शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 20 ऑक्टोबर 2014 (12:44 IST)

1990 नंतर प्रथमच महाराष्ट्रात भाजपचे शतक

नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर आरुढ होत भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 1990 नंतर प्रथमच शतक ओलांडले आहे. 1990 मध्ये काँग्रेसने शतक केले होते. 
 
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच बालेकिल्ल्यांमध्ये मुसंडी मारत भाजपने 288 सदस्यांच्या विधानसभेत 120 पेक्षा अधिक जागांवर विजय निश्चित केला आहे. भगव्यायुतीमध्ये मोठा भाऊ म्हणून मिरवणार्‍या शिवसेनेलादेखील हा मोठाच धक्का म्हणावा लागेल. 1990 च्या निवडणुकीत काँग्रेसने 141 जागा मिळविल्या होत्या. त्यानंतर कोणत्याही राष्ट्रीय अथवा प्रादेशिक पक्षांने शंभरचा टप्पा ओलांडला नव्हता. भाजपला 145 चा जादूई आकडा गाठता आलेला नाही. मात्र 2009 च्या निवडणुकीत मिळविलेल्या जागांपेक्षा जवळपास तिप्पट जागा निवडून आणण्यात  भाजपला यश मिळाले आहे. 2009 मध्ये भाजपला 46 जागा मिळाल्या होत्या. गेल्या निवडणुकीत शिवसेनेसह भाजपने 92 जागा मिळविल्या होत्या. यंदा मात्र भाजपने स्वबळावर 92 पेक्षा अधिक जागा मिळवत पक्षाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यच्या  स्वबळावर लढण्याचा निर्णय योग्य असल्याचे शिक्कामोर्तब केले. 1995 मध्ये भाजपने 65 व शिवसेनेने 73 अशा एकूण 138 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजप-शिवसेनेने राज्यात प्रथमच बिगर काँग्रेस सरकार स्थापन केले होते. 1990 मध्ये एकत्रित निवडणुका लढविताना भाजपला केवळ 42 जागा मिळाल्या होत्या. तर शिवसेनेला 52 जागा मिळाल्या होत्या. 
 
भाजपचे स्वर्गीय नेते प्रमोद महाजन यांनी शिवसेनेशी युती करण्याचा निर्णय घेतला होता. महाजन यांचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अत्यंत घनिष्ठ संबंध होते. शिवसेना प्रमुखांनी राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपला उपमुख्यमंत्रिपद देऊ केले होते. तेव्हापासून भाजपने राज्यात धाकटय़ा भावाची भूमिका बजावली होती. 
 
माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हत्यानंतर झालेल्या निवडणुकीत 1985 मध्ये भाजपने 67 जागा लढविल्या व त्यांचे अवघ्ये 16 आमदार निवडून आले होते. त्यावेळी काँग्रेसने 161 जागा जिंकून 43.55 टक्के मते मिळविली होती. शरद पवार यांनी 1999 मध्ये  काँग्रेसशी फारकत घेतल्यानंतर गेली पंधरा वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादीचे आघाडी सरकार राज्यात होते. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 42 जागा जिंकत भाजप आणि मित्रपक्षांनी मोठा धक्का दिला होता. उत्तर प्रदेशात भाजपने 80 जागा मिळविल्या होत्या. त्यापाठोपाठ महाराष्ट्राने भाजपला केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी मोठी साथ दिली होती.