण बाळंतपण हे सुखासुखी नसतं, हे वाक्य तिला आठवलं. कारण तिच्या प्रसुती वेदना सहनशीलतेपलीकडे गेलेल्या होत्या. ती जोरजोरात विव्हळत होती. 

प्रसुती केंद्राच्या बाहेर तिचा पती, तिचे वडील, सासू, सासरे, सर्व चिंताक्रांत होऊन येझारे गालत होते. एवढ्यात विव्हळण्याचा आवाज संपला आणि एका लहान बालकाच्या रडण्याचा आवाज सर्वांना ऐकू आला. सर्वांनी सुटकेचा श्वास टाकला.

थोड्याच वेळात सिस्टर बाहेर आली. तिचे सर्वांचे प्रथम अभिनंदन केले. मुलगा झाल्याचे सांगून पेढ्याची मागणी केली. रुक्मिणीच्या वडिलांनी तिच्या हातावर शंभराची नोट टेकविली. थोड्या वेळानंतर रुक्मिणी शुद्धीवर आली. तिने पाळण्यात असणार्‍या आपल्या मुलाकडे पाहिले. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण दुसर्‍या क्षणात ती दु:खी झाली. कारण त्या मुलाला कान नव्हते.

डॉक्टरांनी त्या मुलाची सर्व तपासणी केली. तेव्हा त्यांना समजले की त्या मुलाला व्यवस्थित ऐकु येतेय. फक्त त्याला दोन्ही कानाच्या पाळ्या नव्हत्या. पदरी पडलं पवित्र झालं म्हणून रुक्मिणीने ते मूल मायेनी आणि मोठ्या प्रेमाने वाढविले.

मुलगा शाळेत जाऊ लागला. प्रायम‍रीतून हायस्कुलाला गेला. सर्व त्याला बिन कानाचा, बहिरा असे म्हणून चिडवू लागले. मुलाला शाळा शिकणे अवघड होऊ लागले. कारण मुलांचे चिडवणे त्याला असह्य होऊ लागले. त्याने सर्व कल्पना आपल्या आईला दिली. आईला खूपच वाईट वाटले.

एके दिवशी रुक्मिणी डॉक्टरांकडे गेली. तेथे तिने मुलाला कानाची पाळी नसल्याचे सांगितले. त्यासाठी काही तरी डॉक्टरी इलाज करावेत, अशी विनंती केली. तेव्हा डॉक्टर म्हणाले, ''जर कोणी कानाची पाळी दान देत असेल तर त्याचा उपयोग मुलासाठी करता येईल.''

डॉक्टरांनी वृत्तपत्रात जाहिरात दिली की एक मुलाला कानाच्या पाळीची गरज आहे. ज्यांना कोणाला कानाची पाळी दान देण्याची इच्छा आहे, त्यांनी समक्ष किंवा फोनवर संपर्क साधावा.

काही दिवस गेले. डॉक्टरांनी रुक्मिणीच्या घरी फोन केला. तो फोन नेमका रुक्मिणीच्या पतीने घेतला. तेव्हा डॉक्टर म्हणाले, ''आपल्या मुलसाठी एकाने आपल्या कानाच्या दोन्ही पाळ्या दान दिलेल्या आहेत. तेंव्हा आपल्या मुलाला त्वरीत माझ्या हॉस्पिटलला घेऊन या.''

ठरल्याप्रमाणे रुक्मिणी आपल्या मुलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली. त्याचे ऑपरेशन करून कानाच्या पाळ्या बसवुन टाकल्या त्यामुळे त्याच्या सौंदर्यात भर पडली. त्याचे पुढचे शिक्षण पूर्ण झाले. त्याला उत्तम नोकरी लागली. पुढे त्याचे लग्न झाले. त्याला देखील मुले झाली. पण ह्या सर्व आनंदाच्या गोष्टीवर एक दुखाची गोष्ट म्हणेज रुक्मिणीचे दु:खद निधन झाले.

रुक्मिणीच्या मुलाला खूप दु:ख झाले. तिच्या अंगावर तो पडून रडू लागला. तिच्या केसात हात घालून दु:ख व्यक्त करू लागला. ‍तेव्हा त्याला एका एकी आश्चर्य वाटले. त्याने आईचे केस बाजूला केले. तेव्हा आईच्या दोन्ही कानाला कानाच्या पाळ्या नव्हत्या. या वरून तो काय समजावयाचे ते समजला. आपल्याला कानाची पाळी कोणी दान दिली तेत्याला समजले.

रुक्मिणीने कानाची पाळी पाढल्यापासून सतत कानावरती केस सोडले होते. उभ्या आयुष्यात मुलाला व पतीला, रुक्मिणीला कानाची पाळी नव्हती आणि तिने मुलाला ती दान दिली होती, हे शेवटपर्यंत समजू शकले नव्हते. असे आईचे प्रेम मुलावरती असते. मुलाच्या सुखासाठी सर्वस्व दान करणारी आईची तयारी असते.